कानात वेदना होताहेत? | पुढारी

Published on
Updated on

डॉ. संतोष काळे

हवा गार असली की कानात आवाज येतो किंवा क्वचित वेदनाही होतात. केस धुतले, कानाला हवा लागली तर काही वेळा कानात वेदना होतात. त्यामुळे कानात आवाज येतो. अनेकदा आपण घरगुती उपचार करून कानाच्या या वेदना कमी करण्याचा प्रयत्नही करतो. मात्र, त्यात थोडी जरी हयगय झाली तर मात्र कानाला गंभीर दुखापत होऊन ऐकण्याची क्षमता आपण गमावू शकतो. कानात वेदना का होत आहेत हे समजून घेतले पाहिजे आणि मुख्य म्हणजे कानदुखी सतत होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष मुळीच होता कामा नये. 

मनुष्याचे डोळा, कान हे अवयव अत्यंत संवेदनशील समजले जातात. त्यामुळे यापैकी कोणतेही अवयव कोणत्याही कारणाने दुखत असतील किंवा काही अस्वस्थता येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कानदुखी देखील अशीच एक अस्वस्थता घेऊन येते. त्याकडे दुर्लक्ष करणे नक्‍कीच महागात पडू शकते कारण काही प्रसंगात त्यामुळे ऐकण्याची क्षमताही बाधित होऊ शकते. 

दोन किंवा तीन दिवसांपेक्षा कानदुखी जाणवत असेल आणि घरगुती उपाय करूनही त्यात कमतरता येत नसेल तर हयगय न करता थेट डॉक्टर गाठावा. आपल्या चेहर्‍याच्या जवळ असणारे कान, नाक आणि घसा हे तीनही अवयव एकमेकांशी अंतर्गत भागातून जोडले गेलेले असतात. कानाच्या मध्यापासून निघणारी घशाच्या मागच्या बाजूला जाणारी युस्टेकिनय ट्यूबमध्ये अडथळा निर्माण होते त्यामुळे कानदुखी भेडसावते. कानाच्या मधल्या भागाला सूज येते किंवा संसर्ग होतो त्यामुळे वेदना होतात. कानात खाज येणे, बुरशी साठणे, कानातील मेण किंवा ज्याला सामान्य भाषेत मळ म्हणतात तो जास्त किंवा कमी होणे या समस्यांमुळे कान दुखतो. पण, या सामान्य समस्यांमध्येही निष्काळजीपणा केला तर बहिरेपण येऊ शकते. कानामध्ये वेदना दोन प्रकारे होतात. कानाच्या आतल्या किंवा बाहेरच्या बाजूस काही इजा, दुखापत किंवा गडबड झाली तर वेदना होतात. दुसरी गोष्ट म्हणजे कानाशी निगडित इतर अवयव जसे घसा दुखणे, दातदुखी यामुळेही कान दुखू शकतो. 

कानदुखीची विविध कारणेः 

युस्टेकियन ट्यूबमध्ये अडथळा ः एका नसेच्या मदतीने कान, नाक आणि घसा एकमेकांशी जोडला गेलेला असतो. सायनस आणि टॉन्सिल्स सुजले तरीही कान दुखतो. यामध्ये कानाला आतून सूज येते आणि युस्टेकिनय ट्यूब बंद होऊ लागते. कानात पू तयार होतो त्यामुळे कानाच्या पडद्याचे नुकसान होते. त्याशिवाय आई झोपून बाळाला एका अंगावर झोपवून जेव्हा दूध पाजते त्यावेळेला बाळाने प्यायलेले दूध कानामध्ये जाऊ शकते. त्यातून संसर्ग होऊ शकतो. कानात वेदना होणे, सूज येणे किंवा कानातून पू येणे ही याची लक्षणे आहेत. 

कानात मळ जमा होणे ः काही लोकांची त्वचा तेलकट असते त्यांना कानात साठणार्‍या मळाचा अधिक त्रास होतो. हा मळ कानातून काढला तरीही पुन्हा वाढतो. बोटाची नखे जशी काही काळाने वाढतात तसाच हा मळही वाढतो. कानातील हे मेण किंवा मळ जास्त काळ जमा राहिले तर ते कडक होते आणि कानाची वाहिनी बंद होते. त्यामुळे कानात वेदना होतात आणि मुख्य म्हणजे श्रवणशक्‍ती कमी होते. 

ओटायटिस मीडिया(मध्यकर्णदाह) ः कानाच्या मधल्या भागात होणारा हा संसर्ग आहे. मुलांमध्ये या प्रकारचा संसर्ग अधिक प्रमाणात होताना दिसतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ संसर्ग राहिल्यास ते गंभीर संसर्ग असल्याचे मानले जाते. त्यामुळे व्यक्‍तीला बहिरेपण येऊ शकते. मात्र, हा संसर्ग बरा होऊ शकतो. हा संसर्ग कशामुळे होतो तर सर्दी किंवा फ्लूचा विषाणू, धुळीचे वावडे असणे या गोष्टींमुळे संसर्ग होतो. त्यात अतिताप, कानात वेदना होणे, ऐकायला येण्यात त्रास होणे किंवा कानात मळ साठणे आदी समस्या होऊ शकतात. 

कानाच्या पडद्याला इजा ः कानाच्या आतील नस खूपच संवेदनशील असते. त्यामुळेच कानात काहीही टोकदार वस्तू घालू नये किंवा कान कोरू नये, असा सल्ला डॉक्टर नेहमीच देतात. थोडासा जरी धक्‍का या नसेला लागला तरीही नसेला इजा होते त्यामुळे वेदना होतात. कानातून पू निघतो.  खूप काळ ही समस्या तशीच राहिली तर आजूबाजूच्या हाडांपर्यंत ते जाऊन ती वितळू लागतात. बॅरोट्रॉमाची समस्या, डोक्याला गंभीर इजा होणे, खूप मोठा आवाज, ओटयटिस मीडिया तसेच कानाच्या मधल्या भागात संसर्ग यामुळेही कानाच्या पडद्याचे नुकसान होते. 

सायनस संसर्ग ः सायनसचा संसर्ग हा विषाणू, जीवाणू किंवा बुरशी यामुळे होतो. सायनमध्ये संसर्ग झाल्यास किंवा अडथळा निर्माण झाल्यास कानात हवेचा दबाव निर्माण होतो त्यामुळेही कानात वेदना होतात. 

ऑटोमीकोसिस ः पावसाळ्याच्या काळात कानात बुरशीजन्य संसर्ग होतो. वातावरणातील दमटपणामुळे हे होते. त्यामुळेच रुग्णाने थेट कुलरसमोर झोपू नये. ऑटोमीकोसिसमध्ये कानात खूप वेदना होतात आणि खाजही येते. 

इअर बॅरोट्रॉमा ः या अंतर्गत कानाच्या अंतर्गत भागावर बाहेरून दबाव आल्याने इजा होते. बाहेरचा दबाव म्हणजे हवेचा किंवा पाण्याचा दबाव असू शकतो. इअर बॅराट्रोमा हा स्काय डायव्हिंग, स्कुबा डायव्हिंग किंवा विमानोड्डाण या दरम्यान अनुभवास येते. हवेचे बुडबुडे हे सतत कानाच्या आतल्या दबावाचे संतुलन राखण्यासाठी हालचाल करतात. घशाला सूज येणे, अ‍ॅलर्जीमुळे नाक बंद होणे, श्‍वसन संसर्ग होणे या सर्वांमुळे बॅरोट्रॉमा होऊ शकतो. मधुमेही रुग्णांनी याबाबत अधिक सजग राहाणे गरजेचे आहे. 

कानदुखीपासून बचाव कसा करावा?

कान सतत धुवू नका, स्वच्छ करू नका. कानात पिन, काडी, किल्ली आदी घालून खाजवण्याची सवय अनेकांना असते मात्र ते नक्‍कीच धोकादायक असते. त्यामुळे असा वस्तू कानात घालू नयेत. 

हल्ली मोबाईलवर गाणी ऐकण्यासाठी, कामासाठी कॉम्प्युटरवर हेडफोन्स वापरले जातात. त्यामुळे चांगल्या दर्जेदार गुणवत्तेचे हेडफोन्स वापरा. तसेच खूप जोरात गाणी ऐकू नका. 

त्वचा आणि केस यांसाठीची सौदर्यउत्पादने वापरताना ती उत्तम दर्जाची वापरा कारण त्यांचाही संपर्क कानाशी येत असतो. त्यामुळे दर्जेदार उत्पादने वापरणे गरजेचे आहे. 

पोहण्याचा व्यायाम किंवा नियमित पोहायला जात असाल तर कानात पाणी जाऊ देऊ नका. कान दुखत असेल तर पोहायला जाऊ नका. 

स्नायू सक्रिय राहावे यासाठी नियमित प्राणायाम आदी व्यायाम करावे. 

कानात मळ खूप जास्त प्रमाणात तयार होत असेल तर दर चार महिन्यांनी डॉक्टरांकडे जाऊन कानाची स्वच्छता करून घ्यावी.

कान अगदी थोडा दुखत असेल तर सुरुवातीचे घरगुती उपाय म्हणून थंड पाण्यात कापड बुडवून कानाच्या बाहेरच्या बाजूने शेक घ्यावा. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कितीही वेदना होत असल्या तरीही डॉक्टरी सल्ल्याशिवाय त्यावर औषधोपचार स्वतःच्या मनाने घेऊ नयेत. त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. ते टाळण्यासाठी डॉक्टरी सल्ल्याने औषधे घ्यावीत. कानाचे दुखणे ही बाब दुर्लक्षित करण्याजोगी नाही त्यामुळे वेळेत उपचार केल्यास गंभीर परिस्थिती उद्भवणार नाही.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news