मैदानी खेळ आणि आरोग्य | पुढारी

Published on
Updated on

प्रा. शुभांगी कुलकर्णी

खेळ हा मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर मानसिक आणि शारीरिक विकास करण्यासाठीही खेळ अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या काळातील जीवनशैली पाहता मैदानी खेळांचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. 

एडेलमॅन इंटेलिजन्स ही एक आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था आहे. या संस्थेने 10 देशांतील 12 हजार 710 पालकांसमवेत केलेल्या संशोधनामध्ये 56 टक्के पालकांनी सांगितले की, त्यांचे मूल दर दिवशी एक तासाहूनही कमी वेळ घराबाहेर खेळते. 10 पैकी 1 मुलगा कधीही मैदानी खेळ किंवा बाहेर खुल्या हवेत खेळला नाही. त्यापैकी दोन तृतीयांश पालकांनी असेही सांगितले की ते त्यांच्या लहानपणी जितके बाहेर खेळत त्यांची मुले त्याहीपेक्षा कमी खेळतात. 

मैदानी खेळ का गरजेचे?

मुलांना शालेय शिक्षण मिळालेच पाहिजे यात काहीच दुमत असायचे कारण नाही. बहुतांश वेळा आपण अभ्यासापुढे खेळाला महत्त्व देत नाही. खेळामधून मुले दुसर्‍यांबरोबर कसे वागायचे, बोलायचे या गोष्टी शिकत असतात हेच विसरून जातो. मुले जग पहायला, ओळखायला शिकतात आणि नव्या कल्पनांना जन्म देतात. कॉम्प्युटर करू शकणार नाही अशा या गोष्टी आहेत त्या कळण्यामध्ये खेळाची मुख्य भूमिका असते. 

मैदानी खेळाचा विकासाचा प्रभाव- शारीरिक विकास क्रिकेट, फुटबॉल, बास्केट बॉल, खो-खो आणि कबड्डी सारखे खेळ मैदानी खेळ आहेत. या खेळांमुळे मुलांचा शारीरिक विकास होतो. त्याशिवाय बाहेर मैदानी खेळ खेळल्याने मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा विकास होतो. 

मुलांच्या शरीरात वाढीची काही संप्रेरके स्रवतात. या संप्रेरकांमुळे शारीरिक कार्यशीलता वाढते. त्याशिवाय प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि मुलांच्या आवडीचे जंक फूड जे ते खातात ते पचवण्याची ताकदही शरीरात असते. 

मैदानी खेळ मुलांच्या मानसिक विकासात मदत करतात. मुलांचे खेळ आणि विकास याविषयी काम करणार्‍या संस्थेतील अभ्यासकांच्या मते मुलांमध्ये खेळण्याची सवय विकसित केल्यास त्यांचा सामाजिक विकासही योग्य प्रकारे होतो. त्यामुळे मुले जेव्हा तरुण होतात तेव्हा आपल्या कार्यालयातही चांगल्या प्रकारे मिळून मिसळून राहतात. 

केम्ब्रिज विद्यापीठाने 2015 मध्ये 14 वर्षांच्या 800 मुलांवर संशोधन केले होते. त्यानुसार ज्या 14 वर्ष वयाच्या मुलांवर संशोधन केले त्यापैकी ज्यांनी त्यांचा वेळ स्क्रीन्स वर घालवला त्यांच्या परीक्षेतील कामगिरीवर परिणाम झाला आणि 2 वर्षांत त्यांच्या अभ्यासाच्या 2 ग्रेड कमी झाल्या.

ऑस्ट्रेलियात शाळेत जाणार्‍या 12 वर्षांच्या 4 हजार मुलांवर झालेल्या संशोधनातून एक अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार जी मुले कॉम्प्युटर, मोबाईल, गॅजेट यांचाच सातत्याने वापर करतात आणि घराबाहेर पडत नाहीत त्यांच्या दृष्टीवर परिणाम होतो. त्यांची जवळचे आणि लांबचे पाहण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो. 

इनडोअर गेम्समुळे डी जीवनसत्त्वाची कमतरताः 

डी जीवनसत्त्व एकाच नैसर्गिक गोष्टीतून मिळू शकते ते म्हणजे सूर्यप्रकाश. मुळातच आपल्याकडे मुलांच्या शाळा सकाळी असतात. त्यामुळे सकाळचा वेळ अभ्यासात जातो. तसेच सकाळी उठून आई-वडिलांबरोबर फिरायला जाणेही दुरापास्तच. हल्ली मैदानी खेळाची जागा इनडोअर गेम्सने घेतली आहे. त्यामुळे मुले घराबाहेर पडणे जवळपास बंदच झाले आहे. परिणामी, डी जीवनसत्त्वाची कमतरता असणार्‍या मुला-मुलींची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी वेगवेगळी औषधे घेण्यापेक्षा सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात मुलांनी मैदानी खेळ खेळणे कधीही लाभदायक आहे. मैदानी खेळात पालकही मुलांबरोबर खेळू शकतात. असे केल्याने हा खेळ मुलांसाठी महत्त्वाचा आहे आणि पालकांनाही हा खेळ आवडतो आहे आणि पालक मुलांना आपला वेळही देत आहेत ही भावना मुलांमध्ये दृढ होते. याचा सकारात्मक परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news