तुम्‍हाला झोप येत नाही? जाणून घ्‍या कारण...

निद्रानाशाचा दैनंदिन कामासह जीवनशैलीवरही होतो परिणाम
What is the remedy for insomnia?
निद्रानाशावर उपाय.Pudhari File Photo
Published on
Updated on
डॉ. संजय गायकवाड

प्रमाणाबाहेर गॅझेटस् वापरणं, आहार-विहाराच्या चित्रविचित्र सवयी आणि भविष्याची अवाजवी चिंता ही निद्रानाशामागची कारणं असल्याचं दिसून येतंय. या निद्रानाशावर काही उपाय आहेत.

झोप लागत नाही, लागली तरी ज्याला ‘साऊंड स्लीप’ असं म्हणतात ती अनुभवायला मिळत नाही, असं म्हणणार्‍या तरुणांचीही संख्या आता वाढताना दिसत आहे. निद्रानाशामुळे त्यांच्या दैनंदिन कामावर, जीवनशैलीवरही परिणाम जाणवू लागले आहेत.

झोपेचा प्रश्न हा आता अपवाद राहिलेला नाही, ही आता आपल्याकडे एक वस्तुस्थिती बनून समोर येत आहे. या प्रश्नाने जवळपास गंभीर स्वरूप धारण केल्याचं दिसत आहे. हा घरोघरीचा प्रश्न बनत चालल्याची शंकाही अनेक तज्ज्ञ व्यक्त करू लागले आहेत. निद्रानाशाशी संबंधित नानाविध समस्यांबद्दल हल्ली लोक बोलायला लागले आहेत. पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत अनेकांना झोप लागत नाही. पहाटे चार वाजता झोप लागते. या व्यक्ती सकाळी उशिरा उठतात. या प्रकाराला झोपेच्या वेळा पुढे ढकलणं, असं म्हटलं जातं. 15 ते 30 वयातील कॉलेजवयीन तरुणांमध्ये हा आजार अधिक दिसून येतो, असे आकडेवारी सांगते. तरुणांना निद्रानाश असल्याचं आजवर कधी दिसून आलं नव्हतं. संगणक, मोबाईल, टीव्ही यांसारख्या गॅझेटस्मुळे 20 ते 30 वयातील तरुणांना रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही. अनेकदा झोपमोड होते. झोपमोड होण्यामागे गॅझेटस् हे अनेक कारणांमधलं एक महत्त्वाचं कारण म्हणून आता समोर येऊ लागलं आहे. झोप होत नाही म्हणून दुपारी बारा वाजेपर्यंत ही तरुण मंडळी झोपतात. त्यांचं झोपेचं वेळापत्रक वेगळं असलं, तरी आठ तासांची झोप होते. रात्री झोपेच्या वेळा न पाळणं, उशिरा जीमला जाणं, अशा कारणांमुळे झोपेच्या वेळा पुढे जाण्याची समस्या जाणवते. चाळिशीनंतर झोप न येणार्‍यांचं प्रमाणही सारखंच आहे. पुरेशी झोप न झाल्याने दुसर्‍या दिवशी अशक्तपणा वाटणं, दिवसा झोपणं, थकवा येणं यांसारखी लक्षणंही अनेकांना जाणवतात. थोडक्यात म्हणजे झोपेचं बिघडलेलं गणित आरोग्याचं गणितही आता बिघडवून टाकू लागलं आहे.

निद्रानाशमुक्त व्हायचं असेल किंवा किमान निद्रानाशाचा त्रास कमी करत न्यायचा असेल, तर पुढील काही गोष्टी करून पाहता येतील. रात्रीच्या झोपेची वेळ निश्चित ठेवणं, एकंदरच झोपेच्या वेळा आणि त्याबाबतची शिस्त पाळणं, रात्रीच्या वेळी टीव्ही-मोबाईल-संगणकाचा वापर टाळणं, झोपताना रूम टेंपरेचर आणि वातावरण साधारण ठेवणं, झोपण्यापूर्वी दोन तास आधी जेवणं, रात्री हलकं जेवण घेणं, रात्रीची जीम टाळणं, झोप येत नसल्यास गरम पाण्यानं अंघोळ करणं, रात्री डोक्यात विचार फिरत राहिल्यास त्याची नोंद ठेवणं; जेणेकरून निद्रानाशाबाबत उपचार घेण्यासाठी तज्ञाची भेट घेतलीत तर त्या नोंदींचा उपयोग होऊ शकतो. तुम्हाला कुठल्या विचारचक्रामुळे झोप येत नाहीये ते समजून यायला त्याद्वारे मदत मिळू शकते.

हल्ली अनेक जणांच्या बाबतीत असं घडतं की, काल झोप लागली नाहीये, सकाळी ऑफिस आहे. त्यासाठी अनेक जण वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करतात. वीज, खिडक्या बंद करतात. पंखे, एसी सुरू ठेवतात. कोणताही आवाज येणार नाही, याची काळजी घेतात. झोप येईल का, या चिंतेनं ते बिछान्यावर पडतात; मात्र त्यांना झोप लागत नाही. रात्री झोप लागत नसल्याची चिंता मेंदूला जागृत करते. छोट्या गोष्टींकडे लक्ष जातं. कुत्र्याचं भुंकणं, गाण्यांचा आवाज येणं, दोन वाजले तरी झोप येत नाही, अशा प्रकारची चिंता वाढत जाते. स्वतःची झोपण्याची पद्धत, उद्याचा दिनक्रम, कालची न लागलेली झोप, यांतून उद्याची झोप चांगली लागेल का, या विचारातून निद्रानाशाचं चक्र सुरू होतं. यामागे कारण काय आहे, हेदेखील जाणून घेणं अत्यावश्यक आहे.

सामान्यत: रात्रीच्या जागरणामुळे झोपण्याचं चक्र बदलते. ताणतणाव, कामाचा ताण यांमुळे मेंदूवर परिणाम होतो. मेंदूत ‘मिलॅटोनिन’ हे हार्मोन असतं. रात्री झोपताना हा घटक निर्माण होतो. आपलं जैविक घड्याळ झोपण्यावेळी मेंदूतील ‘मिलॅटोनिन’ हार्मोन निर्माण करतं. मग झोपण्याची वेळ झाली आहे, हे मेंदूला कळतं. त्यावेळी झोपणं अपेक्षित असतं. झोपेच्या वेळा बदलल्याने ‘मिलॅटोनिन’ हा घटक कधी निर्माण करायचा, यावर परिणाम होतो. बायोलॉजिकल घड्याळही बिघडतं. थोडक्यात, आरोग्याचं घड्याळ बिघडवायला चिंता कारणीभूत ठरते. आजच्या तरुण-तरुणींशी बोलताना तर हा ट्रेंड लक्षात येतोच; पण झोप न लागण्याचं प्रमुख कारण चिंता असल्याचं अनेक मानसोपचार तज्ज्ञही आवर्जून सांगतात आणि त्याचबरोबर हा ट्रेंड आरोग्य हितकारक नसल्याची पुस्तीही जोडतात म्हणूनच आपण चाळिशीच्या पुढच्या वयाचे असो वा ऐन तारुण्यातले; सुज्ञाने यावरून बोध घ्यायला हवा. आपल्या सुद़ृढ आरोग्यासाठी झोपेचं असलेलं महत्त्व जाणून चिंतेचा किडा आपला आयुष्यातून जितका जमेल तितका जास्तीत जास्त दूरच ठेवायला हवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news