डॉ. संतोष काळे
अलीकडील काळात रक्त तपासण्यांसह विविध प्रकारच्या तपासण्या (टेस्ट) रुग्णांनाच नव्हे, तर सर्वसामान्यांनाही कराव्या लागतात. या वैद्यकीय तपासण्यांमध्ये दिसणारी ‘नॉर्मल रेंज’ म्हणजेच आरोग्यदायी स्थिती आहे, असा समज अनेकांचा असतो; परंतु वास्तवात तशी स्थिती खरोखरच असते का? की हा गोड गैरसमज असतो?
बहुतांश लोक वैद्यकीय तपासणीचे रिपोर्ट पाहतात, तेव्हा ‘नॉर्मल रेंज’ दिसल्यावर ते निश्चिंत होतात. परंतु ही रेंज त्या लॅबमध्ये तपासणीसाठी येणार्या लोकांवर आधारित असते. ही लोकसंख्या प्रामुख्याने थकलेली, अपूर्ण आहार घेणारी किंवा दीर्घकालीन ताणाखाली जगणारी असेल, तर त्या सरासरीवर आधारित ‘नॉर्मल’ म्हणजेच ‘सरासरी आजारी व्यक्तीपेक्षा वाईट नाही’ इतकाच अर्थ उरतो. त्यामुळेच ‘ऑप्टिमल’ मूल्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
यामध्ये चार प्रमुख तपासण्या प्रत्येक भारतीयाने नियमित करायला हव्यात. कारण या तपासण्यांमुळे ‘नॉर्मल’ आणि ‘हेल्दी’ यातील फरक स्पष्ट दिसून येतो.
1. व्हिटॅमिन डी : भारतात व्हिटॅमिन डी ची कमतरता अतिशय सर्वसामान्य आहे. बहुतेक प्रयोगशाळा 20 ते 30 नॅनो ग्रॅम प्रति मिलीलीटर ही पातळी ‘नॉर्मल’ मानतात, पण शरीर कार्यक्षम राहण्यासाठी ती पातळी 50 ते 70 नॅनो ग्रॅम प्रति मिलीलीटर असायला हवी.
2. फास्टिंग इन्सुलिन : ही तपासणी अनेकदा दुर्लक्षित केली जाते, परंतु ती अतिशय महत्त्वाची आहे. प्रयोगशाळा 2.5 ते 30 युनिट प्रति मिलीलीटर ही रेंज नॉर्मल दाखवतात, पण खरेतर इन्सुलिन 8 पेक्षा कमी असायला हवे. अनेक वर्षे शरीर जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करत राहत असल्यामुळे स्वादुपिंडावर ताण येतो. ही अवस्था पुढे ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’मध्ये रूपांतरित होऊन फॅटी लिव्हर, वजन वाढ आणि गोड खाण्याची तीव्र इच्छा अशा समस्या निर्माण करते.
3. एचबीए1सी : ही तपासणी दीर्घकाळातील रक्तातील साखरेचे प्रमाण मोजते. 5.3 टक्क्यांपेक्षा कमी स्तर हा चांगला मानला जातो. 5.7 ते 6.4 टक्के दरम्यान प्रीडायबिटीजचा धोका असतो, तर 6.5 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे डायबिटीज. प्रत्यक्षात अगदी 5.5 टक्क्यांपासूनच मधुमेहाचा धोका वाढू लागतो.
4. लिव्हर हेल्थ : साध्या अल्ट्रासोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर 20 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढल्याशिवाय दिसत नाही. त्यामुळे ‘फायब्रोस्कॅन’ही तपासणी अधिक अचूक ठरते, कारण ती सुरुवातीच्या टप्प्यातच चरबी व ऊतकांची हानी ओळखू शकते. लिव्हर एन्झाइम्स, विशेषतः एएलटी, 30 युनिट प्रति लिटरपेक्षा कमी असावेत आणि लिव्हर फॅट 5 टक्क्यांपेक्षा कमी राखणे, हे आदर्श मानले जाते.