

डॉ. आशिष नलवडे
‘शस्त्रक्रिया’ (सर्जरी) हा शब्द ऐकताच रुग्ण आणि कुटुंबीयांच्या मनात भीती, चिंता आणि अनेक प्रश्न निर्माण होतात; मात्र, आधुनिक प्रगती, प्रगत भूलशास्त्र (ॲनेस्थेशिया) आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह (लॅपरोस्कोपी/रोबोटिक) तंत्रज्ञानामुळे आज शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि सुलभ झाल्या आहेत.
शस्त्रक्रियेच्या यशात पूर्वतयारीचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक असतो. या टप्प्यात शरीराची क्षमता तपासणे आणि संभाव्य गुंतागुंत टाळणे हा मुख्य उद्देश असतो. म्हणूनच मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, थायरॉईड किंवा हृदयाचा आजार असल्यास डॉक्टरांना पूर्वकल्पना द्यावी. नियमित सुरू असलेली सर्व औषधे विशेषतः रक्त पातळ करणारी औषधे (उदा. ॲस्पिरिन)-यांची माहिती द्यावी.
शस्त्रक्रियेपूर्वी रक्ताच्या तपासण्या, छातीचा एक्स-रे, ईसीजी (ECG) आणि भूल तज्ज्ञांची भेट आवश्यक असते. भूल तज्ज्ञ रुग्णाच्या संपूर्ण प्रकृतीचा अंदाज घेऊन भुलीचा प्रकार ठरवतात. शस्त्रक्रियेपूर्वी साधारण ६ ते ८ तास काहीही खाणे किंवा पिणे वर्ज्य सांगितले जाते. पोटात अन्न किंवा पाणी असल्यास भूल दिल्यानंतर ते अन्ननलिकेतून फुप्फुसात जाण्याचा धोका (ॲस्पिरेशन) असतो. डॉक्टरांनी दिलेल्या वेळेचे काटेकोर पालन करावे. शस्त्रक्रियेदरम्यानचा टप्पा पूर्णपणे शल्यचिकित्सक (सर्जन), भूल तज्ज्ञ आणि ऑपरेशन थिएटरमधील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणात असतो. ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाची ओळख, शस्त्रक्रियेचा अवयव, जागा आणि आवश्यक उपकरणांची तीन वेळा खात्री केली जाते .
शस्त्रक्रियेच्या प्रकारानुसार स्थानिक भूल, मणक्यातील भूल किंवा संपूर्ण भूल दिली जाते. भूल दिल्यानंतर रुग्णाला वेदनांची जाणीव होत नाही. शस्त्रक्रिया सुरू असताना भूल तज्ज्ञ रुग्णाचे हृदयाचे ठोके, रक्तदाब, शरीरातील ऑक्सिजन पातळी आणि मेंदूची कार्यप्रणाली यावर अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने सेकंदा-सेकंदाला लक्ष ठेवून असतात. या काळात नातेवाईकांनी घाबरून न जाता संयम राखणे गरजेचे असते. डॉक्टरांच्या सूचनेनुसार प्रतीक्षा कक्षात उपस्थित राहावे, जेणेकरून आवश्यकतेनुसार संपर्क साधता येईल. शस्त्रक्रिया संपल्यानंतर रुग्णाला थेट वॉर्डमध्ये न पाठवता काही तास ‘रिकव्हरी रूम’ किंवा ‘पोस्ट-ऑपरेटिव्ह केअर युनिट’मध्ये निरीक्षणाखाली ठेवले जाते. भूल पूर्णपणे उतरेपर्यंत रुग्णाला गुंगी, थंडी वाजणे किंवा हलकी मळमळ जाणवू शकते. हे सर्वसामान्य असून काही तासांत पूर्ववत होते.
शस्त्रक्रियेनंतर वेदना होणे स्वाभाविक आहे, परंतु डॉक्टरांनी दिलेल्या वेदनाशामक औषधांमुळे यावर नियंत्रण मिळवता येते. आतड्यांची हालचाल सुरू झाल्याची खात्री झाल्यावरच (गॅस पास होणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर) प्रथम घोट-घोट पाणी, पातळ द्रवपदार्थ आणि नंतर हलका आहार दिला जातो. डॉक्टरांनी परवानगी देताच अंथरुणावर पडून न राहता हळूहळू उठून बसणे किंवा चालणे सुरू करावे; यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका टळतो. शस्त्रक्रियेनंतर जखमेवर पाणी पडू देऊ नये. ड्रेसिंग कोरडी आणि स्वच्छ ठेवावी. घरी गेल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जखमेवर कोणतेही मलम किंवा पावडर लावू नये. घरी परतल्यानंतर खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- १००°F पेक्षा जास्त ताप येणे किंवा थंडी वाजणे.
- शस्त्रक्रियेच्या जागी अचानक तीव्र सूज, लालसरपणा किंवा पू, दुर्गंधीयुक्त स्राव येणे.
- औषधे घेऊनही वेदना कमी न होणे.
- श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत कळ येणे.
- पायांच्या पोटऱ्यांमध्ये असह्य वेदना किंवा सूज येणे.
डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी काही प्रश्न एका डायरीत किंवा मोबाईलमध्ये लिहून ठेवावेत.