मीठ आणि आरोग्य | पुढारी

Published on
Updated on

आहारातील महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ. मिठाशिवाय अन्नाला चव नाही. म्हणूनच याला रसांचा राजा म्हणतात. नैसर्गिक मिठामध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असते. याला शास्त्रीय भाषेत सोडियम क्लोराईड लवण असे म्हटले जाते. अर्थात, मिठाचे प्रमाण आहारात चवीपुरतेच असावे. त्याचे प्रमाण जास्त झाले तर शरीराच्या उत्सर्जन कार्यात अडथळा येतो. मीठ अधिक खाल्ल्यामुळे पित्तप्रकोप होतो. रक्‍ताच्या गतीमध्ये वाढ होते. तहान लागते, मूर्च्छा येते. दात पडतात, चेहर्‍यावर सुरकुत्या येतात, केस पांढरे होतात. जीभ कोरडी होते. मूत्रपिंडाचे कार्य वाढते, हात, पाय, चेहरा, पोट यावर सूज येते. याउलट  शरीरातील मीठाचे प्रमाण कमी झाल्यास अशक्‍तपणा येतो. त्वचा ढिली पडते. पोटर्‍यामध्ये गोळे येतात. वजन कमी होते. डोळे खोल जातात. मानसिक दुर्बलता जाणवते. हृदयाच्या कार्यात फरक पडतो.

पूर्वी काळे खडे मीठ मिळत असे. ते क्षारयुक्‍त होते.त्यात नैसर्गिक आयोडिन असे. आता पांढरे शुभ्र रिफाईंड मीठ मिळते व वरून आयोडिन हा रासायनिक घटक मिसळला जातो. हे कृत्रिम मीठ शरीराला फारच घातक असते. कारण, त्यातील सर्व क्षारच नष्ट झालेले असतात. त्याचा वापर आहारात अगदी चवीपुरताच करणे योग्य आहे. खरे पाहता भाज्या, पालेभाज्या, फळे या नैसर्गिक खाद्यपदार्थांत योग्य प्रमाणात मीठ असतेच; पण भाज्या नैसर्गिक स्वरूपात कच्च्या खाव्यात आणि चिरण्यापूर्वी धुवाव्यात. आयुर्वेदात मीठाचे पाच प्रकार सांगितले आहेत.   त्यांना पंचलवण असे म्हणतात.

1) सामुद्र : हे समुद्रापासून मिळते. समुद्र किनारी वाफे तयार करून त्यात समुद्राचे पाणी साठवले जाते आणि सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते व मीठ खाली राहते. मीठ तयार करणार्‍या अशा जागांना मिठागरेे असे म्हणतात. हे मीठ खारट, पचण्यास जड, पित्तकर व कफवर्धक असते.

2) सैंधव : यालाच शेंदेलोण असे म्हणतात. हे उत्तम प्रतीचे औषधी मीठ असते. ते पाचक त्रिदोषनाशक, आरोग्यकारक असते. इतर मीठ वर्ज्य केले असले, तरी सैंधव खायला हरकत नाही.

3) सौर्वचल : यालाच पादेलोण असेही म्हणतात. हे जमिनीतून मिळवले जाते. त्याचा रंग फिकट गुलाबी असतो. ते तिखट, उष्ण असून, उत्कृष्ट रेचकही असते.

4) बीउलण : याचा वापर औषधात केला जताो.

5) सांबरलवण : हे सांबर सरोवरातून मिळते. ते अधिक खारट, पित्तकारक व कफनाशक असते.

– मोना भावसार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news