

आपल्या घरात, ऑफिसमध्ये किंवा प्रवासात पाणी पिण्यासाठी आपण प्लास्टिकची बाटली वापरतोच. अनेक वेळा ही बाटली दिवसोनदिवस धुतल्याशिवाय वापरली जाते. काही वेळा तर महिनोनमहिने एकच प्लास्टिकची बाटली वापरण्याची सवय लागते. पण ही सवय किती धोकादायक ठरू शकते, हे अनेकांना माहितच नसतं. तज्ज्ञ सांगतात की, जुनी प्लास्टिकची बाटली म्हणजे शरीरात हळूहळू विष उतरवण्यासारखं आहे.
सुरुवातीला प्लास्टिक गरम पाण्याशी किंवा उन्हात पडल्यावर सहजच विरघळायला लागतं. त्यामुळे त्या प्लास्टिकमधले ‘BPA’ (Bisphenol A) आणि ‘BPS’ सारखे केमिकल्स पाण्यात मिसळतात. हे दोन्ही रसायनं “हार्मोन डिसरप्टर्स” म्हणून ओळखले जातात. म्हणजे शरीरातील नैसर्गिक हार्मोन्सची क्रिया बिघडवण्याचं काम करतात. त्यामुळे थायरॉइडची समस्या, महिलांमध्ये PCOS, वजन वाढणे, मूड स्विंग्स, आणि इन्सुलिन रेसिस्टन्स यांसारखे त्रास निर्माण होऊ शकतात.
जुन्या बाटल्यांमध्ये वेळेनुसार छोटे छोटे स्क्रॅचेस तयार होतात. याच स्क्रॅचेसमध्ये बॅक्टेरिया आणि फंगस वाढायला सुरुवात होते. बाटली व्यवस्थित धुतली नाही तर हेच जंतू पाण्यात मिसळून पोटाचे आजार, अतिसार, घशाचा संसर्ग आणि पचनाच्या समस्या निर्माण करतात.
आणखी एक मोठा धोका म्हणजे “मायक्रोप्लास्टिक”. प्लास्टिक वारंवार वापरल्याने त्याचे अतिशय सूक्ष्म कण पाण्यात मिसळतात. हे मायक्रोप्लास्टिक शरीरात गेल्यावर रक्ताद्वारे किडनी, लिव्हर आणि फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतात.
यामुळे शरीरात सूज, पेशींना हानी, प्रतिकारशक्ती कमी होणे आणि दीर्घकालीन नुकसान होऊ शकतं. काही अभ्यासांमध्ये तर मायक्रोप्लास्टिक हृदयासाठीही धोकादायक ठरू शकतं, असेही दिसून आले आहे. गरम पाणी, चहा किंवा गरम पदार्थ प्लास्टिकमध्ये ठेवणं तर अजूनच धोकादायक असतं. उष्णतेमुळे प्लास्टिकचे रसायनं वेगाने विरघळतात. त्यामुळे हे पाणी सतत प्यायचं झाल्यास शरीरात विषारी केमिकल्स साचत जातात.
मग उपाय काय? तज्ज्ञ एकच गोष्ट सांगतात प्लास्टिकची बाटली शक्यतो वापरू नका. वापरावी लागलीच, तर फक्त १०–१५ दिवसांत बदलावी, आणि तीही BPA-फ्री असावी. गरम पाणी कधीच प्लास्टिकमध्ये भरू नये. सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे स्टील, तांबे किंवा काचेची बाटली.
आरोग्याशी तडजोड नको असेल, तर आजच आपल्या प्लास्टिकच्या जुन्या बाटल्या बदलून टाका. हळूहळू होणाऱ्या या धोक्यापासून सावध राहणं खूप आवश्यक आहे.