

डॉ. निधी शर्मा-चौहान
गर्भधारणा काळात प्रत्येक ऋतूमध्ये विशेष काळजी घेण्याची गरज असते. विशेषत: उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे महिलांना काही अडचणी निर्माण होऊ शकतात.
उन्हाळ्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता). उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, जे आई आणि बाळ दोघांसाठीही घातक ठरू शकते. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी लिंबूपाणी किंवा नारळपाणी यांचा वापर करता येतो. फळांचे ज्यूस कधीकधी घेता येतात; पण ते नेहमी घरी ताजे तयार केलेले असावेत. पूर्ण फळे खाणे अधिक फायदेशीर असते. कारण, त्यामुळे शरीरात फायबर टिकून राहते.
कपड्यांची निवड करताना उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्यामुळे सैल आणि सुती कपडे वापरणे योग्य ठरते. सिंथेटिक कपडे टाळावेत. कारण, ते उष्णता अडकवतात आणि त्यामुळे त्वचेसंबंधित त्रास होऊ शकतो. दिवसभर घरातच राहणे गरजेचे नसले, तरी दुपारी 12 ते 4 किंवा 5 या वेळेत बाहेर जाणे टाळावे. बाहेर जाणे आवश्यकच असेल, तर छत्रीचा वापर करावा आणि शरीर हायड्रेट ठेवावे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी हलका फेरफटका मारणे सुरक्षित आणि फायदेशीर असते.
आहाराची काळजी घेताना उन्हाळ्यात अन्न दूषित होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे नेहमी घरचे ताजे आणि शिजवलेले अन्न खावे. बाहेरचे अन्न टाळावे. कारण, ते ताजे असेल याची खात्री नसते आणि संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. बाजारात मिळणारी कापलेली फळे खाऊ नयेत. फळे नेहमी घरी धुऊन कापून खावीत.
गर्भवती महिलांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत आणि तपासण्या चुकवू नयेत. उन्हाळ्यात थकवा आणि भूक कमी होऊ शकते. अशावेळी थोडे-थोडे करून वारंवार खाणे योग्य ठरते, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा आणि साखरेचे प्रमाण संतुलित राहते. हंगामी फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा. टरबूज, खरबूज, संत्री यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे विशेषतः उपयुक्त असतात. आंबा खाऊ शकता; पण प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा. गोठवलेले (फ्रोजन) आणि प्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) अन्न टाळावे. ताजे आणि हंगामी अन्न घेणे नेहमीच अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी असते.
उन्हाळ्यात अशा साध्या गोष्टींची काळजी घेतल्यास गर्भधारणा सुरक्षितपणे पार पाडता येते. पुरेसे पाणी पिणे, ताजे अन्न खाणे, कडक उन्हात बाहेर न जाणे, आरामदायक कपडे घालणे आणि नियमित वैद्यकीय तपासणी करणे या छोट्या गोष्टी आई आणि बाळ या दोघांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.