डॉ. राजेंद्र केरकर
भारतीय महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका सध्या वाढतोय. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी जीवनशैलीत आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. पौष्टिक आहाराचे सेवन करणे आणि नियमितपणे व्यायाम केल्यास कर्करोगावर प्रतिबंध करता येऊ शकते.
गर्भाशयाचा कर्करोग हा हळूहळू वाढणारा कर्करोग आहे. विशेष म्हणजे यात सुरुवातीच्या टप्प्यात, पांढरे जाणे, योनीमार्गातील द्रावाला दुर्गंधी येणे किंवा समागमानंतर रक्तस्राव होणे यासारखी कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. कर्करोगपूर्व किंवा कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इमेजिंग तंत्रज्ञानातही हा आजार कळून येत नाही. मुख्यतः चाळीशी ओलांडल्यानंतर अनेक महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोगाचे निदान होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, आता तरुण मुलींमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. 10-15 टक्के गर्भाशयाचा कर्करोग झालेल्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असतो. शिवाय, यातून बचावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कारण, यातील अनेक रुग्णांमध्ये या कर्करोगाचे निदान फारच पुढच्या टप्प्यात होते.
धोका कमी करण्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी
वजन नियंत्रणात ठेवा – वजन जास्त असल्यास गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो, याबद्दल नक्कीच खात्री देता येत नाही. मुळात वाढीव वजन आणि गर्भाशयाचा कर्करोग या दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. परंतु, अतिरिक्त वजनामुळे हृदयावर परिणाम होऊ शकतो.
शारीरिक हालचाली करा – तुम्हाला व्यायाम करायला आवडत नसेल तर शरीराची हालचाल होईल, अशा गोष्टींमध्ये मन रमवण्याचा प्रयत्न करा. आठवड्यातील पाच दिवस तुम्हाला काय करायचे आहे, याबाबत एक वेळापत्रक तयार करा. निरोगी राहण्यासाठी शरीराचे वजन टिकवून ठेवण्याकडे लक्ष केंद्रित करा. नियमितपणे व्यायाम केल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत मिळते, शरीराला ऊर्जा मिळते आणि मनावरील तणाव कमी होतो.
आहाराकडे लक्ष द्या – जंकफूड, तेलकट आणि मसालेदार पदार्थाचे सेवन करणे शक्यतो टाळावेत. दररोज जेवणात ताजी फळे, भाज्या, शेंगदाणे, सोयाबीन, गाजर, कडधान्ये, संपूर्ण धान्य आणि बिया यांचा समावेश करा. बेकरी उत्पादनांपासून दूर रहा. शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळतील असे खाद्यपदार्थांचे सेवन करा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी ची औषधे घ्या. मद्यपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे गरजेचं आहे.
गर्भधारणा आणि स्तनपान – गर्भधारणा आणि स्तनपान गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकतो. स्तनपान केल्याने आईला पुढील आयुष्यात मुख्यतः स्तनाचा व गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. स्तनपान सुरू असताना महिलेच्या शरीरात बरेच संप्रेरके हार्मोनल बदल होत असतात. शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी राहते.