डॉ. आनंद ओक
सुरुवातीच्या काळात, कमी स्वरूपात असताना किरकोळ वाटणारा, पण वारंवार उत्पन्न झाल्यावर मात्र त्रस्त करून टाकणारा एक विकार म्हणजे अंग खाजणे. खरे तर एक तक्रार स्वरूपात असणारा हा त्रास अनेकदा इतर विकारांच्या परिणामी होत असतो. आयुर्वेदीय पद्धतीने उपचार केल्यावर उत्तम आटोक्यात येऊ शकणारा हा विकार आहे. या विषयीची आज माहिती घेऊ.
अंग खाजणे अथवा अंगावर गांधी उठणे किंवा पित्त उसळणे या तक्रारीवर अनेकदा सुरुवातीच्या काळात रासायनिक आधुनिक औषध घेतले जाते. काही वेळ त्याने तक्रार कमीदेखील होते; पण काही वेळा मात्र ठराविक वेळाने पुन्हा अंगाची खाज सुरू होते. आधुनिक औषध घेतल्यावर त्याचा असर असेपर्यंत खाजणे कमी होते; पण काही काळाने पुन्हा खाजते. अनेकदा असे होत राहिल्यावर आधुनिक औषधाची सवय लागलेली आढळते. काही वेळा ही औषधे स्टेरॉईडस् गटातील असतात. गोळी खाल्ल्यावर एकदम बरे वाटते, पण सततच्या या स्टेरॉईडमुळे शरीरावर वजन वाढणे, स्थूलपणा, अंगावर सूज येणे इत्यादी दुष्परिणाम होऊ शकतात.
अंगावर पित्त गांधी येणे अथवा अंग खाजणे या तक्रारीची अनेक कारणे असतात. उपचार करताना या मूळ कारणाचा उपचार होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे या तक्रारीची कारणे कोणकोणती याची माहिती प्रत्येकाला असायला हवी.
अंग खाजण्याची कारणे :-
सर्वसाधारणपणे या कारणांचे विकाराच्या स्वरूपावरून तीन प्रकारात वर्गीकरण करावे लागते.
अॅलर्जीमुळे खाजणे / पित्तगांधी उठणे / शीतपित्त :-
शरीराला असात्म्यता उत्पन्न झाल्यामुळे परिणामावरून अंगावर खाज सुरू होऊन फोड अथवा गांधी उठतात. सर्वांगावर कोठेही उठू शकतात. थंडी, वारा, पाऊस, पाण्याचा संपर्क यामुळे प्रमाण काही जणात वाढलेले आढळते. काही वेळा गांधी उठण्याबरोबरच ओठ, डोळा, कान इ. ठिकाणी सूजदेखील येत असते.
काही जणात उन्हात अथवा जास्त प्रकाशात राहिल्यावर हा त्रास उत्पन्न होऊ शकतो. काही रुग्णात कोणत्याही आघाताने अथवा दाब पडल्याने त्रास वाढत असतो. थोडासा हलका ओरखडादेखील मोठा फोड उत्पन्न करत असतो. उष्णता, उकाडा, व्यायामानंतर त्रास वाढणारे काहीजण असतात. कोणत्याही स्वरूपाचा मानसिक तणाव अथवा टेन्शन वाढल्यावर त्रास वाढल्याचे काही रुग्णात घडत असते.
अॅलर्जी कशामुळे होऊ शकते?
सर्वसाधारणपणे सल्फा औषधे, अँटिबायोटीक्स, जंतुनाशक औषधे, वेदनाशामक पेनकिलर औषधे, मांस, मासे, खेकडा, अंडी हे पदार्थ फुलातील परागकण, काही वनस्पतींचा स्पर्श, उदा.खाजकूहीली, धूळ, धूर, उग्रवास, डास, कीटक, ढेकूण, पिसवा, मधमाशी चावणे, काही जणात दूध, दही, अतिमसालेदार पदार्थ, विशिष्ट स्वरूपाचे कापड, सौंदर्यप्रसाधने यामुळे अॅलर्जी झाल्याचे आढळते. असे असले तरी प्रकृतीनुसार कोणत्याही घटकाची अॅलर्जी असू शकते.
काही वेळा – व्हायरल इन्फेक्शन, लिवरची सूज, कावीळ, फंगल इन्फेक्शन्स, पोटातील कृमी, अतिप्रमाणात पित्त वाढणे, अमिबियासिस किंवा आमांशाचा त्रास यामुळेदेखील पित्त गांधी उठत असतात.
सर्वांग खाजणे :-
या प्रकारात फारशा गांधी उठत नाहीत. पण अंगाची खाज जास्त होत असते. पुरळ उठणे, फोड उठणे असेही काही वेळा घडत असते.
वार्धक्यामध्ये अथवा अतिथंडीमध्ये त्वचा रुक्ष झाल्याने खाज येते. इसब, सोरीयासीस, पसरलेली खरूज यामुळे अंग खाजते. लिवरची सूज, वाढलेली कावीळ, लिवरसिरॉसिस, डायबेटीस, रक्तातील साखर वाढणे, किडनी फेल्युअर, थायरॉयईडचे विकार, कॅन्सरची पुढे गेलेली अवस्था, एच.आय.व्ही. संसर्ग, नागिणीचा विकार, अंगात लोहाची कमतरता या विकारांमुळे देखील अंग खाजण्याची तक्रार होत असते. मानसिक तणाव, अतिचिंता, नैराश्य, हार्मोनमधील असंतुलन यामुळेदेखील अंग खाजणे उत्पन्न होऊ शकते.
स्थनिक खाजणे :-
पोटातील जंत, संडासच्या जागेची सूज, मुळव्याध, फिशर, भगेंद्र यामुळे तसेच, त्याजागी होणारे फंगल इन्फेक्शन यामुळे संडासच्या जागी खाजते व आग होते. मानसिक तणाव वाढल्यास काही जणात हा त्रास वाढत असतो.
महिलांमध्ये पांढरे अंगावरून जाणे सतत राहिल्याने, स्वच्छता न सांभाळल्याने, जंतुसंसर्ग, फंगस इन्फेक्शन, वार्धक्यातील दाह, मधुमेह हार्मोन्समधील असंतुलन, मानसिक तणाव यामुळे योनीच्या जागी खाजणे ही तक्रार होत असते. पुरुषांमध्ये फंगल इन्फेक्शन, खरुज इ.मुळे जननेंद्रियाला, जांघेमध्ये खाज वाढत असते. मधुमेह/ डायबेटीसमध्ये हा त्रास वाढलेला आढळतो.
अंग खाजण्यावरील आयुर्वेदिक उपचार :-
अंग खाजण्याच्या तक्रारीवर तात्पुरती सवय लागणारी, दुष्परिणाम होऊ शकणारी रासायनिक औषधे सतत घेण्यापेक्षा आयुर्वेदिक पद्धतीने शास्त्रीय उपचार घेणे अधिक सुरक्षित असल्याचे आढळते.
या तक्रारीवरील आयुर्वेदीय उपचार करताना रुग्णाचे वय, व्यवसाय, वजन, शरीराच्या इतर तक्रारी, खाजणे कधी वाढते किंवा कमी होते, आहाराच्या सवयी, व्यसने, शरीरात असणारे मधुमेह, थायरॉईड यासारखे विकार, इतर विकारांसाठी, सुरू असणारी औषधे, सध्या खाजण्याच्या तक्रारीवर घेत असलेले उपचार या सारख्या गोष्टींची सविस्तर माहिती घ्यावी लागते. याचबरोबर, भूक, झोप, संडास, लघवीचे स्वरूप, शारीरिक कष्ट, चिंता, काळजी इ. मानसिक तणाव इत्यादीची माहिती देखील घ्यावी लागते. यानंतर आयुर्वेदातील अष्टाविध परीक्षानी तपासणी करून अंगाची खाज" या तक्रारीची निश्चित कारणमीमांसा ठरविली जाते. शरीरातील वात-पित्त-कप यांच्या प्रकोपाचे प्रमाण ठरवल्यानंतर सांघिक पद्धतीने उपचार केले जातात.
सांघिक आयुर्वेदिक उपचार –
ज्यामुळे – विकारामुळे खाजणे होत आहे त्या विकारावरील उपचार नियमित घेणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. तसेच 'अमूक' एका पदार्थाने अथवा क्रियेने संपर्काने खाजणे वाढते अथवा अॅलर्जी येते असे लक्षात आले असल्यास ती गोष्ट कटाक्षाने टाळणे हा देखील मुख्य उपचारच ठरत असतो.
आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करताना शरीरातील त्रिदोषांचे शमन करणारी, रक्तशुद्धी करणारी, रक्तातील साठलेले अशुद्ध पदार्थाचे आमाचे पचन करून टाकणारी त्वचेची प्रतिकार शक्ती वाढविणारी, रक्तप्रसादन, त्वचा प्रसादन करणारी, उष्णता नियमन करणारी औषधे वापरली जातात. मानसिक तणाव कमी करण्याचा, मनोबल वाढविण्याचा औषधांचाही उपयोग करावा लागतो. यासाठी शृंठी, त्रिफळ, हरीद्रा, सारीवा, मंजिष्ठा, कुमारी, निम्ब, धमासा, त्रिकटु, निशोत्तर, गुडुची, भुम्यामलकी, चोपचीणी, गुग्गुळ, इ. वनस्पती तसेच शंख, शौक्ति, मौक्तिक, गैरीक, त्रिवंग, वंग, कज्जली इ. भस्म औषधांपासून तयार केलेली संयुक्त औषधी वापरल्या जातात. 'खाजणे' या तक्रारीची जी कारणमीमांसा केलेली असते त्यानुसार प्रत्येक रुग्णपरत्वे योग्य अशी औषधे दिली जातात.
पंचकर्म :- अंग खाजण्याची तक्रार खूपच दिवस सुरू असेल, शरीरात इतर मोठे विकारही जास्त असतील, औषधी उपचारांना पुरेशी दाद मिळत नसेल अशावेळी पंचकर्म उपचार करावे लागतात. औषधी तेलाने मसाज, काढ्याच्या वाफेने शेकणे, वमन, विरेचन, बस्ति, रक्तमोक्षण, शिरोधारा इ. पंचकर्म आवश्यकतेनुसार केले जाते. अर्थात प्रत्येकाला पंचकर्म उपचार करावे लागत नाहीत. या पद्धतीने पंचकर्म- औषधे आणि पथ्यपालन आणि मूळ विकारांकडे दुर्लक्ष न करणे या गोष्टींचा अवलंब केल्यास त्रास करणाच्या या तक्रारीवर उत्तम नियंत्रण ठेवता येते.