सायटिका आजार व उपचार | पुढारी

Published on
Updated on

डॉ. आनंद ओक 

खुब्याचे हाड व माकड हाडामधील सांध्याची सूज, खुब्यांच्या स्नायूंची सूज, खुब्याच्या चुकीच्या जागी इंजेक्शनने नाडीला इजा होणे, सतत तासन्तास मांडी घालून बसणे, सतत वारंवार प्रवास करणे, भांडी किंवा कपडे खाली बसून धुणे, झाडू मारणे या कारणांनी खुब्यांमध्ये निर्माण होणार्‍या अतिताणामुळे सायटिका उत्पन्न होऊ शकतो.

कंबरेच्या मणक्यातून निघणार्‍या नाडीमुळांपासून एकत्र होऊन एक मोठी नाडी/शिर तयार होते. ही नाडी खुब्यातून निघून मागील बाजूने मांडीपासून खाली गुडघ्याच्या मागून पिंडरीमधून खाली पायापर्यंत पसरलेली असते. या नाडीला 'सायटिका नर्व्ह' असे म्हणतात. ज्यावेळी खुब्यापासून पायापर्यंत या नाडीच्या अनुषंगाने वेदना येतात त्यावेळी या विकाराला 'सायटिका' असे म्हणतात. असे असले, तरी अनेक कारणांनी उत्पन्न होऊ शकणारा हा एक लाक्षणिक विकार आहे.

कमरेपासून खाली खुब्यातून खाली पायात वेदना येतात. या वेदना वरून खाली जाणवत असतात. या वेदना काहीवेळा एका पायात तर काही वेळा दोन्ही पायांत येत असतात. काहीवेळा वरून खाली मुंग्या येतात, पाय बधीर होतात, काही जणांत पायात ताकद कमी जाणवते. कोणत्याही कारणांनी ताण वाढल्यास या वेदना वाढत असतात. 'चमका येणे' अशा पद्धतीच्या वेदना असतात. खुब्यातील या वेदनांमुळे हालचाल करणे अवघड  जात असते. वेदना असणारा पाय जास्तवेळ नीट टेकवता येत नाही. काही जणांत यामुळे चांगल्या पायावर ताण येत असतो. आयुर्वेदामध्ये या विकारास 'गृध्रसि' असे नाव आहे.

सायटिका होण्याची कारणे?

कमरेतून खुब्यावाटे खाली येणार्‍या या नाडीवर किंवा तिच्या मणक्यातून निघणार्‍या मुळांवर कोणत्याही कारणाने दाब उत्पन्न होणे हे सर्वात महत्त्वाचे कारण असते, तर काही वेळा कमरेच्या मणक्यातील इतर विकारांमुळे होणारी वेदना या नाडीमार्गावर पसरत जात असते. (रेफर्ड पेन).

मज्जारज्जूच्या आवरणांना सूज येणे/जंतुसंसर्ग मज्जारज्जूमध्ये गाठ होणे किंवा क्वचित रक्तदाब, दोन मणक्यांमधील चकती (डिस्क) सरकणे, मज्जारज्जूतील गाठी, मणक्यांमधील सांध्यांना सूज येणे, मणक्याला टी. बी.चा जंतुसंसर्ग होणे, मणके एकमेकांवर चढल्यासारखे होणे 'अँकिलाइझिंग स्पाँडिलायटीस', मणके जखडले जाणे, मणक्यातील हाडांचा कॅन्सर किंवा इतर कॅन्सरचा मणक्यातील प्रसार यामुळे सायटिका उत्पन्न होतो. माकड हाडाच्या स्नायूंची सूज, शिरेच्या मुळावर, खुब्यावर सतत जास्त दाब पडल्यानेदेखील सायटिका होतो.

खुब्याचे हाड व माकड हाडामधील सांध्याची सूज, खुब्यांच्या स्नायूंची सूज, खुब्याच्या चुकीच्या जागी इंजेक्शनने नाडीला इजा होणे, सतत तासन्तास मांडी घालून बसणे, सतत वारंवार प्रवास करणे, भांडी किंवा कपडे खाली बसून धुणे, झाडू मारणे या कारणांनी खुब्यांमध्ये निर्माण होणार्‍या अतिताणामुळे सायटिका उत्पन्न होऊ शकतो.

काही वेळा पुरुषांमध्ये प्रोस्टेटमधील जंतुसंसर्ग, स्त्रियांमध्ये गर्भाशय व परिसरातील जंतुसंसर्ग, नागिणीचा प्रादुर्भाव नाडीला झाल्याने देखील सायटिका उत्पन्न होत असतो. याप्रमाणे अनेक कारणांमुळे सायटिका उत्पन्न होऊ शकत असला, तरी 'मणक्यातील चकती सरकणे' हे सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे कारण आहे.

सायटिकावरील उपचार

सायटिकाचा त्रास सुरू झाल्यानंतर सामान्यपणे सुरुवातीला आधुनिक वेदनाशामक औषधे घेतली जातात. ज्यामुळे वेदना कमी होतात. एखादे तेल किंवा क्रीम लावणे, शेकणे असाही उपचार काहीजण करत असतात. काहीजण विविध व्यायाम किंवा योगासने करतात. अनेकदा कंबरदुखीवर गोळी घेऊन आराम मिळवला जातो. काही वेळा अशा वेदनाशामक (पेनकिलर) औषधांची सवय झालेली आढळते. वास्तविक सायटिका या विकारावर उपचार करताना त्रास कोणत्या विकारामुळे होत आहे, याचे कारण शोधून मग त्या मूळ कारणावरील उपचार होणे सर्वात महत्त्वाचे असते.

सायटिकाच्या कारणांचा शोध?

सायटिकाचा त्रास होत असलेल्या रुग्णाचे वय, वजन, व्यवसाय, येणारा कमरेवरील ताण, कोणता आघात झाला आहे का? थंडीशी संपर्क, वेदना नक्की कशी येते. बधिरपणा, कोणत्या क्रियेने वेदना वाढत आहे? पोट साफ होते का? लघवी कशी होते? पूर्वी इतर कोणते विकार झाले होते का? कामाचा ताण, प्रवासाचे प्रमाण, व्यायाम इत्यादी गोष्टींची माहिती घ्यावी लागते. याचबरोबर आकार, स्नायूंची अवस्था, सूज, स्नायूतील जखडलेपणा, मणक्याची हालचाल, चालण्याची पद्धत, दाब पडल्यावर वेदना वाढतात का? पायाच्या हालचालीच्या परीक्षा इत्यादीची सविस्तर परीक्षा, निरीक्षणे करावे लागते. याच्याच जोडीला एक्सरे, एम.आर.आय.ची तपासणी गरजेप्रमाणे करावी लागते. या सर्व गोष्टीचा विचार करून सायटिकाची कारणनिश्चिती करून उपचार केले जातात.

आयुर्वेदिक उपचार

सायटिका विकारासाठी पंचकर्म, औषधे, पथ्यपालन, वर्तणुकीतील बदल आणि नंतर योग्य अशी योगासने यांचा सांघिक पद्धतीने उपयोग केल्यास उत्तम फायदा होतो, तसेच होणारा उपयोग जास्त दिवस टिकणारा असतो.

निरगुडी, सहचर, बला, देवदार, एरंड, दशमुळ, अर्क, कुचला इत्यादींनी सिद्ध केलेल्या औषधी तेलाने कंबर, खुबे, पाय यांना वरून खालच्या दिशेने हलक्या हाताने मसाज केला जातो. त्यानंतर औषधे, पाल्यांच्या गोळ्यांनी तेलाने शेक दिला जातो (पिंडस्वेद) व त्यानंतर औषधी काढ्याच्या वाफेने शेक दिला जातो. त्यानंतर तैलबस्ती, निरुहाबस्ती गरजेप्रमाणे दिला जातो. हा उपक्रम सतत काही दिवस केला जातो.

त्रिफळा, सहचर, निरगुडी, पुष्करमुळ, एरंड, गुग्गुळ, दशमुळ, अश्वगंधा, कांचनार, वरुण, भल्लातक, सुंठ, रास्ना इत्यादी वनस्पती तसेच लोह, मंडुर, माक्षिक, कज्जली, त्रिवंग, कुकुटांडत्वक भस्म यांच्या योग्य एकत्रीकरणातून तयार केलेली संयुक्त औषधे वापरली जातात. सायटिकाच्या मूळ कारणांची चिकित्सादेखील केली जाते.

औषधी व पंचकर्म उपचारांबरोबरच खुब्याला पायाला विश्रांती मिळण्यासाठी, नाडीवरील ताण कमी होण्यासाठी रुग्णाने त्याच्या वर्तणुकीत कोणते बदल करणे गरजेचे आहे याचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते. विकाराची तीव्रता कमी झाल्यावर योग तज्ज्ञांकडून उपयुक्त योगासने शिकून ती नियमित करणेही अतिशय उपयोगी अणि गरजेचे असते. या पद्धतीने सांघिक आयुर्वेदिक उपचारांचा आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपयोग केल्यास वेदनादायी 'सायटिका' विकारात उत्तम आराम मिळतो.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news