मूत्रपिंडाच्या आजारापासून करा बचाव

सर्व वयोगटातील लोकांमध्ये मूत्रपिंडाच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे
Prevent kidney disease
मूत्रपिंडाच्या आजारापासून करा बचावPudhari File Photo
Published on
Updated on
डॉ. अमर कुलकर्णी

सर्व वयोगटातील लोकांमध्ये मूत्रपिंडाच्या आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. चांगल्या आरोग्यासाठी मूत्रपिंडांचे आरोग्य चांगले राखणे गरजेचे आहे. जीवनशैलीत योग्य बदल केल्यास मूत्रपिंडाच्या आजारास प्रतिबंध करता येतो आणि जीवनमान सुधारता येते.

भारतातील लाखो लोक मूत्रपिंडाच्या आजाराने पीडित आहेत. आपल्या शरीरातील कचरा मूत्राद्वारे शरीराच्या बाहेर फेकणे हे याचं मुख्य कार्य असतं. मूत्रपिंड रक्तामध्ये आढळणारे टाकाऊ पदार्थ, शरीरासाठी अनावश्यक असलेली अतिरिक्त खनिजे लघवीवाटे बाहेर काढून टाकते आणि शुद्ध रक्त संपूर्ण शरीरात वितरीत करते. जेव्हा मूत्रपिंडाचे कार्य कमी होतेकिंवा बिघडते, तेव्हा शरीरात हानिकारक विषारी पदार्थ तयार होतात, ज्यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याच्या गंभीर गुंतागुंत वाढू लागतात. मूत्रपिंडाचा आजार हा मधुमेह, उच्च रक्तदाब, अनुवांशिकता, संसर्ग अशा विविध कारणांमुळे होऊ शकतो. यासाठी वेळीच निदान करणे गरजेचे आहे, कारण सुरुवातीला बर्‍याचदा मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे दिसून येत नाही. सामान्य लक्षणांमध्ये पाय किंवा चेहर्‍यावर सूज येणे, लघवीवाटे रक्त येणे, थकवा येणे, मळमळ आणि रक्तदाब कमी- जास्त होणे यांचा समावेश होतो. मात्र ही लक्षणे दिसताच घाबरून जाऊ नये, कारण निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून मूत्रपिंडाचा आजार अनेकदा रोखता येतो. वेळीच निदान केल्याने आजाराची तीव्रता कमी होते.

मूत्रपिंडास निरोगी ठेवण्यासाठी आणि मूत्रपिंडाच्या आजारापासून बचाव करण्यासाठी काही टिप्स देण्यात आल्या आहेत त्याचे पालन करावे.

भरपूर पाणी प्या व शरीर हायड्रेटेड राखा : तज्ज्ञांनी केलेल्या विविध अभ्यासांनुसार, योग्य हायड्रेशन मूत्रपिंडातील कचरा फिल्टर करण्यास आणि मूत्रपिंडातील खडे ओळखण्यास मदत करते. दिवसातून सुमारे 10 ते 12 ग्लास पाणी प्यायल्यानेशरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत होते. मात्र गरजेपेक्षा जास्त पाणी पिणेही टाळले पाहिजे, विशेषतः मूत्रपिंडासंबंधीच समस्या असलेल्या व्यक्तींनी ओव्हरहायड्रेशन टाळा. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

निरोगी जीवन आणि संतुलित आहाराचे सेवन करा : ताजी फळे, भाज्या आणि तृणधान्ययुक्त समृद्ध आहार निवडल्यास मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. आहारात अतिरिक्त मीठ, प्रक्रिया केलेले अन्न आणि शर्करायुक्त पेयाचे सेवन टाळावे, कारण ते उच्च रक्तदाब आणि मधुमेहासाठी जोखीम घटक ठरतात जे मूत्रपिंडाच्या आजारास कारणीभूत घटक आहेत. बेरी, पालेभाज्या आणि काजू यांसारखे मूत्रपिंडास अनुकूल अन्न पदार्थांचा आहारात समावेश करावा.

रक्तातील साखर उच्च पातळी आणि उच्च रक्तदाबाची वेळोवेळी तपासणी करावी. आहार, व्यायाम आणि औषधांसह (जर आवश्यक असेल तर) रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासणे आणि नियंत्रित करणेयोग्य ठरते. त्यामुळे मूत्रपिंडावरील दाब कमी होऊन मूत्रपिंडाचे दीर्घकालीन नुकसान होणेटळते.

वजन नियंत्रित राखा व नियमित व्यायाम करावा. शारीरिक हालचाली रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. आठवड्यातून पाच वेळा किमान 45 मिनिटे चालणे, पोहणे किंवा सायकलिंग करावे.

नियमित आरोग्य तपासणीसाठी करावी. मूत्रपिंडाच्या समस्या वेळीच ओळखणे आणि वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, विशेषतः मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर ठरते. डॉक्टरांशी नियमितपणे संपर्कात राहावे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेणे टाळावे. या नियमांचे पालन करून मूत्रपिंडांचे आरोग्य चांगले राखू शकता आणि मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका कमी करून निरोगी जीवन जगू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news