डॉ. अश्विनी एकंतपुरे-राऊत
pcos याचा मराठीत अर्थ पाहिला तर poly म्हणजे अनेक, cyst म्हणजे गाठी, ovary म्हणजे स्त्री बीजांडकोष आणि syndrome म्हणजे आजार, अवस्था. एकंदरीत स्त्रियांच्या बिजांडकोषाला झालेल्या अनेक गाठी. गाठ म्हटलं की कॅन्सर तर नसेल ना, असा प्रश्न पडतो. परंतु, या आजारातील गाठ वेगळी असते.
अलीकडे pcos हा वयात आलेल्या मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो.
हार्मोनल असंतुलनामुळे निर्माण होणारी एक समस्या आहे. वयात येताना मुलींमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल घडत असतात. या सगळ्या बदलांमध्ये हार्मोन्सचा मोठा आणि महत्त्वाचा सहभाग असतो.
pcos ची कारणे व लक्षणे-
1)हार्मोनल असंतुलन आणि अतिनिर्मिती 1) अँड्रोजनची अतिमात्रा- बिजांडकोशातून अधिक निर्मिती या हार्मोन्सच्या अतिमात्रेमुळे चेहर्यावर मोठे पुरळ येणे चेहर्यावर अनावश्यक केस, मान काळी होणे. 2) इन्सुलिनची अतिमात्रा – यामध्ये इन्सुलिन resistance निर्माण होऊन मधुमेह होणाचा धोका संभवतो.
3) प्रोलॅक्टिनची अतिमात्रा – यामुळे अनियमित मासिक पाळी येते.
इतर कारणे व लक्षणे
1) गर्भधारणेसाठी आवश्यक असणारे स्त्रीबीज तयार होऊ न शकणे त्यामुळे सातत्याने गर्भपात, वंध्यत्व या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
2) बदलती जीवनशैली : घरात बनवलेले पौष्टिक पदार्थ न खाता बाहेरील बर्गर, पिझ्झा, पावाचे पदार्थ, बेकरी पदार्थ इत्यादींचे अतिमात्रेत सेवन करणे मुख्य म्हणचे या वेस्टर्न पदार्थांचा भारतात सोस भरपूर आहे. शिवाय बैठे काम, व्यायाम न करणे या आरामदायी जीवनशैलीमुळे वजन वाढणे ही गंभीर समस्या उद्भवते. हे एक मुख्य कारण आहे. जे स्त्रियांच्या मासिक पाळीवर गंभीर परिणाम होऊन pcos समस्येला जन्म देते.
3) अनुवंशिक कारण
4) मानसिक ताणतणाव प्रत्येक होणार्या आजाराचे एक मुख्य कारण आहे.
pcos मुळे शरीरात होणारे बदल-
स्त्रियांमध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला प्रत्येकी 1 अशी बीजांडकोष असतात. मासिक पाळीच्या 14 व्या दिवसाच्या एक वा दोन दिवस मागे -पुढे कोणत्याही एका बीजांडकोशात एक परिपक्व स्त्रीबीज निर्माण होते, यालाच ओवुलेशन (ovulation) म्हणतात. ओवुलेशन झालेले कसे ओळखायचे? तर पाळीनंतर 14 व्या दिवसाच्या आसपास योनीतून चिकट पांढरा स्त्राव होऊ लागतो. ओटीपोटात हलकेच दुखू लागते शरीराचे तापमान थोडे वाढलेले असते. ओवुलेशनच्या काळात शरीर संबंध आले तर गर्भधारणा होते. शरीर संबंध नाही झाले तर ते परिपक्व बीज मासिक पाळी दरम्यान रक्तावाटे निघून जाते. pcos मध्ये नियमितपणे स्त्रीबीज निर्मिती होत नाहीत आणि पुढे जाऊन वंध्यत्व येऊ शकते किंवा स्त्री गरोदर राहिल्यास गर्भपाताचा धोका संभवू शकतो. या आजाराचे वेळीच निदान होणे आवश्यक आहे. कारण या आजाराने ग्रासलेल्या नुकत्याच वयात आलेल्या आणि वरचेेेवर सुंदर दिसू लागणार्या मुलींना या आजाराने ग्रासले असल्यास त्यांच्या चेहर्यावर, पाठीवर मोठे पुरळ येऊ लागतात. pcos मध्ये येणारे पुरळ वेदनायुक्त, पसयुक्त, आकाराने मोठे आणि सतत म्हणण्यापेक्षा एकदा चेहर्यावर आले की लवकर जात नाहीत. साधारणत: एक दोन वर्ष त्रास देत राहतात. शिवाय चेहर्यावर निसर्गत: असणारे केस दाट होऊ लागतात. यामुळे मुलींच्या मानसिकतेत तणावयुक्त बदल होतात. बर्याच विवाहित जोडप्यांची तक्रार असते. 'लग्नाला खुप वर्ष झाली. बाळासाठी प्रयत्न करतोय'.
वंध्यत्वाच्या केसमध्ये प्रथम pcos बद्दल सगळी लक्षणे तपासून घ्यावीत. वंध्यत्वासाठी pcos कारणीभूत असतेच असे नाही. जेव्हा एखाद्या रोगाचे निदान करायचे असते तेव्हा सर्व संभाव्य लक्षणांनुसार विशिष्ट तपासण्या करून नेमकी व्याधी कोणती हे निदान करणे सोपे जाते. बराच स्त्रीवर्ग लाजून त्यांच्या होणार्या त्रासाबद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत. असे न करता स्पष्ट बोलावे. जेणेकरून कोणताही आजार पुढे जाऊन गंभीरतेचे स्वरूप घेण्याआधी वेळीच त्याचा इलाज करता येईल.
निदान करावयाच्या पद्धती :
1) रोगी आणि कौंटुबिक इतिहास
2) मासिक पाळी इतिहास 3) पोटाचा घेर वाढणे- स्त्रियांमध्ये llcm /35 इंच पेक्षा जास्त 4) रक्तातील चरबीचे प्रमाण वाढणे 5) शारीरिक तपासणी – ब्लड प्रेशर, पुरळ, चेहर्यावरील केस, मानेवरील काळी रेष Bmi काढण्याची पद्धत – वजन (किलो) / उंची (मीटर) चा वर्ग
Bmi योग्य -18.5-24.9
गरजेपेक्षा जास्त-25-29.9
स्तुलपणा -30-39
6) पोटाची सोनोग्राफी
7)इतर हार्मोनल तपासण्या
उपाय –
1) वजन नियंत्रित ठेवणे- नियमित व्यायाम आणि योगासने करणे. रोज सकाळी – संध्याकाळी किमान अर्धातास जलद चालणे. सूर्यनमस्कार प्राणायाम महत्त्वाचे.
2) आहार- जंकफूडचा वापर टाळा. फळे, पालेभाज्या, सकस आहार घेणे भरपूर पाणी प्यावे. चहा, कॉफी कमी करावी, या उपायांनी pcos आटोक्यात ठेवता येतो. कालांतराने pcos चा नायनाट होतो. फक्त यात नियमितपणा असावा. हार्मोनल उपचारांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.