अपर्णा देवकर
हवा प्रदूषण आणि फुफ्फुसांचा कर्करोग यांचा परस्पर संबंध गेल्या अनेक दशकांपासून ज्ञात आहे. अनेक अभ्यासांतून आता एक गोष्ट सिद्ध झाली आहे, की हवा प्रदूषणामुळे कर्करोगाची जोखीम कैकपटीने वाढते आणि अत्याधिक वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसांव्यतिरिक्त दुसर्या प्रकारच्या कर्करोगही होऊ शकतात. 2013 मध्ये 'इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर' या संस्थेने वातावरणातील हवा प्रदूषणाला कर्करोगाचे प्रमुख कारण मानले आहे.
वायू प्रदूषणाचा परिणाम प्रत्येकावर होतो. हवेमध्ये असणारे अतिसूक्ष्म धुलीकण ज्यांना पार्टिक्युलेट मॅटर किंवा पीएम म्हटले जाते. हा वायू प्रदूषणाचा सर्वात मोठा भाग आहे. पीएम म्हणजे सर्वात सूक्ष्म कण म्हणजे एक मीटरचा 25 लाखाव्या भागापेक्षाही लहान भाग. फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे हे लहान कण.
अनेक संस्था आणि मेटा अॅनॅलिसिसमधून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे, की हवेमध्ये पीएमचे प्रमाण 2.5 पेक्षा अधिक असल्यास फुफ्फुसाच्या कर्करोगाची जोखीम वाढते. ऑन्कोलॉजीतज्ज्ञांनुसार पीएम 2.5 असेल तर होणारे नुकसान फ्री रॅडीकल, मेटल आणि ऑर्गेनिक कॉम्पोन्टटच्या रूपात दिसते. फुफ्फुसांमधून हे कण सहजपणे रक्तात मिसळून फुफ्फुसांच्या पेशींचे नुकसान करतात. त्याशिवाय, त्यांचे ऑक्सिडाईजेशनही होते. परिणामी, शरीराचे नुकसान होते.
पीएम 2.5 च्या पृष्ठभागावर लोह, तांबे, झिंक, मॅगनीज इत्यादी तसेच इतर धातू पदार्थ तसेच धोकादायक पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन आणि लिपोपॉलीसॅकराईड इत्यादींचा समावेश असतो. हे पदार्थ फुफ्फुसात फ्री रॅडीकल तयार होण्याच्या प्रक्रियेला अधिक पुष्टी देतात, तसेच आरोग्यदायी पेशींमध्ये असणार्या डीएनएसाठीही नुकसानकारक असते. पीएम 2.5 शरीराचा दाह होत असेल तरीही होते. शरीराचा होणारा दाह हा रोज होणार्या संसर्गाशी लढण्याची शरीराची एक प्रक्रिया असते; पण पीएम 2.5 मुळे या प्रक्रियेला अतिचालना मिळते आणि त्यामुळे शरीरातील केमिकल अॅक्टिव्हेशन वाढते. पेशींचे असामान्य पद्धतीने विभाजन करून कर्करोगाच्या सुरुवातीचे कारण ठरते.
फुफ्फुसाच्या कर्करोगासंबंधी आकडेवारीचा अभ्यास केला तर कर्करोगाचे 80 हजारांहून अधिक नवी प्रकरणे समोर येतात. त्याशिवाय स्थूलता किंवा मद्यपान हीदेखील यामागची कारणे असू शकतात; पण सर्वाधिक जोखीम आहे ती हवा प्रदूषणामुळे. दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये फुफ्फुसाच्या प्रकरणात 2013-2014 मध्ये 940 असणारा आकडा दुप्पट वाढून 2015-2016 मध्ये 2082 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. ही आकडेवारी शहरामध्ये वाढणार्या वायू प्रदूषणाचे सूचक आहे. धूम्रपान न करणार्या लोकांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये 30- 40 वर्ष वयोगटातील युवक, महिला यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अॅडव्हान्स कर्करोगाने ग्रस्त लोकांमध्ये धूम्रपान न करणार्या लोकांचा समावेश आहे.
डॉक्टरांच्या अनुभवानुसार फुफ्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या बाबतीत दुर्लक्ष न करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्याचबरोबर या कारणामुळे आरोग्यासाठी होणार्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी तत्काळ सावधही राहिला पाहिजे. हवा प्रदूषण केवळ फुफ्फुसाच्या कर्करोगाशीच निगडीत आहे असे नव्हे तर स्तनाचा कर्करोग, हृदयाचा कर्करोग आणि स्वादुपिंडाचा कर्करोग ही यामुळे होऊ शकतो. हवा प्रदूषणामुळे तोंड आणि गळा यांचाही कर्करोग होऊ शकतो. एवढे सगळे धोके असताना मनुष्याकडे एकच मार्ग आहे तो म्हणजे हवा प्रदूषणाविरोधात मिळून मुकाबला करणे. त्यासाठी एक उपाययोजना करता येईल, ती म्हणजे हवा प्रदूषण एकदाच संपवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी हळूहळू प्रदूषणाचे कारक कमी करण्याचा प्रयत्न करावा. हवा प्रदूषण घटवण्यासाठी कडक कायदेदेखील केले पाहिजेत आणि त्याच्या अंमलबजावणीकडेही लक्ष दिले पाहिजे.