डॉ. प्रवीण हेन्द्रे
प्रसूतीपूर्व तपासणी व उपचार अर्थात ANC Care चे मूळ उद्देश व उद्दिष्ट एकच आहे, म्हणजे गरोदरपणाचे पर्यावसन एका सुदृढ माता व सुदृढ बालकामध्ये व्हावे, हे होय. त्यासाठी आपण खालील काही ठळक बाबींचा उहापोह करणे गरजेचे आहे.
1) गरोदरपणात होणारे सामान्य शारीरिक बदल Physiological Changes in Human body in Pregancy.
2) 9 महिन्यांच्या गरोदरपणाच्या कालावधीत व गरोदरपणानंतर 6 आठवड्यांच्या काळात होणारे सामान्य बदल व समस्या.
3) या समस्या निर्माण झाल्या आहेत किंवा गरोदरपण सामान्यपणे चालले आहे, हे जाणून घेण्यासाठीच्या विविध चाचण्या.
4) गरोदरपणात निर्माण झालेल्या काही समस्यांचे ढोबळमानाने केलेले उपचार.
चांगल्या मिळालेल्या प्रसूतीपूर्व तपासणी व उपचारामुळे गरोदरपणामुळे होणारे आजार व समस्या कमी होण्यास मदत होते. हे पाश्चिमात्य देशातील अनुभवाने सिद्ध झालेले आहे. परंतु, गरोदरपणामुळे मुळातच शरीर विज्ञानात होणार्या नैसर्गिक बदलामुळे काही समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढत असते, हे जाणून घेणे गरजेचे आहे. चांगल्या मिळालेल्या ANC Care मुळे सुदृढ माता व बालक तर होतेच, परंतु त्यानंतर होणार्या अनारोग्यापासून बचाव करता येतो. गरोदरपण हा एक स्त्रीच्या जीवनातील सामान्य वैज्ञानिक घटना आहे व तो कोणताही आजार अथवा रोग नाही, हे समजून घेणे खूपच गरजेचे आहे. तेव्हा या काळात स्त्रीच्या शारीरिक तसेच मानसिक गरजांची जाणीव कुटुंबातील सर्व घटकांना असणे गरजेचे आहे. त्यातल्या त्यात आता आपल्या कार्यकुशल महिलांना नोकरीसाठी घराबाहेर पडावे लागत असल्यामुळे वेळेवर समतोल आहार व पुरेशी विश्रांती मिळणे दुरापास्त झालेले दिसते. तेव्हा अशा काळात तरी तिच्याशी संबंधित सर्व घटकांनी तिच्या नाजूक परिस्थितीची दखल घेऊन तिचे जीवनमान सुलभ, सुखी व आनंदी करायला मदत करणे गरजेचे आहे.
पौराणिक गोष्टींमध्ये अभिमन्यूने द्रौपदीच्या उदर पोकळीमध्ये असताना चक्रव्यूह भेदण्याची पद्धती आपले मामा श्रीकृष्ण यांच्या तोंडून ऐकली होती व त्याला आईच्या पोटातून 'हुंकार' रुपी प्रतिसाद दिला होता. याचा संदर्भ आढळतो. इतके तरी नाही परंतु आधुनिक वैद्यकीय शास्त्रांतर्गत आईच्या पोटातील गर्भाला थोडेफार ऐकू येते. हे सिद्ध करण्याचे काही सिद्धांत अभिवृद्ध केलेले आढळतात. आईच्या पोटात मूल असताना गर्भाशय व त्याच्या आतील पाण्यामध्ये बाळ सुरक्षित असते. तेव्हा त्याला आपल्या आईच्या हृदयाची स्पंदने, त्याची लय याची सवय असते. बाळ जन्मल्यानंतर जेव्हा ते रडायला लागते, तेव्हा आईने त्याला छातीशी धरले की, त्याला पोटातील सुरक्षित वातावरणाचा भास आईच्या हृदयाच्या स्पंदनाच्या लयीमधून ऐकून होतो व बाळ शांत होते. हे आपण सर्वांनी पाहिले आहेच. परंतु, अमेरिकेत एका संशोधनाद्वारे मूल जन्मल्यानंतर पिता म्हणून स्वीकारण्याची मुलामधील जाणीव किंवा क्रिया ही जर पिता आईच्या गरोदरपणामध्ये तिच्यासोबत राहात असेल, तर लवकर होते.
हे सिद्ध केलेले आहे. आई, वडील हे आईच्या गरोदरपण काळात एकत्र सहवासात असल्यास मूल वडिलांचा स्वीकार लवकर करते व तेच सैन्यात काम करणारा पिता किंवा काही कामानिमित्त आईपासून दूर राहणारे पालकाचा पिता म्हणून स्वीकार करताना फरक या प्रयोगाद्वारे त्यांनी सिद्ध केलेला आहे. म्हणून गरोदरपण काळात त्या स्त्रीच्या भोवतीचे वातावरण हसतमुख व आल्हाददायक असल्यास होणार्या अपत्यामध्ये चांगले परिणाम होऊ शकतील, यात शंका नाही. म्हणजे साध्यासुध्या वातावरणापासून ते योग्य आहार, योग्य व्यायाम व गरजेप्रमाणे औषधोपचारांनी गरोदरपण सुसह्य होऊ शकते. हे कसे साध्य करायचे ते आता आपण पाहू.
आजही आपण माता मृत्यूवरती संपूर्ण विजय मिळवलेला नाही. अमेरिकेतील माता मृत्यू प्रमाण कमी असले तरी संपूर्ण 100 टक्के बिनधोक नाही हे तिथला mmr म्हणजेच (Material Moratality Rate) पाहून म्हणू शकतो. हा mmr प्रत्येक एक लाख गरोदर स्त्रियांपैकी किती स्त्रियांचा बाळंतपणात किंवा गरोदरपणामुळे मृत्यू होतो, हे दर्शवित असतो. आपल्याकडे भारताचे माता मृत्यूचे प्रमाण प्रत्येक एकलक्ष गरोदर स्त्रियांमागे भारतातील 130 स्त्रियांचा मृत्यू होतो हे प्रमाण केरळमध्ये 46 आहे, तर महाराष्ट्रामध्ये 61 आहे.
म्हणजेच प्रत्येक 1000 गरोदर स्त्रियांमध्ये 0.61 स्त्रिया म्हणजे जवळपास एक स्त्रीस मृत्यूचा धोका आहे. हेच प्रमाण पाश्चिमात्य देशांमध्ये कमी आहे. तरीही आपला 184 देशांमध्ये 129 वा नंबर लागतो. म्हणजे अजून प्रगतीसाठी खूपच वाव आहे असे वाटते. अमेरिकेत MMR 18.8 इतके आहे. तर जगात सर्वात कमी 3 MMR ग्रीस व फिनलंडमध्ये आहे. काही आफ्रिकन, केनिया, कामेरून देशात MMR 500 पेक्षा जास्त आहे. गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये 14.8 वरून अमेरिकेचा MMR 20 पेक्षा जास्त झाला आहे. विकसनशील देशांतील MMR कमी होत असताना अमेरिकेतील MMR वाढणे हा एक विरोधाभास आहे. त्याला तेथील जीवनशैली, मूल होण्यासाठी येत असलेला जास्त वयाच्या प्रौढ स्त्रिया व वयानुरूप त्याच्यात होणारे विविध आजार असे कारण आहे. आता आपण सर्वप्रथम गरोदर पणातील स्त्रीच्या शरीरात होणार्या नैसर्गिक बदलाचा आढावा घेऊ. त्याचबरोबर कराव्या लागणार्या विविध चाचण्या व सोनोग्राफी तसेच होऊ शकणार्या समस्या व त्या झाल्या तर करावे लागणारे उपाय याची चर्चा पुढील लेखात करू.