

पहिल्या बाळानंतर दुसरे बाळ न होणे याला सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतात.
वाढते वय आणि अंड्यांची गुणवत्ता कमी होणे हे मोठे कारण.
हार्मोनल असंतुलन, पीसीओएस किंवा थायरॉईडचा परिणाम होऊ शकतो.
पुरुषांमधील शुक्राणूंच्या गुणवत्तेत घट हीसुद्धा कारणीभूत.
एक वर्ष प्रयत्नानंतरही गर्भधारणा न झाल्यास दोघांनी तपासणी करणे आवश्यक.
पहिल्या बाळानंतर काही वर्षांनी दुसऱ्या बाळाचा विचार करताना अनेक दांपत्यांना धक्का बसतो प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही. वैद्यकीय भाषेत या स्थितीला सेकंडरी इन्फर्टिलिटी असे म्हणतात. म्हणजेच, आधी नैसर्गिकरित्या गर्भधारणा झाली असतानाही नंतर पुन्हा गर्भधारणा न होणे.
तज्ज्ञांच्या मते, ही समस्या पूर्वीपेक्षा आता अधिक प्रमाणात दिसू लागली आहे. कारण बदलती जीवनशैली, वाढते वय आणि काही आरोग्यविषयक गुंतागुंती. सर्वात पहिले कारण म्हणजे वाढते वय. पहिल्या बाळानंतर दांपत्य काही वर्षांचा गॅप घेतात. मात्र स्त्रियांच्या बाबतीत वयानुसार अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता कमी होत जाते. ३०-३५ वर्षांनंतर प्रजननक्षमता घटते. त्यामुळे दुसरे मूल होण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
दुसरे मोठे कारण म्हणजे हार्मोनल असंतुलन. थायरॉईडची समस्या, पीसीओएस, अनियमित मासिक पाळी किंवा वजनातील मोठे बदल यामुळे अंडोत्सर्जन व्यवस्थित होत नाही. याचा थेट परिणाम गर्भधारणेवर होतो.
महत्त्वाचे कारण म्हणजे पुरुषांमधील बदल. अनेकदा समस्या केवळ स्त्रीकडेच शोधली जाते; मात्र पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या, हालचाल किंवा गुणवत्ता कमी झाल्यासही गर्भधारणा होत नाही. ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान आणि अनियमित जीवनशैली यामुळे हा धोका वाढतो.
याशिवाय गर्भाशयातील संसर्ग, पूर्वीची शस्त्रक्रिया, एंडोमेट्रिओसिस किंवा प्रसूतीनंतर झालेल्या गुंतागुंती यांमुळेही सेकंडरी इन्फर्टिलिटी उद्भवू शकते.
तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, एक वर्ष नियमित प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर दांपत्याने दोघांनी मिळून तपासणी करून घ्यावी. योग्य वेळी उपचार घेतल्यास ही समस्या सोडवता येऊ शकते. आई-वडील होण्याचा प्रवास प्रत्येकासाठी वेगळा असतो. त्यामुळे स्वतःला दोष देण्याऐवजी योग्य मार्गदर्शन आणि उपचार घेणेच शहाणपणाचे ठरते.