‘अर्धशिशी’ची डोकेदुखी | पुढारी

Published on
Updated on

डॉ. आनंद ओक

दिवसेंदिवस ज्या विकारात आयुर्वेदिय उपचार उत्तम लाभदायक आणि सुरक्षित असल्याचे अनुभवास येत आहे, असा एक विकार म्हणजे 'मायग्रेन' यालाच व्यवहारात 'अर्धशिशी' अथवा माथा उठणे असेही म्हटले जाते.

ज्याविकारात  वारंवार  कमी अधिक  प्रमाणात साधारणपणे अर्धे डोके दुखणे आणि याचबरोबर मळमळ, अन्नाची इच्छा नसणे, काही वेळा उलट्या आणि चिडचिडेपणा असा त्रास होतो. त्या डोकेदुखीला 'मायग्रेन'असे म्हटले जाते.

विकाराचे स्वरूप –

साधारणपणे वयात येणार्‍या काळात उत्पन्न होणारी ही डोकेदुखी अधूनमधून त्रास देत असते. महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळणार्‍या या विकारात काहीवेळा अनुवंशिकता देखील आढळून येते. काहीवेळा या विकाराचा संबंध मासिक पाळीशी असल्याचे आढळते. तसेच पाळी बंद होतानाच्या काळात म्हणजेच 'मेनोपॉज' मध्ये ही डोकेदुखी तीव्र झाल्याचे आढळते.

मायग्रेनची कारणे –

विविध कारणांनी डोक्याकडील शिरांचे आकुंचन प्रसारणात बिघाड झाल्याने हा विकार उत्पन्न होत असतो. सतत उपास करणे, तीव्र उन्हात अथवा प्रकाशात काम करणे, अतितिखट, मसालेदार पदार्थांचे सेवन, चहा, कॉफी, मद्यपान, आंबटफळे, आंबवलेले पदार्थ यामुळे वाढलेले पित्त विकार उत्पन्न करण्यास कारणीभूत होते. मासिक पाळीतील अनियमितपणा, हार्मोनमधील असंतुलन, भीती, चिंता, काळजी यामुळे वाढणारा तणाव ही कारणेदेखील विकाराला वाढवत असतात. काहीही न खाता पोट अधिक काळ रिकामे ठेवल्याने विकार वाढल्याचे आढळते.

मायग्रेनची लक्षणे –

या विकाराचे ठराविक काळाने अ‍ॅटॅक येतात. त्रास सुरू होण्यापूर्वी अतिउत्साह अथवा अतिनैराश्य जाणवणे, कंटाळा, जांभ्या येणे हे त्रास जाणवतात. कालांतराने डोळ्यापुढे काजवे चमकल्याप्रमाणे विविध आकार दिसणे, अंधारी, डोळ्यात अस्वस्थता जाणवून काही वेळातच डोके दुखण्यास सुरू होते. साधारणपणे अर्धे डोके दुखणे असे स्वरूप असले तरी नंतर संपूर्ण डोके दुखते. डोके जड होणे, ठणकणे, तीव्र वेदना, डोक्याची शीर उडणे याचबरोबर मरगळ, अन्नाची इच्छा नसणे, मळमळ, उलट्या, प्रकाश सहन न होणे हा त्रास होत असतो. उलट्या झाल्यावर काहीवेळा हा त्रास लगेच कमी होतो. तर काही रुग्णांत तो तसाच राहतो. या दरम्यान चिडचिडेपणा, अस्वस्थता वाढलेली असते.

काही महिलांना पूर्वलक्षणे न जाणवता फक्त डोकेदुखी वाढल्याचे आढळते.

मायग्रेनवरील आयुर्वेद उपचार –

मायग्रेनचा त्रास होणार्‍या रुग्णांना अनेकवेळा त्रास सुरू झाल्यावर तात्पुरती रासायनिक वेदनाशामक गोळी घेण्याची सवय जडलेली असते. यामुळे आराम मिळत असला तरी अनेकदा या औषधांचे दुष्परिणामही होऊ शकतात. तसेच उलट्यांमुळे आलेला अशक्तपणा, हार्मोनमधील असंतुलन इत्यादी कारणांचा उपचार होत नसतो.

आयुर्वेदिय उपचार सुरू करताना रुग्णाचे वय, व्यवसाय, आहार, व्यसने, शारीरिक ताण, मानसिक तणाव, मासिक पाळीचे स्वरूप, जागरण, उन्हाशी संपर्क इत्यादी सखोल माहिती घेऊन त्यानंतर पंचकर्म व औषधे आणि पथ्यपालन या त्रिसुत्रीने उपचार केले जातात.

औषधी तेलाने डोक्याला मसाज, शिरोधारा, नस्य, सर्वांग स्नेहन, विरेचन, बस्ती या पैकी पंचकर्मांचा गरजेप्रमाणे उपयोग करावा लागतो. याचबरोबर आवळा, भुनिंब, वासा, गुडूची, पटोल, ज्येष्ठमध, निर्गुंडी, गुग्गुळ, दशमुळ, अश्वगंधा, जटामांसी, ब्राम्ही, तसेच अभ्रकभस्म, माक्षीक भस्म, शंख, मौक्तिक, प्रवाळ, गोदंती इत्यादीपासून केलेली विविध संयुक्त औषधे नियमित घ्यावी लागतात. दीर्घकाळ औषधे घेण्याची चिकाटी ठेवल्यास तसेच विशिष्ट अशी काळजी नियमित घेतल्यास या विकारावर उत्तम नियंत्रण मिळविता येते.

मायग्रेनच्या रुग्णांनी घ्यावयाची काळजी –

भूक लागल्यावर वेळच्यावेळी जेवण सर्वात महत्त्वाचे. पित्त वाढवणारे पदार्थ नेहमी टाळावे. आहारामध्ये गोड पदार्थ नियमित खावेत. डोकेदुखी वाढलेली असताना शांत व अंधार्‍या जागेत राहावे. डोक्यावर कापूर घातलेला खोबरेल तेल लावावे. बर्फाने दुखणारी बाजू शेकल्यानेही बरे वाटते. जागरण, उन्हात काम टाळावे, प्राणायाम, योगासने, ध्यान याद्वारे तणाव नियंत्रण करावे. आपल्याला सर्व्हीयकल स्पाँडीलॉसीस म्हणजेच मानेच्या मणक्याची विकार नाही ना यासाठी एक्स-रे करून खात्री करून घ्यावी व असल्यास त्यावरील उपचार घ्यावेत.

थोडक्यात मायग्रेनचा त्रास होत असल्यास सांघिक आयुर्वेदिक उपचाराने त्यावर उत्तम नियंत्रण मिळविता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news