चिंता मौखिक आरोग्याची

मुखारोग्य चांगले राहणे महत्त्वाचे
Oral health concerns
चिंता मौखिक आरोग्याचीPudhari File Photo
Published on: 
Updated on: 
डॉ. निखिल देशमुख

दात, जीभ, लाळ या सर्वांचे आपल्या पचनक्रियेत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच या तिन्हींचे आरोग्य म्हणजेच मुखारोग्य चांगले राहणे महत्त्वाचे आहे. आपले मुखारोग्य चांगले असेल, तरच शारीरिकद़ृष्ट्या आपण फिट राहू शकतो.

आपण जो काही आहार सेवन करतो, त्याचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. खाल्लेला पदार्थ पचवण्यासाठी आपल्या तोंडातील अवयवांची महत्त्वाची भूमिका असते. दातांचे काम वेगवेगळ्या प्रकाराचे असते. काही दात अन्नाचे तुकडे करतात, काही दात अन्न चावून बारीक करतात. तोंडातील लसिका ग्रंथीमधून निघालेली लाळ जेवण पचण्यास सोपे बनवते, त्यात पचनाला आवश्यक एन्झाईम्सही मिसळले जातात. त्यामुळे अन्न सुपाच्य होते. जीभ आपल्याला विविध चवींची जाणीव करून देते. जेवण गरम, गार, गोड तिखट, खारट कसे आहे हे सर्व जिभेमुळे कळते. थोडक्यात, दात, जीभ, लाळ या सर्वांचे आपल्या पचनक्रियेत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच या तिन्हींचे आरोग्य म्हणजेच मुखारोग्य चांगले राहणे महत्त्वाचे आहे. आपले मुखारोग्य चांगले असेल, तरच शारीरिकद़ृष्ट्या आपण फिट राहू शकतो. भारतीयांमध्ये मुखारोग्याकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण अधिक आहे. तब्बल 95 टक्के भारतीयांमध्ये तोंडाला वास येणे, दात किडणे, तोंड येणे, जीभ काळी असणे, स्टोमेटोटायटिस, सूज येणे, गाठी होणे इत्यादी समस्या असल्याचे दिसते. मुखआरोग्याशी निगडित अशा समस्यांकडे वेळीच लक्ष न दिल्यास तोंडाचा, अन्ननलिकेचा, ओठाचा कर्करोग होऊ शकतो.

स्टोमेटोटाइटिस : तोंड आल्यावर जशी साले निघतात किंवा फोड येतात त्याप्रमाणेच हा त्रास होतो. हिरड्या, गाल, जीभ किंवा ओठ इत्यादी जागांवर स्टोमेटोटाइटिस होऊ शकतो. त्यामुळे व्यक्तीला जेवणे, पाणी पिणे, बोलणे किंवा झोपण्यासही त्रास होऊ शकतो. याचे दोन प्रकार असतात.

कँकर सोर आणि कोल्ड सोर : कँकर सोरला अफ्फॉअस अल्सरही म्हटले जाते. गाल चावला गेल्यास, दातावर उपचार करताना इजा झाल्यास, तंबाखू खाणे, हिरड्यांच्या जखमा, ऑटोइम्यून आजार, किमोथेरेपी, क्रॉन्स आजार, अँटिबायोटिक औषधांचे अधिक सेवन किंवा अति गरम अन्न खाणे यामुळे हा आजार होऊ शकतो. यापासून बचाव करण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी प्यावे. मिठाच्या पाण्याने गुळणा कराव्यात. दारू, तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये. तोंडात आलेले फोड बरे करण्यासाठी सी-जीवनसत्त्व असलेला आहार घेतला पाहिजे. काही डॉक्टर तोंडात लावण्यासाठी जेलही देतात.

म्युकोसिल : आपल्या तोंडात लहान लहान ग्रंथी असतात. त्यातून लाळ स्रवत असल्याने त्याला लसिकाग्रंथी असे म्हणतात. काही इजा झाल्यास या ग्रंथीमधून लाळ स्रवणे बंद होते. त्यामुळे लसिका ग्रंथींमध्ये गाठी निर्माण होतात. त्याला म्युकोसिल म्हणतात. त्यावर कोणत्याही औषधोपचारांची गरज भासत नाही; मात्र खूप अधिक दिवस राहिल्यास डॉक्टर इंजेक्शनने फोडून पाणी काढून टाकतात.

तोंडाचा कर्करोग : सहसा तोंड आल्यास किंवा तोंडात फोड आल्यास तो काही दिवसांत बरा होतो. पण, तोंडाचा कर्करोग झाला असेल तर हे फोड कठीण होत जातात आणि दीर्घकाळ राहातात. जीभ, ओठ, गालाच्या आतल्या भागात, पडजीभ, टाळू आणि तोंडाच्या वरच्या भागात होतात. याची लक्षणे म्हणजे सूज येणे, गाठी होणे किंवा लहान उंचवटे येतात. तोंड खडबडीत होते, ओठ सुजतात किंवा फोड येतात. हिरड्या सुजतात. विनाकारण रक्तस्राव होणे, आवाज जड घोगरा होणे किंवा आवाजात बदल होणे, वजन अचानक कमी होणे इत्यादी. यापैकी कोणतेही लक्षण दिसल्यावर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. गरज वाटल्यास कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सूज किंवा गाठ कर्करोगाची नसेल तर औषधे, इंजेक्शने घेऊनही त्रास बरा होईल.

तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमुख कारण आहे धूम्रपान, तंबाखू आणि गुटखा यांचे सेवन करणे, अति मद्यपान कऱणे. त्याशिवाय कर्करोगाचा कौटुंबिक वैद्यकीय पूर्वेतिहास असल्यासही कर्करोग होण्याची शक्यता असते. अतिनिल किरणांच्या संपर्कात आल्यास कर्करोग होण्याची शक्यता वाढली आहे. ह्यूमन पॅपिलोमा विषाणूच्या संसर्गामुळेही कर्करोग होऊ शकतो. कर्करोगाचे निदान करण्यापूर्वी दंतवैद्य सुरुवातीला ओरल कर्करोग स्क्रीनिंग चाचणी करतात. तसेच शारीरिक तपासणीही करतात. त्यामुळे तोंड येणे, सूज येणे या गोष्टींची तपासणी आणि बायोप्सी केली जाते. याचे उपचार इतर कर्करोगांसारखेच केले जातात. ज्यामध्ये कर्करोगाच्या गाठी शस्त्रक्रियेने काढून टाकल्या जातात. त्यानंतर गरज असल्यास लेसर थेरेपी करून गाठीजवळील संक्रमित पेशी नष्ट केल्या जातात. त्यानंतर रेडिओथेरेपी आणि किमोथेरेपीची मदत घेतली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news