

डॉ. महेश बरामदे
भारतात 25 ते 35 वर्ष वयोगटातील अनेक तरुण अँकिलुजिंग स्पॉन्डिलायटिसच्या समस्येने ग्रस्त आहेत. सर्वसाधारणपणे हा त्रास कोणालाही होऊ शकतो; पण किशोरावस्था किंवा 20-30 वर्षांच्या तरुणांमध्ये ही समस्या खूप सामान्य आहे.
डॉक्टरांच्या मते अँकिलुजिंग स्पॉन्डिलायटिस हा रोग सर्वसामान्यपणे तरुण पुरुषांमध्ये आढळून येतो. या आजाराचे बहुतांश रुग्ण हे 40 वर्षापेक्षा कमी वयाचे असल्याचे आढळते. पाठीच्या खालच्या भागात वेदना हे याचे सर्वसाधारण लक्षण आहे. आराम करायला पाठ टेकली किंवा झोपताना या वेदना वाढतात आणि काम करताना किंवा व्यायाम केल्यावर या वेदना कमी होतात. ही स्थिती संधिवाताच्या विविध प्रकारांपैकी एक असून या आजाराकडे सुरुवातीला दुर्लक्ष होते. कारण, सुरुवातीच्या टप्प्यात ही केवळ ‘पाठदुखी’ किंवा ‘झोपेतून उठल्यावर थोडा वेळ कंबरेत ताठरपणा’ इतपत वाटू शकते; मात्र त्याकडे वेळेवर लक्ष न दिल्यास शरीराची उठबस, चालणे अशा सर्व मूलभूत हालचालींवर गंभीर परिणाम होतो.
या रोगाची स्थिती जशी पुढे जाते तसे पाठीच्या वरचा भाग आणि मानेत कडकपणा येण्याची शक्यता वाढते. अँकिलुजिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये मणक्याच्या सांध्यांना इजा झाल्याने पुढे जाऊन गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. अँकिलुजिंग स्पॉन्डिलायटिस मध्ये काही रुग्णांच्या पाठीचा लवचिकपणा जातो तेव्हा काही प्रकरणात रुग्ण व्हिलचेअरवर आश्रित होतात.
अँकिलुजिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये सर्वसाधारण वेदनाशामक औषधांमुळे वेदना कमी होतात आणि आराम मिळण्यास मदत होते; पण हा आराम काही काळच मिळतो. या आजारावर बायोलॉजिक्ससारखी नवीन आणि अधिक प्रभावी औषधे या रोगांच्या उपचारात प्रभावी मानली गेली आहेत. त्यामुळे रोगाचा प्रसार होत नाही. बायोलॉजिक्समुळे अँकिलुजिंग स्पॉन्डिलायटिसने पीडित जगातील अनेक लोकांच्या आयुष्यात बदल घडवला आहे. हे औषध आता भारतातही मिळू लागले आहे; पण ते वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेणे योग्य नाही.
विविध औषधोपचारांसह रुग्णाच्या आयुष्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी फिजिओथेरेपी, हायड्रोथेरेपी, व्यायाम आणि शारीरिक अवस्था यांच्यामध्ये सुधारणा करण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णाने सांध्यावर ताण, भार पडू नये, यासाठी वजन नियंत्रित ठेवले पाहिजे. त्याशिवाय अँकिलुजिंग स्पॉन्डिलायटिसच्या रुग्णांमध्ये जळजळ वाटणे, वेदनांची आवेग कमी करण्यासाठी शारीरिक ठेवण योग्य राखणे गरजेचे असते.