

शरीराच्या आरोग्यासाठी आणि शारीरिक कार्ये उत्तमरीत्या चालण्यासाठी आवश्यक असणारी प्रथिने अनेक प्रकारे उपकारक असतात. मेंदूमधील न्युरॉन्सचा संवाद व त्यांची तंदुरुस्ती प्रोटीनवर अवलंबून असते. प्रथिनांमध्ये असलेले अॅमिनो अॅसिडस् हे मेंदूतील डोपामिन व सेरोटोनिनसारखे न्यूरोट्रान्समीटर बनवण्यासाठी गरजेचे असतात. स्मरणशक्ती व मेंदूचे एन्झाईम्स हेही प्रोटीनवर आधारित असतात. त्यामुळे फक्त फॅटस् पुरेसे नाहीत, तर मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी प्रोटीनसुद्धा आवश्यक आहेत.
आपल्या मणक्याची हाडे, डिस्क्स आणि कनेक्टिव्ह टिश्यूज म्हणजेच परस्परांना जोडणारी ऊतके हे सर्व कोलेजन नावाच्या प्रोटीनपासून बनलेले असतात. काही वेळा अपघाताने मणक्याची शस्त्रक्रिया करण्याची गरज येते. अशा वेळी सर्जरीनंतर बरे होण्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे. शरीरातील ऊती, स्नायू, आणि मेंदू पुन्हा व्यवस्थित होण्यासाठी प्रोटीनची भूमिका महत्त्वाची आहे. जखम आणि सूज कमी करण्यासाठीही प्रोटीन आवश्यक आहे. त्यामुळे ऑपरेशननंतरच्या काळात बरे होण्याची प्रक्रिया वेगवान होते.
सार्कोपेनिया (वृद्धापकाळातील स्नायूंची झीज) टाळण्यासाठी प्रोटीनचे नियमित सेवन आवश्यक आहे. स्नायू कमजोर झाले की, पाठदुखी, सांधेदुखी सुरू होतेआणि याचं मूळ बहुतेक वेळा कमी प्रोटीन सेवन असतं. प्रोटीनमुळे स्नायूंची दुरुस्ती, समतोल राखणे आणि ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे दरदिवशी पुरेसं प्रोटीन मिळणं गरजेचं आहे.