मिनरल्स : शरीर बांधणीचे मूलभूत घटक

Published on
Updated on

मयुरा अ. जाधव  वाचस्पतीविधिज्ञ 

सर्व क्षारांनी परिपूर्ण आहार रोज बनविणे व वेळेवर खाणे अवघड असते. शरीराला निरोगी राखायचे असेल तर रोज मिनरल्सचा योग्य पुरवठा करायला हवा. ती आहारातून मिळाली तर उत्तमच! तसेच सूर्यप्रकाश, सप्लिमेंट, त्वचेला लावण्यात येणारी ब्युटिक्रिम्स व तेलातून मिळाली याच्याशी शरीराचा काही मतलब नसतो. 

भोजनाग्रे सदा पथ्यं लवणाद्रकभक्षणम्। अग्‍निसन्दीपनं रूच्यं जिव्हाकण्टविशोधनम्॥ (योग रत्नाकर 1) अर्थात; आरोग्य उत्तम राहण्यासाठी भोजनपूर्व आल्याच्या तुकड्यासोबत खडे मीठ सेवन करावे. या क्षारांमुळे पाचनक्रियेला चालना मिळते. जेवण स्वादिष्ट लागते. जीभ आणि घसा स्वच्छ होतो. शरीर हे पेशी, पेशीजाल आणि अवयव यांचे बनलेले आहे आणि हे तीनही घटक विविध रासायनिक पदार्थांचे बनलेले आहेत. हेच मानवी शरीराची बांधणी करणारे मूलभूत घटक आहेत. मानवी शरीराची रचना मशिनसारखी गुंतागुंतीची असते. त्याला कार्यरत राहण्यासाठी मिनरल्ससारख्या अनेक इंधनाची गरज असते. जाणून घेऊया यांचे महत्त्व!

क्षारांचे (मिनरल्सचे) शरीरातील कार्य :

1) शरीरातील ताठ पेशीजालाचे घटक म्हणून हे क्षार काम करतात. या घटकामुळे अस्थी आणि दात याना काठीण्य येते. अस्थी तयार होताना कॅल्शियम फॉस्फेटचे थर हाडांवर चढून स्थैर्य मिळते. 2) पेशीमध्येे केंद्रप्रथिन-न्युक्लिओप्रोटिन आणि केंद्रवलय-क्रोमॅटिन असे दोन प्रकार आहेत. पहिल्यामध्ये स्फूर असते आणि दुसर्‍यात लोहक्षार असतात. यातील काही पेशींचा संबंध मज्जातंतूशी, स्नायूंशी आणि पेशीजालांशी असतो. या दोन्ही घटकांच्या पुनरूत्पादन क्रियेत क्षार असतात. 

3) शरीरामध्ये प्रवाही पदार्थ जलयुक्‍त असून त्यात क्षार विरघळलेले असतात. आहारात जास्त मीठ खाल्ल्यास रक्‍तातील क्लोरिन व सोडियमची पातळी वाढते. हे घटक मूत्रपिंडाकडे नेले जाऊन मूत्रावाटे शरीराबाहेर टाकले जातात. अशा रितीने विद्राव्य क्षार शरीराला विशिष्ट तीव्रता पातळीवर राखण्यास मदत करतात. 4) हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडच्या अस्तित्त्वामुळे जाठरस आम्लधर्मीय होतो; या उलट लहान आतड्यातील स्रवाची क्रिया अल्क असते.कंठग्रंथीतून थायरॉक्सिन नावाच्या अंत:सर्गाची निर्मिती होते. थोडक्यात यांचे प्रमाण वाढू न देता शरीराची प्रक्रिया तटस्थ राखणे हेच क्षारांचे मुख्य काम आहे.

प्रत्येक क्षाराचे नाव, कार्य व अन्‍नाचा स्रोत :

1) कॅल्शियम व फॉस्फरस : जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याची कुर्च्या कार्टिलेज स्वरूपात असते. पुढे त्यावर कॅल्शियम व फॉस्फेटचा लहान कणांचा थर बसून  ती कठीण बनत जाते. या क्रियेला कॅल्शियम व फॉस्फरस आणि 'ड' जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. शरीरातील एकूण क्षारांच्या  75 टक्के वजन या दोन क्षारांमुळे असते. हे दोन्ही क्षार हाडांच्या व दातांच्या निर्मितीचे आणि त्यांचे आरोग्य राखण्याचे काम करतात. कॅल्शियमच्या अभावी स्नायू चटकन उद्दीपित होऊन आकड्या येतात. कॅल्शियमची पर्या मात्रा शरीरात असल्यावर मांसपेशीचे संतुलन राहून आराम मिळतो. फॉस्फरसअभावी मज्जापेशी क्षतिग्रस्त होतात. रक्‍तातील आम्ल व अल्कलीचा असमतोल होतो. दूग्धजन्य पदार्थ, मेथी, शेवग्याचा पाला, मासे, चिकन, यात हे आढळतात.

2) सोडियम व क्लोरिन : शरीर प्रणालीगत इलेक्ट्रोलाईट आणि पोटॅशियमसह एन्डोनोसिन ट्रायफॉस्फेट  नियमबद्ध करते. क्लोरिन पोटात आणि सेल्युलर पंप कार्यात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड तयार करण्यासाठी आवश्यक असते. शरीरात तंत्रिका संचरण, फ्लुईड बॅलेन्स, मांसपेशींचे संकुलन याच्यामुळे घडते. हे दोन्ही क्षार टेबल मीठ, दूध आणि पालक स्वरूपात मिळतात. आहारात याचा अतिरेक झाल्यास मूत्रपिंडाद्वारे, घामाद्वारे यांचा उत्सर्ग होतो. म्हणून गोड कारणाने आलेले अश्रूसुद्धा चवीला खारटच असतात. 3) लोह : शरीरात एकूण क्षारांच्या एक टक्‍का आयर्न असते. लोह लाल रक्‍तपेशीतील हिमोग्लोबिन या रंगीत घटकात असते. हिमोग्लोबिन फुफ्फुसातील प्राणवायू पेशीजालांकडे नेते व पेशीजालात तयार झालेला सिओटू परत फुफ्फुसात आणते. शरीराला गरज असेल तेवढेच लोह आतड्यातून शोषले जाते. यामुळे शरीराला ऊर्जा आणि ताकद मिळते. याच्या अभावाने अ‍ॅनिमिया होतो, पेशी कमजोर होतात. हे सुका मेवा, समुद्री भोजन, सोयाबीन, हिरव्या पालेभाज्या यात असते. जीममध्ये साळे मावशी फरशी पुसताना कलंडल्या. मी त्यांना प्रोटिन बार खाण्यास दिला. त्या म्हणाल्या, मॅडम! पाळी झाल्यावर असाच अशक्‍तपणा येतो.मी म्हणाले, मावशी! रक्‍तप्रवाह शरीरातील जीवनधारा आहे. रक्‍ताभिसरणामुळे सर्व पोषक पदार्थ, द्रव्ये शरीराला मिळतात. मासिक धर्मात दूषित रक्‍ताबरोबर खनिजे आणि धातू निघून जातात. अ‍ॅनिमियाच्या लक्षणामुळे थकवा येऊन चक्‍कर मारते. तुमच्यात मिनरल्सची कमी आहे. हे घ्या पैसे. स्त्रीरोग तज्ज्ञाला दाखवा आणि लोहयुक्‍त मिनरल्सच्या गोळ्या घ्या.नाही तर अ‍ॅडमिट होण्याची वेळ येईल.4) आयोडिन : कंठग्रंथींच्या स्वाभाविक कार्यक्षमतेला थायरॉईड हार्मोन्स, ट्रायडोयोथेरॉनच्या संश्‍लेषणासाठी आयोडिनची गरज असते. उपापचयन बेहतर करून शरीराच्या विकासात सहायक बनते. याच्या अभावी कंठग्रंथीमधील रचनात्मक पेशीजालांची वाढ होऊन ग्रंथीचा आकार वाढतो; अंत:स्राव करणार्‍या कार्यक्षम पेशीजालाची घट होते. गॉयटर होतो. हे समुद्री भोजन, अंडी, आयोडिनयुक्‍त मीठ यात असते.

5) मॅग्‍नेशियम : हा क्षार स्नायू व अस्थिपेशीजालात बर्‍याच प्रमाणात आढळतो. इतर क्षारांच्या समेवत काही प्रकिण्वांचा घटक म्हणून व शरीर प्रक्रियांचा नियंत्रक म्हणून काम करतो. तो एडेनोसिन ट्रायफॉस्फेटवर प्रक्रिया करून कॅल्शियमच्या कार्याशी निगडीत असतो. हा पालक, शेंगदाणे, संपूर्ण धान्य, एवोकॅडो यात असतो. 6) झिंक : गर्भवती महिलांना गर्भविकासासाठी याची आवश्यकता असते. शरीरात झिंक पर्याप्‍त मात्रेत असल्यास यौन इच्छा, वीर्य उत्पादन आणि शरीराचा विकास व्यवस्थित होतोे. ऑयस्टर, चिकन, दुग्ध उत्पादन हे झिंक स्रोत आहेत. 7) गंधक : हा क्षार प्रामुख्याने केस, नखे व अस्थिपेशीजाल यात सापडतो. हा सर्व मऊ पेशीजालांचा महत्त्वाचा घटक आहे. सिस्टीन आणि मिथिओनीन या दोन नत्राम्लांचा घटक असल्यामुळे बहुतेक सर्व प्रथिनयुक्‍त खाद्यपदार्थांत सापडतो.8) कोबाल्ट : लाल रक्‍तपेशीच्या निर्मितीला आवश्यक असणार्‍या ब 12 जीवनसत्त्वाचा हा घटक आहे.वाजवीपेक्षा जास्त कोबाल्ट दिल्यास लाल रक्‍तपेशी फाजील प्रमाणात वाढतात. 9) फ्लुओरिन : हा क्षार हाडे, दात व दातांवरील इनॅमिलचा स्वाभाविक घटक आहे. याच्या अभावाने डेंटल कारिज हा रोग होतो. याउलट याचा अतिरेक झाल्यास दातावर डाग पडतात.10) मँगेनिझ : हा क्षार प्राणिमात्रांच्या व वनस्पतीच्या चयापचयन क्रियेत महत्त्वाचा भाग घेतो. लाल रक्‍तपेशींच्या व अंत:स्राव ग्रंथींच्या निर्मितीसाठी हा आवश्यक आहे. यामुळेप्रतिरक्षा प्रणाली व तंत्रिका तंत्राला मजबुती मिळते. 11) कॉपर : लोहाचा हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी उपयोग केला जातो; पण यासाठी तांब्याचे सूक्ष्म प्रमाण आवश्यक असते. एका निरिंद्रिय क्षाराच्या विनियोगासाठी दुसर्‍या निरिंद्रिय क्षाराची आवश्यकता असते. यकृत, समुद्री भोजन, नटस् यात हे असते.  

वरील क्षार विवेचनावरून हे निरिंद्रिय पदार्थ मानवी देहाचे मूलभूत घटक आहेत, हे सहज लक्षात येते. म्हणून आहारातील यांच्या समावेशावर मानवी आरोग्य अवलंबून आहे. वरील सर्व क्षारांनी परिपूर्ण आहार रोज बनविणे व वेळेवर खाणे अवघड असते. शरीराला निरोगी राखायचे असेल तर रोज मिनरल्सचा योग्य पुरवठा करायला हवा. ती आहारातून मिळाली तर उत्तमच! तसेच सूर्यप्रकाश, सप्लिमेंट, त्वचेला लावण्यात येणारी ब्युटिक्रिम्स व तेलातून मिळाली याच्याशी शरीराचा काही मतलब नसतो. म्हणून क्रियाशील व व्यायाम करणार्‍या स्त्रिया डॉक्टरांच्या सल्ल्याने रोज जेवणाबरोबर एक मिनरल्सची गोळी खातात आणि क्षारांची कमतरता भरून काढतात. प्लांटस् अँड मिनरल्स आर बाऊंड टू प्रिडेस्टिनेशन. द फेथफुल इज ओन्ली बाऊंड टू द डिव्हाईन ऑर्डर्स…!!!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news