

बदलत्या काळात एअर कंडिशनर हा अनेक जणांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अनेक लोक घरात किंवा ऑफिसमध्ये बरेच तास वातानुकूलित (एसी) खोलीत राहतात; परंतु डोळ्यांवर त्याचे दुष्परिणाम हळूहळू जाणवू लागतात. ते समजून घेणे गरजेचे आहे.
1. डोळे कोरडे पडणे ः एसीमध्ये सतत बसल्यामुळे कोरड्या डोळ्यांची समस्या अधिक तीव्र होऊ शकते. बंद खोलीत एसी चालू असताना त्यामधून धूळ, परागकण, बुरशी यांसारखे घटक हवेत पसरतात. यामुळे डोळ्यांच्या आसपास खाज, पुरळ किंवा अॅलर्जी होण्याचा धोका वाढतो. विशेषतः ज्यांना आधीपासूनच डोळ्यांची कोरडेपणाची तक्रार आहे किंवा जे काँटॅक्ट लेन्स वापरतात, त्यांच्यासाठी ही स्थिती अधिक गंभीर ठरते. दीर्घकालीन कोरडेपणा कॉर्नियाचे नुकसान करू शकतो.
2. नैसर्गिक ओलावा कमी होणे ः एसी शरीरातून घाम आणि उष्णता कमी करत असतो; पण त्याचबरोबर डोळ्यांसह त्वचा, घसा, नाक यातील नैसर्गिक ओलावाही कमी करतो. डोळ्यांतील श्लेष्मल त्वचेला या कोरडेपणाचा फटका बसतो. त्यामुळे डोळ्यांची बॅक्टेरिया व विषाणूंविरुद्ध लढण्याची क्षमता कमी होते. याचा परिणाम म्हणून डोळे चुरचुरणे, लालसरपणा किंवा सौम्य वेदनाही होऊ शकते.
3. द़ृष्टी धूसर होणे ः डोळ्यांतील स्नेहक घटक कमी झाल्यामुळे डोळ्यांचा पृष्ठभाग सुरळीत राहत नाही. यामुळे ब्लर व्हिजन म्हणजेच धूसर दिसणे हे लक्षण दिसू शकते. सतत एसीत बसल्यामुळे ही समस्या वाढू शकते.
4. डोळ्यांमध्ये संसर्गाचा धोका वाढणे : डोळ्यातील अश्रूंच्या थरात जेव्हा ओलावा कमी होतो, तेव्हा तो थर संक्रमणापासून संरक्षण करण्यास कमी प्रभावी ठरतो. यामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढतो. एसीमध्ये बसल्यामुळे डिहायड्रेशन, थकवा, त्वचा कोरडी होणे, डोकेदुखी, श्वसनाचे त्रास, अॅलर्जी व दम्यासारख्या तक्रारी देखील वाढू शकतात. एसीची सफाई योग्य वेळेत नसेल, तर त्यातून सूक्ष्म बुरशी व इतर घातक कण हवेत मिसळतात आणि श्वसनाचे व डोळ्यांचे आजार होऊ शकतात.
5. लक्षणांकडे दुर्लक्ष नको! : डोळे चुरचुरणे, कोरडेपणा यावर स्नेहक (ल्युब्रिकेटिंग) आय ड्रॉप्स उपयोगी ठरू शकतात; मात्र सतत डोळ्यांत वेदना, धूसर द़ृष्टी, प्रकाशाची भीती किंवा तीव्र खाज असेल, तर नेत्रतज्ज्ञांचा सल्ला तातडीने घ्या. स्वतःहून औषधं घेणं धोकादायक ठरू शकतं. कारण, त्याने मूळ आजार दुर्लक्षिला जाऊ शकतो. तथापि, कालांतराने अधिक गंभीर स्वरूपात ही समस्या समोर येऊ शकते.
* दर 20 मिनिटांनी, 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर पाहा. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो.
* बाहेर गेल्यावर धूळ किंवा प्रदूषण असल्यास डोळ्यांना संरक्षण देण्यासाठी चष्मा वापरणं उपयुक्त ठरतं.
* विशेषतः एसी सतत चालू असलेल्या खोलीत ह्युमिडिफायर वापरल्यास हवेत ओलावा टिकवून ठेवता येतो.
* भरपूर पाणी प्या, आहारात डोळ्यांसाठी फायदेशीर व्हिटॅमिन-एयुक्त पदार्थ (जसे गाजर, पालक, टोमॅटो) घ्या. स्क्रीन वापरताना नियमित डोळ्यांची उघडझाप करा.
* एसी किंवा स्क्रीन वापर कमी करणं शक्य नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रिझर्वेटिव्ह-फ्री आयड्रॉप्स वापरा.
* डोळ्यांची नियमित तपासणी केल्यास सुरुवातीच्या टप्प्यातच ड्राय आय सिंड्रोम ओळखता येतो आणि गंभीर नुकसान टाळता येते.