गर्भाशय टिकवायचे तर… | पुढारी

Published on
Updated on

डॉ. प्रवीण हेंद्रे

पूर्वी जनन मार्गावाटे गर्भाशय काढण्यास प्राधान्य दिले जात असे; परंतु जशी जशी गर्भाशय वाचविण्याची समाजामधील जागरूकता निर्माण झाली आहे तेव्हापासून विविध कृत्रिम बंध Mercelene tape',  Prolenc Mesh', द्वारे गर्भाशय पूर्ववत करून परिस्थितीवर मात करणे शक्य झालेले आढळते…

पोटाची रचना जर बघितली तर खूपच मजेशीर आहे. एका बाजूला म्हणजे मागे स्नायू व पाठीचा कणा असलेली भक्‍कम भिंत वर खालीवर हलणारी उदरपोकळी व छातीची पोकळी यामधील पातळ पडदा. पुढच्या बाजूस लोहाराच्या भात्यासारखा आकुंचन व प्रसरण पावणारा लवचिक स्नायूचा पडदा तर खालच्या बाजूला पुरुषामध्ये भक्‍कम पेरिनियम स्नायूचा पडदा, थोडासा पुरुषापासून वेगळा म्हणजे ज्याला मध्यभागी सर्व बाजूंनी ताणून धरलेला म्हणजेच लक्ष्मण झुला जसा तारेच्या ताणामुळे नदीवरती अधांतरी लटकलेला असतो तसेच काहीसे सर्वबाजूच्या बंधांनी ताणलेले असे गर्भाशय (Ligaments) बंधानी सर्व बाजूंनी ताण दिलेला असल्यामुळे जशी सासनकाठी मधोमध स्थिर राहते तसेच काहीसे गर्भाशय सर्व बाजूच्या बंधानी ओटीपोटाच्या उदरपोकळीत स्थिर झालेले असते मात्र गरोदरपणामध्ये संपूर्ण गर्भाशय, त्यातील अर्भक, बाळाभोवतीचे पाणी व वार या सगळ्याचे जवळपास 5 कि.ग्रॅ. वजन तर पेलायचे असतेच; परंतु बाळंतपणामुळे होणार्‍या दबावामुळे सर्व बाजूचे  बंध  (Ligaments) ताणले जातात व बाळंतपणात अवेळी केलेल्या जोरामुळे पोटातील बाळाबरोबरच गर्भाशय ताणले जाऊन ते मूळची जागा सोडून शरीराबाहेर ओघळते म्हणूनच जर बाळंतपण तज्ज्ञ सहाय्याशिवाय झाले व गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडण्यापूर्वीच 'बाई जोर करा बाई जोर करा' हा घोषा लावून बाळंतपण केले गेले, तर अंग बाहेर येण्याची गुंतागुंत होते. 

आता सिझेरियनचे प्रमाणच वाढलेले असल्याने अशा प्रकारचे अंग बाहेर येण्याचे प्रकार तुरळक आढळतात; परंतु अजूनही खेड्यात अज्ञानी व्यक्‍तीने केलेले बाळंतपण हे अंग बाहेर येण्यास कारणीभूत ठरले आहे. अशा परिस्थितीमध्ये गर्भाशयाचे बंध ताणले जाऊन त्यामध्ये कमजोरी आलेली असते व पूर्वी सर्व बंधांनी ताणून धरलेली गर्भ पिशवी या Perinium वटीपाच्या पडद्यातून शरीराबाहेर (Prolapse uterus) लटकलेली दिसू लागते व त्याचबरोबर पुढील बाजूला असलेले मुत्राशय ही Cystocele शरीर बाहेर येते व मागच्या बाजूला असलेला पडदा Enterocele व गुद्द्वाराच्या वरचे आतड्याला फुगीरपणा येऊन शरीराबाहेर Rectocels येऊन बसतो. या गर्भाशयाच्या मुत्राशयाच्या व गुद्द्वाराच्या आतड्याच्या बंधाना आलेल्या दुर्बलतेवर मात करण्यासाठी मजबुतीकरण (Re-enforcement) करण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. भारतातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शिरोडकर तसेच डॉ. पुरंदरे यांनी अशा स्त्रियांवर केलेल्या संशोधनात्मक उपचार पद्धतीमुळे आजही खाली घसरलेले गर्भाशय पोटातून जननमार्गावाटे किंवा दुर्बीण शस्त्रक्रियेद्वारे पूर्ववत आपल्या जागेवर स्थिर करता येऊ शकते. असेच नाही तर या बंधांना कृत्रिमपणे मजबुतीकरण करण्यासाठी विविध (Sling) प्रकारचे कृत्रिम बंध जोडून गर्भाशय व गुद्द्वाराचे आतडे व मुत्राशय पूर्ववत करणे शक्य झाले आहे.

पूर्वी अशा परिस्थितीमध्ये जनन मार्गावाटे गर्भाशय काढण्यास प्राधान्य दिले जात असे; परंतु जशी जशी गर्भाशय वाचविण्याची समाजामधील जागरूकता निर्माण झाली आहे तेव्हापासून विविध कृत्रिम बंध  'Mercelene tape',  'rolenc Mesh', द्वारे गर्भाशय पूर्ववत करून परिस्थितीवर मात करणे शक्य झालेले आढळते.

माझे गर्भाशय टिकवता येईल का, या विचारांनी प्रेरित झालेल्या समाजाला आज विविध प्रकारच्या Sling शस्त्रक्रिया वरदान ठरलेल्या आढळतात गर्भाशय टिकवायचे तर आपण पोटातून करता येणारी शस्त्रक्रिया व जननमार्गे कराव्या लागणार्‍या शस्त्रक्रिया यांची माहिती घेऊ.

नेमक्या जागेवरून खाली सरकलेले गर्भाशय पूर्वस्थितीत नेण्यासाठी जननमार्गाद्वारे 'फॉदरगील'चे ऑपरेशन केले जाते. हे ऑपरेशन प्रथम मँचेस्टर या शहरात झाले होते म्हणून त्याचा मँचेस्टर ऑपरेशनही म्हणतात. त्यामध्ये जे काही बंध ढिले झालेले असतात, ते कापून छोटे करून गर्भाशयाच्या पुढील बाजूला बांधले जातात व गर्भाशयाचे मुख साधारण एक इंचापर्यंत कापून टाकतात. आता दुर्बिणीतून करता येणारी Sling ऑपरेशन्स प्रगत झाली आहेत. त्यामुळे हे ऑपरेशन आता प्रचलित नाही.

तसेच लघवीची पिशवी वर सरकविण्यासाठी Cystocele Repairs नावाचे ऑपरेशन करतात तर गुद्द्वाराचा आलेला फुगीरपणा Rectocele ऑपरेशन होय.

थोडक्यात गर्भाशय पूर्वस्थितीत नेण्यासाठी आता दुर्बीण शस्त्रक्रियेद्वारे विविध प्रकारच्या Sling शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. परंतु, मुत्राशय व गुद्द्वारेचा सैलसरपणा दुरुस्त करण्यासाठी जननमार्गाद्वारेच ऑपरेशन्स करावी लागतात. जननमार्गावाटे केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये आणखीन एक फायदा होतो. तो म्हणजे बाळंतपणामध्ये बाळाच्या डोक्याच्या आकारामुळे जननमार्ग ताणण्याची शक्यता असते. त्यामुळे स्त्रीचे सर्व मायांगामध्ये (जननमार्ग) सैलसरपणा आला असल्यास या शस्त्रक्रियेने अगदी बाळंतपणापूर्वी जसे होते, तसे घट्ट करता येते व जननमार्गाला पुनरुज्जीवन प्राप्त होते.

जसे कपडे किंवा इतर फॅशन्स असतात, तशाच वैद्यकीय शास्त्रामध्ये थोड्याफार फॅशन्स असतात. 30 वर्षांपूर्वी अल्सरचे ऑपरेशन फारच प्रचलित होते व तेव्हाच गर्भाशय काढून अपेंडिक्सचे ऑपरेशन पोटदुखीच्या उपचारासाठी केले जात असे. आपल्या भागात लोकांच्या आहारपद्धती कमी तंतुमय पदार्थ, मांसाहारी जेवण व मसाले हे अल्सर व अपेंडिक्सच्या आजाराला आमंत्रण देत असत. 

आता अ‍ॅसिडिटी 'आम्लपित्त' व अल्सर होऊ नये यासाठी रामबाण औषधे उपलब्ध झाल्यामुळे अल्सर व अपेंडिक्सचे ऑपरेशन फारच दुर्मीळ झालेले आहे. परंतु, अपेंडिक्सचा प्रादुर्भाव कोणत्याही उपचारामुळे कमी झालेला नाही. म्हणून काही रुग्णालयात अशा रुग्णांमध्ये पोटदुखीसाठी अपेंडिक्स व गैरसमजतीमुळे गर्भाशय काढण्याची प्रथा प्रचलित झालेली आढळते व गरजेच्या (अपेंडिक्स) शस्त्रक्रियेबरोबर निरोगी गर्भाशयाचा बळी जातो व त्याचे दुष्परिणाम पुढे या अज्ञानी स्त्रियांना व त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणून पोटदुखी असेल तर तिचे कारण गर्भाशयाचा विकारच आहे का, हे निश्‍चित केल्याशिवाय गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेबद्दल विचार करू नये. 40 ते 45 वर्षांच्या स्त्रियांचा रजोनिवृत्तीचा काळ जवळ आलेला असताना काही वेळेस या स्त्रियांबद्दल थोडा वेगळा विचार करावा लागतो. परंतु, 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्त्रियांचे गर्भाशय काढण्याचा सल्ला थोडासा धाडसानेच घ्यावा लागतो. आपण भारतीयच काय अगदी अमेरिकेतील स्त्रियांमध्येसुद्धा गर्भाशय टिकवण्याबद्दची जागरूकता आणावी लागली आहे. तर एकंदर गर्भाशयाच्या बाबतीत इतका निष्काळजीपणा न करता त्याचे सखोल पद्धतीने पृथक्‍करण करून मगच गर्भाशय काढण्याचा निर्णय घ्यावा, असे वाटते. दुर्दैवाने आपल्याकडे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एकूण कुटुंबाच्या बजेटमध्ये पैसे राखून ठेवणे किंवा आरोग्य विमा करण्याची सवय नाही व स्थानही नाही म्हणून तरुणपणीच आपण आरोग्य विमा संपूर्ण कुटंबाचा काढला तर त्याचा हप्ता कमी बसतो व होणार्‍या खर्चाची काळजी राहत नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

केवळ सरकारी योजनांवर भरोसा ठेवणे म्हणजे थोडे चुकीचेच वाटते. केव्हा कोणती योजना बदलेल किंवा बंद होईल हे सांगता येत नाही. तेव्हा स्वत: आपल्या कुटुंबाचा आरोग्य विमा करणे हे रास्त आहे, असे वाटते.

एक गोष्ट सांगावीशी वाटते, आपण भाजी खरेदी करताना दहा रुपयांची पेंढी तीन ते चार ठिकाणी बघून, पारखून घेतो. इतकी काळजी दहा रुपयांच्या गोष्टीसाठी घेतो, पण आपले शरीर व जीवन इतके अनमोल आहे, त्यासाठी आपण निष्काळजीपणा का करतो? आपला आहार, आपला व्यायाम याकडे पूर्ण दुर्लक्ष करतोच; पण एखादी शस्त्रक्रिया उदा. गर्भाशय काढण्याचा सल्ला मिळाल्यानंतर आपण त्याची खातरजमा का करून घेत नाही? केवळ सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहून सल्ला मिळालेला बरोबर नसतो. वैद्यकीय शास्त्रात फक्‍त शरीराचा तेवढाच भाग तपासून संपूर्ण निदान करणे शक्य नसते. रुग्ण आपले शरीर घेऊन दवाखान्यात येतो, तेव्हा त्याची सखोल चौकशी, मागील आजार कोणते, आता असलेले आजार, नाडीचे ठोके, अ‍ॅनिमिया, ब्लडप्रेशर, श्‍वासोच्छ्वास यापासून ते संपूर्ण शारीरिक तपासणी व नंतर रक्‍ताची चाचणी व गरजेनुसार केलेली क्ष-किरण तपासणी, सोनोग्राफी, सीटीस्कॅन, एमआरआय अशा सर्व तपासण्यांती त्याचे अचूक निदान करता येते. एकदा निदान झाले की त्यावरील उपचारासाठी दोन ते तीन दिवस स्त्री रोग व प्रसूती शास्त्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय गर्भाशय काढणे हे थोडे धाडसाचे व धोकादायक होईल. बर्‍याच वेळेस एखाद्या नर्सिंग होममध्ये जिथे त्या स्त्रीच्या भावी जीवनाचा विचार करून सल्ला देण्यास स्त्री रोग व प्रसूती शास्त्र तज्ज्ञ उपलब्ध नसतो व तिचे गर्भाशय काढण्याचा सल्ला मिळतो. मग व्हिजीटिंग डॉक्टर येऊन गर्भाशयाची शस्त्रक्रिया होते हे थोडे धोकादायक चित्र आहे. 

शस्त्रक्रियेचा सल्ला देणार्‍याबरोबर शस्त्रक्रिया करणार्‍या वैद्यकीय तज्ज्ञाने याबाबतीत त्या पेशंटशी शस्त्रक्रियेबद्दल समुपदेशन करून खात्री करून गर्भाशय काढणे हे त्याचे कर्तव्य आहे. आज हा विषय इतका ज्वलंत होण्यामागे हे सुद्धा एक कारण झालेले दिसते. म्हणून गर्भाशयाच्या विकारांबाबत केवळ आणि केवळ दोन स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय गर्भाशयाची शस्त्रक्रिया करून घेणे म्हणजे त्यातून उद्भवणार्‍या दुष्परिणामाला आमंत्रण देणे होय. म्हणून वैद्यकीय शास्त्रामध्ये तज्ज्ञांनीसुद्ध शस्त्रक्रियेचाच विचार न करता शस्त्रक्रियेपूर्वीच्या चाचण्या करून समुपदेशन करावे लागते. तसेच योग्य मार्गाने योग्य ती शस्त्रक्रिया करावी लागते. तसेच त्यानंतर लगेच होणारे व दूरगामी दुष्परिणामाचा सखोल विचार करूनच सर्व निर्णय (Final Decision) घ्यावे लागतात. 

आपला रुग्ण हा आपल्या नातेवाईक, कुटुंबातच आहे, असे समजून जर आपण वैद्यकीय व्यवसाय केला तर आता होत असलेले डॉक्टरांवरचे हल्ले थोडेफार कमी होतील, असे वाटते. पुढील लेखात गर्भाशयाचा अतिरिक्‍त रक्‍तस्राव व इतर गाठींबद्दल पाहू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news