

डॉ. प्राजक्ता पाटील
पीसीओएस म्हणजेच पॉलिसायस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा आजार अनेक महिलांमध्ये अतिशय शांतपणे पसरत आहे, मात्र त्याबद्दल आजही म्हणावी तितकी चर्चा होताना दिसत नाही.
भारतात दर पाचपैकी एका महिलेला हा त्रास असूनही, योग्य माहितीच्या अभावामुळे वर्षानुवर्षे याचे निदानच होत नाही. वजन वाढणे, मूड बदलणे, मासिक पाळीतील अनियमितता आणि थकवा यांसारख्या लक्षणांना अनेकदा केवळ ताणतणाव किंवा वाढत्या वयाचा परिणाम मानून दुर्लक्ष केले जाते. प्रत्यक्षात ही लक्षणे हार्मोन्स आणि चयापचय क्रियेत होणार्या मोठ्या बिघाडाचे संकेत असू शकतात.
पीसीओएसची लक्षणे प्रत्येक महिलेमध्ये वेगळी असू शकतात. काहींना पोटाच्या घेर्याजवळ अचानक वजन वाढल्याचे जाणवते, तर काहींना चेहर्यावर मुरुमे येणे किंवा शरीरावर अनावश्यक केस वाढणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. मानसिक आरोग्यावरही याचा खोलवर परिणाम होतो. विनाकारण येणारी अस्वस्थता, चिडचिड किंवा सतत उदास वाटणे हे देखील या आजाराचे भाग असू शकतात. दुर्दैवाने, शाळांमध्ये किंवा कुटुंबात या विषयावर खुलेपणाने बोलले जात नाही. अनेकदा घरातील वडीलधारी मंडळी या लक्षणांना केवळ तारुण्यातील बदल म्हणून फेटाळून लावतात, ज्यामुळे उपचारांना उशीर होतो.
पीसीओएसमध्ये शरीर इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही, त्यामुळे आहार किंवा व्यायामात बदल नसतानाही वजन झपाट्याने वाढू लागते. हे वाढलेले वजन कमी करणे सामान्य आहाराने कठीण असते. तसेच, या आजारामुळे शरीरातील पुरुषी हार्मोन्सचे प्रमाण वाढते, ज्याचा परिणाम म्हणून हनुवटी आणि जबड्याच्या भागावर वेदनादायक मुरुमे येतात किंवा डोक्याचे केस विरळ होऊ लागतात. मासिक पाळीचे चक्र बिघडणे किंवा ती अत्यंत वेदनादायक असणे हे देखील हार्मोन्सच्या असंतुलनाचे स्पष्ट लक्षण आहे.
सतत थकवा जाणवणे आणि ऊर्जा कमी होणे ही देखील पीसीओएसची महत्त्वाची लक्षणे आहेत. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला थकवा जाणवत आहे असे आपल्याला वाटू शकते, परंतु हे रक्तातील साखरेच्या आणि हार्मोन्सच्या बिघाडामुळे असू शकते. जर महिलांनी आपल्या शरीरातील या बदलांकडे वेळीच लक्ष दिले आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला, तर हा आजार योग्य रितीने हाताळता येतो.