

मंजिरी फडके, आहारतज्ज्ञ
कांद्याच्या बाहेरील भागावर काळपटपणा अनेकांना त्रस्त करणारा ठरतो. ऑनलाईन अॅप असो किंवा मोठा सुपरमार्केट कुठूनही ऑर्डर करा, परंतु काळपटपणाने माखलेले कांदे टाळता येत नाहीत. सुरुवातीला काहींना ही पावडर असल्याचे वाटायचे. पण प्रत्यक्षात ती बुरशी असते, हे अनेकांना माहीत नसते. डॉ. नंदिता अय्यर यांनी याबाबत अलीकडेच एक सोशल मीडिया पोस्ट केल्यामुळे या काळ्या कांद्यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खराब साठवणूक, दमट हवामान, हवेशीर जागेचा अभाव आणि मोठ्या घाऊक बाजारातील दीर्घकाळ साठवणूक सर्व कारणांमुळे कांद्यांवर बुरशी वाढते, असे अनेकांनी निरीक्षण मांडले आहे. ऑनलाईन त्वरित डिलिव्हरी देणार्या कंपन्यांच्या अंधार्या आणि दमट ‘डार्क स्टोअर्स’ही समस्या अधिक तीव्र करताहेत.
या बुरशीचे वास्तव समजून घेतले पाहिजे. अॅस्परजिलस नायजर हा बुरशी प्रकार फक्त कांद्यांवरच नव्हे, तर काही फळांवर, तसेच स्नानगृहांच्या भिंतींसारख्या अत्यंत दमट ठिकाणी दिसून येतो. त्याची वाढ गरम आणि दमट वातावरणात झपाट्याने होते. म्हणजेच चुकीची साठवणूक आणि कोंदट वातावरण हीच त्याची प्रमुख कारणे आहेत.
बुरशी फक्त बाहेरील आवरणावर असेल, तर काळजीपूर्वक ते आवरण काढून कांदा चांगला धुवून वापरू शकतो. मात्र जर काळपटपणा आतल्या अनेक थरांपर्यंत पोहोचली असेल किंवा कांद्याला दुर्गंधी-ओलसरपणा आला असेल, तर तो ताबडतोब फेकून देणेच योग्य. कारण या बुरशीमधून कधी कधी विषारी पदार्थ तयार होऊ शकतात आणि ते आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. सुरक्षिततेसाठी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वच्छता. काळी बुरशी असलेल्या कांद्यांची साल काढल्यानंतर हात, चाकू आणि चॉपिंग बोर्ड साबणाने धुणे आवश्यक आहे.