

डॉ. भारत लुणावत
बहुतांश लोक जिममध्ये जातात ते ताकद वाढवण्यासाठी. जास्त वजन उचलणे, वेगाने धावणे किंवा शरीर जास्त फिट दिसणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असते; पण ताकद एकटी पुरेशी नसते.
सक्रिय जिम-गोअर्सपैकी तब्बल साठ टक्के जणांना वारंवार सांधेदुखी जाणवते. कारण, त्यांना मोबिलिटी आणि फ्लेक्सिबिलिटी ट्रेनिंगचे महत्त्व समजत नाही. योग्य मोबिलिटी विकसित केली, तर लिफ्टिंग परफॉर्मन्स जवळपास 20 टक्क्यांनी वाढू शकतो आणि दुखापतींचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
मोबिलिटी ट्रेनिंग म्हणजे नेमके काय?
शरीरातील सांध्यांची हालचाल मर्यादा वाढवणे हे मोबिलिटीचे मुख्य उद्दिष्ट असते. हालचालीत अडथळा, ताण किंवा कडकपणा कमी करून शरीर नैसर्गिकपणे हलू शकावे, यासाठी हे प्रशिक्षण आवश्यक असते. हे केवळ स्ट्रेचिंग नसते. ताकद, नियंत्रण आणि लवचिकता यांचा एकत्रित समावेश यात असतो. साध्या भाषेत सांगायचे झाले, तर शरीर जे नैसर्गिकपणे करू शकते त्या हालचाली मुक्तपणे, वेदनाशिवाय आणि संकोचाशिवाय करता याव्यात, हा यामागचा हेतू असतो.
मोबिलिटी आणि फ्लेक्सिबिलिटी इतकी महत्त्वाची का?
सर्वात मोठा फायदा म्हणजे दुखापत टाळणे. मजबूत सांधे आणि संतुलित स्नायू शरीराला चुकीच्या हालचालीपासून वाचवतात. मोबिलिटी वाढल्यावर शरीर अनावश्यकपणे एखाद्या भागावर भार टाकत नाही आणि दुखापत होण्याची शक्यता कमी होते. दुसरा फायदा म्हणजे परफॉर्मन्स सुधारतो. वर्कआऊटचा फायदा अधिक मिळतो.
रिकव्हरी जलद ः मोबिलिटी एक्सरसाईजमुळे रक्तप्रवाह सुधारतो, स्नायू सैल होतात आणि शरीर व्यायामानंतर पटकन सावरते. याखेरीज दैनंदिन जीवनातील हालचाली सहज होतात. मुलांबरोबर खेळणे, जिना चढणे, ऑफिसमध्ये बसणे किंवा उठणे हे सर्व हलके वाटते. योग्य मोबिलिटी असलेले शरीर वय वाढले, तरी कार्यक्षम राहते.
काय करावे?
यामध्ये प्रत्येक वर्कआऊटपूर्वी डायनॅमिक वॉर्मअप करून सांधे आणि स्नायू सक्रिय केले जातात. प्रशिक्षक सदस्यांना मोबिलिटीकेंद्रित ड्रिल्स शिकवतात आणि फ्लेक्सिबिलिटी ट्रेनिंगला महत्त्व देतात. प्रत्येक सत्राच्या शेवटी स्ट्रेचिंग किंवा फोम रोलिंग करून स्नायूंचा समतोल आणि लवचिकता टिकवली जाते. तसेच अॅपद्वारे पोषण, रिकव्हरी आणि मोबिलिटीची प्रगती ट्रॅक केली जाते. एकुणात मोबिलिटी आणि फ्लेक्सिबिलिटी हे केवळ व्यायाम नाहीत. ते संयम, जागरूकता आणि संतुलन शिकवणार्या सवयी आहेत.