डॉ. आनंद ओक
धकाधकीच्या सध्याच्या धावत्या युगात प्रमाण वाढत चाललेल्या आजारांपैकी एक विकार म्हणजेच वारंवार मानदुखी. सर्व्हायकल स्पाँडिलॉसिस मणक्याच्या विकारापैकी एक. कमरेच्या तुलनेत कमी प्रमाणात आढळणार्या या विकाराची आज माहिती घेऊया!
पृष्ठवंशाच्या मानेच्या भागात सात माणके असतात. प्रत्येक मणका एकमेकांशी सांध्याने जोडलेला असतो. ज्यावेळी विविध कारणांमुळे या मणक्यांची झीज होते, ज्यामुळे सांध्यांना सूज येते आणि यामुळे विविध तक्रारी उत्पन्न होतात या विकाराला सर्व्हायकल स्पाँडिलॉसीस असे म्हटले जाते.
विविध कारणांमुळे मणक्यांची झीज होऊ लागल्यानंतर मणक्यांमध्ये रचनात्मक बदल होऊ लागतात. ज्यामुळे तेथील सांध्यांना सूज येणे, स्नायू कडक होणे, शिरा कडक होणे, ऑस्टिओफाईटस्मुळे शिरांवर दाब पडणे यामुळे मानेचे स्नायू व शिरा जास्त कडक होऊ लागतात आणि आंकुचित राहू लागतात आणि या सर्व घटनांमुळे विविध तक्रारी उत्पन्न होत असतात.
सर्व्हायकल स्पाँडिलॉसीसची कारणे कोणती?
सर्व्हायकल स्पाँडिलॉसीसचा प्रतिबंध करण्यासाठी अथवा उपचार करताना या विकारातून लवकर बरे होण्यासाठी ही कारणे टाळणे महत्त्वाचे असते, तसेच बरा झालेला विकार पुन्हा होऊ नये, यासाठीदेखील ही कारणे माहीत असावी लागतात. म्हणजे, विकाराचा पुनरुद्भव टाळता येतो.
विविध कारणांनी मानेवर सातत्याने येणारा ताण हे सर्वात महत्त्वाचे कारण असते. रोज सातत्याने खाली वाकून अभ्यास करणे, मान एकाच पोझीशनमध्ये ठेवून कॉम्प्युटरवर काम करणे, ड्रायव्हींग करताना, प्रवास करताना मानेला आधार नसणे, कच्च्या रस्त्यावर वारंवार प्रवास करणे, अतिप्रवास करणे, टीव्ही बघताना तिरके बसणे, वारंवार मानेला रस्त्यावर वारंवार प्रवास करणे, अतिप्रवास करणे, टीव्ही बघताना तिरके बसणे, वारंवार मानेला हिसके देण्याची सवय, चुकीच्या पद्धतीने व्यायाम, वेटफ्टिंग अतिप्रमाणात करत राहणे, वारंवार डोक्यावर ओझी वाहणे, डोक्यावरून पाणी भरणे, खाली वाकून कपडे, भांडी धुणे, धारा काढणे, भांगलणे, मानेवर बोजा वाहणारे माथाडी कामगार, जड बॅग, जड पर्स सतत खांद्याला लावणे, लहान मुलाला वारंवार कडेवर घेणे, नोकरीसाठी नित्य नियमित जादा प्रवास, दीर्घकाळ सतत लिखाण काम, झोपताना जाड उशी वापरण्याची सवय असणे यासारख्या कारणांमुळे मानेच्या मणक्यांची झीज होत असते.
कष्टाची कामे करूनही पोषक आहार न घेणे, कॅल्शियमची कमतरता, थंडी वार्याचा मानेशी जादा संपर्क, पंखा-एसी याचा वारा मानेवर जादा घेणे, थंडित स्वेटर न वापरणे, यासारख्या कारणांमुळे मानेचे स्नायू जखडण्याचे प्रमाण वाढत असते. सर्व्हायकल स्पाँडिलॉसीसमुळे कोणता त्रास होतो?
या विकारामुळे होणारा त्रास विकाराच्या अवस्थेनुसार कमी-अधिक प्रमाणात होत असतो. मान, खांदे यामध्ये दुखणे, मान वळवीताना त्रास होणे, मान जखडणे, मानेतून निघणारी वेदना डोक्याची मागील बाजू, खांदे, हात याकडे पसरत जात असते. मानेच्या पाठीच्या वरच्या भागात गरम झाल्याची संवेदना, मानेकडून खांदे, हात, हाताच्या बोटापर्यंत वेदना पसरणे, मुंग्या येणे, बधिरपणा हा त्रास होत असतो.
विकाराची तीव्रता जास्त असल्यास हातामध्ये अशक्यपणा, जडत्व, मुंग्या जास्त येणे अशा तक्रारी येणे सुरू होतात. काही जणांत डोक्याची मागील बाजू दुखणे तर क्वचीत संपूर्ण डोके दु:खणे असाही त्रास होतो. मानेच्या, खांद्याच्या, डोक्याच्या तक्रारी सकाळी उठल्याबरोबर वाढलेल्या असतात. काहीजणांत ताणाचे काम, प्रवास यामुळे वाढत असतात.
चक्कर येणे, पडतो असे वाटणे, थोडसे फिरणे, पोझिशन बदलताना हा त्रास वाढणे असा त्रास काहीजणांत आढळत असतो. सततच्या त्रासामुळे त्रस्तपणा वाढतो. काहीजणांत अस्वस्थता, चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होणे या तक्रारीही आढळून येतात. मानेच्या 'एक्स रे'ची तपासणी केल्यावर मानेची वक्रता बदललेली असणे, दोन मणक्यांमधील अंतर बदललेले असणे, 'ऑस्टिओफाईटस्' तयार झालेले असणे, मणक्यांची झीज झालेली असणे हे दोष आढळून येतात.
सर्व्हायकल स्पाँडिलॉसीसवरील आर्युवेदिक उपचार
या विकारावर सांघिक आयुर्वेदिक उपचार उत्तम गुणकारी ठरत आहेत. हे उपचार करताना सर्वप्रथम रुग्णांची प्रकृती, तक्रारींचे स्वरूप दैनंदिन कामाचे स्वरूप, मानेवर येणार्या ताणाची कारणमीमांसा करून तसेच एक्स रेचा अभ्यास करून शास्त्रीय सांघिक आयुर्वेदिकउपचार केले जातात.
पंचकर्म उपचार….
निरगुंडी, दशमुळ, सहचर, शतावरी इत्यादिनी सिद्ध केलेल्या औषधी तेलाने मान, पाठ, खांदा, हात, कमरेपर्यंतचा भाग यांना हलक्या हाताने मसाज केला जातो. त्यानंतर विविध औषधांच्या पाल्याचा गोळा औषधी गरम तेलात बुडवून त्याने शेकणे म्हणजेच 'तैल पत्रपिडस्वेद' केला जातो. त्यानंतर औषधी काढ्याच्या वाफेने वाफारा दिला जातो. काही वेळा औषधी तेल नाकात टाकणे, नस्यकर्म, तैलबस्ती, तिक्त क्षीर बस्ती शीरोधारा यांचाही वापर केला जातो.
औषधी उपचार…
मानेच्या मणक्यातील सूज कमी करणारी, स्नायूंची जखडण कमी करणारी, तसेच मणक्यांची, स्नायू शिरांची ताकद वाढविणारी, शरीर मनोबल वाढवून वातप्रकोप कमी करणारी संयुक्त औषधे द्यावी लागतात.
बला, रस्ना, दशमूळ, निरगुडी, पदमकाष्ट, शतावरी अश्वगंधा, सहचर, गुग्गुळ भल्लातक, कज्जली, वरुण, कांचनार, गोखरू, एरंड, गुळवेल, जटामांसी, ब्राह्मी या वनस्पती आणि माक्षिक भस्म, अभ्रक भस्म, गोदंती भस्म, कुकुटांड भस्म, मंडूर भस्म आदी खनिज औषधांपासून केलेली संयुक्त औषधे रुग्णप्रकृती, आजाराच्या तीव्रतेचा विचार करून युक्तीने वापरावी लागतात.
अर्थात, आजच्या काळात यातील बहुतांश औषधे गोळ्यांच्या स्वरूपात असल्याने सहजपणे नियमित दीर्घकाळ घेणे सोपे असते. नित्य स्नेह महत्त्वाचे! पोटातील उपचारांच्या जोडीलाच औषधींनी सिद्ध केलेल्या तेलाने मान, पाठ, हात, खांदे यांना हलक्या हाताने मसाज करून गरम पाण्याच्या पिशवीने थोडे शेकणे हे नियमित संध्याकाळी किंवा रात्री करणे ही गोष्टदेखील महत्त्वाची असते.
पथ्यपालन- दूध, तूप, खजूर, डिंकलाडू, बदाम, उडीद, काजू आदी पोषक पदार्थांनी युुक्त आहार नियमित घेणे आणि कारणे म्हणून सांगितलेल्या गोष्टी कटाक्षाने टाळणे या गोष्टीलाही उपचारात महत्त्व आहे. विकारांची तीव्रता कमी झाल्यानंतर मानेचे, खांद्याचे व्यायाम, तसेच ताडासन, मार्जारासन, भुजंगासन, धनुरासन, शलभासन, उष्ट्रासन ही योगासन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने नियमितपणे करावीत.