

डॉ. शिखा मलिक
ओमेगा-3 हे शरीरासाठी आवश्यक असे फॅटी अॅसिड आहे, जे शरीर स्वतः तयार करू शकत नाही. त्यामुळे ते आहारातून घेणे गरजेचे असते. मासे, अक्रोड, जवस (अळशी), चिया बिया, सोयाबीन यामध्ये ओमेगा-3 भरपूर प्रमाणात आढळते. मात्र ओमेगा-3 युक्त आहाराकडे मात्र अनेकजण दुर्लक्ष करत असल्याचे आढळून येते.
ओमेगा-3 फॅटी अॅसिड पुरुष आणि महिला दोघांमध्येही प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दैनंदिन आहारात त्याचा समावेश करून प्रजनन क्षमता सुधारता येते. आहाराच्या दैनंदिन सवयींवर लक्ष देणे, प्रजनन क्षमता तपासणे, पोषकतत्त्वांचा आहारात समावेश करणे याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. ओमेगा-3 फॅटी अॅसिड हे हार्मोन्स संतुलित करण्यास, शरीरात दाह कमी करण्यास आणि स्त्रीबीज आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. गर्भधारणेस प्रयत्न करणार्या जोडप्यांसाठी ओमेगा-3 ची भूमिका समजून घेणे गरजेचे आहे.
ओमेगा-3 फॅटी अॅसिड महिलांमध्ये हार्मोनल संतुलन आणि नियमित ओव्हुलेशन प्रक्रियेत मदत करते. ते प्रजनन अवयवांमध्ये रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते आणि निरोगी स्त्रीबीज आणि गर्भधारणेच्या विकासास फायदेशीर ठरते. ओमेगा-3 हे पीसीओएस किंवा एंडोमेट्रिओसिस सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या महिलांसाठीही उपयुक्त आहे जे प्रजननक्षमतेवर सकारात्मक परिणाम करते.
पुरुषांमध्ये ओमेगा-3 हे शुक्राणूंची गुणवत्ता वाढवते. नियमितपणे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या, हालचाल आणि आकार वाढण्यास मदत होते, ज्यामुळे शुक्राणूंना स्त्रीबीजापर्यंत पोहोचणे आणि स्त्रीबीज फलित करणे शक्य होते. ओमेगा-3 टेस्टोस्टेरॉनची पातळी चांगली राखण्यास देखील मदत करते आणि शुक्राणूंच्या डीएनएला नुकसान पोहोचविण्यापासून रोखते. संशोधनानुसार ओमेगा-3 फॅटी अॅसिडच्या सेवनाने नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता सुधारते आणि प्रजनन उपचारांदरम्यान देखील चांगले परिणाम मिळतात. म्हणूनच प्रत्येकाने आहार तसेच आपल्या प्रजननक्षमतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी आहारात ओमेगा-3 युक्त पदार्थांचा नक्की समावेश करावा.
- सॅल्मन, सार्डिन, मॅकरेल आणि ट्यूनासारखे मासे तसेच अळशी, चिया सीडस् आणि अक्रोड यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात आढळते.
- फक्त पूरक आहारांवर अवलंबून राहण्याऐवजी पौष्टिक आहाराचे सेवन करा. कच्चे मांस खाणे टाळा; संतुलित आहार आणि व्यायामासह ओमेगा-3 फॅटी अॅसिडयुक्त पदार्थांचे सेवन करा. योगा आणि मेडिटेशन करून तणावाची पातळी कमी करा. पूरक आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेषतः प्रजनन उपचारादरम्यान तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य राहील. ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे गर्भधारणेची शक्यता वाढू शकते. योग्य आहार आणि मार्गदर्शनाने, पुरुष आणि महिलांना प्रजनन क्षमता आणि गर्भधारणेची शक्यता वाढवता येऊ शकते.