

प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांच्या प्रजनन प्रणालीशी संबंधित असणारा कर्करोग आहे. शरीरातील प्रोस्टेट ग्रंथी या युरीन सिस्टीमचा एक महत्त्वाचा भाग असतात. मूत्रमार्गाच्या आसपास असणार्या या ग्रंथी वीर्य उत्पादनात मदत करतात. प्रोस्टेट कॅन्सर होण्याची नेमकी कारणे अजून स्पष्टपणे समजलेली नसली, तरी यासंदर्भात काही निरीक्षणे महत्त्वाची आहेत.
* वयोमानानुसार प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. विशेषत: 50 वर्षांवरील पुरुषांमध्ये याचा धोका अधिक असतो. त्यातही कुटुंबात प्रोस्टेट कॅन्सर असलेल्यांना याचा धोका अधिक असतो. पचनास जड पदार्थ, चरबीयुक्त आहार दीर्घकाळ घेणे, कमी शारीरिक सक्रियता यामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. पुरुषांमध्ये असलेल्या अॅन्ड्रोजन हॉर्मोनचा (विशेषत: टेस्टोस्टेरोन) प्रोस्टेट कॅन्सरशी संबंध असू शकतो.
प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यावर बहुतेकदा दिसत नाहीत; परंतु कॅन्सर वाढल्यानंतर काही सामान्य लक्षणे दिसू शकतात. यामध्ये मूत्र प्रवाहात अडचण येणे, वारंवार लघवी येणे, पायांच्या किंवा पोटाच्या खालच्या भागात वेदना होणे, शरीरात थकवा जाणवणे ही याची प्राथमिक लक्षणे आहेत.
प्रोस्टेट कॅन्सरचे निदान करण्यासाठी प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजेन टेस्टही केली जाते. यामध्ये रक्तातील पीएसए पातळी मोजली जाते. हे एक प्रकारचे प्रथिन असून त्याची पातळी अधिक आहे का, हे या चाचणीत तपासले जाते. 10 पेक्षा जास्त असल्यास प्रोस्टेट कर्करोगाचा धोका 50 टक्क्यांनी वाढतो. अर्थात, उच्च पीएसए हा नेहमीच प्रोस्टेट कर्करोगाशी संबंधित नसतो, तो प्रोस्टेटमधील इतर समस्यांचा परिणाम देखील असू शकतो. याखेरीज डीआरई टेस्टमधूनही या व्याधीचे निदान होऊ शकते. प्रोस्टेट कॅन्सरचे अंतिम निदान बायोप्सीच्या माध्यमातून होते. यामध्ये प्रोस्टेट ग्रंथीतून एक लहान भाग घेतला जातो आणि त्यावर चाचणी केली जाते.
प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचाराच्या पद्धती कॅन्सरच्या टप्प्यावर आणि रुग्णाच्या वयावर अवलंबून असतात. सुरुवातीच्या टप्प्यात प्रोस्टेट ग्रंथी काढण्याची शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. याशिवाय किमोथेरपीद्वारे कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी औषधांचा वापर करता येऊ शकतो. याखेरीज कॅन्सर पेशींचा नाश करण्यासाठी रेडिएशनचा वापरही केला जातो. या व्याधीमध्ये टेस्टोस्टेरोन कमी करण्यासाठी हार्मोनल उपचारही केले जातात. काही प्रकरणांमध्ये कॅन्सर खूप संथ गतीने वाढत असल्यामुळे उपचार सुरू करण्याआधी निगराणी ठेवली जाते. प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचारांचे यश रुग्णाच्या आरोग्य स्थितीवर आणि कॅन्सरच्या टप्प्यावर अवलंबून असते. बहुतांश अभ्यासांनुसार कुटुंबात प्रोस्टेट किंवा स्तनाचा कर्करोग झाला असल्यास तुम्हाला हा कर्करोग होण्याची भीती जास्त असते. त्यामुळे साधारणतः पन्नाशीच्या टप्प्यावर याबाबत तपासणी करून घेणे हिताचे ठरते.