

प्रा. विजया पंडित
मायक्रोप्लास्टिक म्हणजे 5 मिलिमीटरपेक्षा लहान असलेले प्लास्टिकचे सूक्ष्म कण. हे कण बाटलीबंद पाणी, खाद्यपदार्थांचे प्लास्टिक पॅकिंग, समुद्री अन्न आणि अगदी हवेमध्येही आढळतात.2024 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमधील अभ्यासानुसार हे कण मानव शरीरात प्रवेश करून लिव्हर, मूत्रपिंड (किडनी) आणि प्रजनन तंत्राला हानी पोहोचवतात.
दिवसागणिक आपल्या जीवनशैलीत प्लास्टिकचा वापर वाढत चालला आहे. आज बाहेर फिरताना पाण्याची बाटली विकत घेणे, ही सवय पाचपैकी एका कुटुंबामध्ये दिसून येते. क्विक कॉमर्सच्या आजच्या जगात घरी मागवलेले जेवणही प्लास्टिकच्या पॅकिंगमध्ये येते. बाहेर खाण्यासाठी डिस्पोजेबल ताट-वाट्या वापरल्या जातात आणि तीही प्लास्टिकपासून बनलेली असतात. पण, अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनाने डोळे उघडणारा इशारा दिला आहे. त्यानुसार प्लास्टिकचा हा सवयीचा वापर लिव्हर आणि प्रजनन आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करत आहे.
भारतासारख्या देशात प्रतिवर्षी प्रति व्यक्ती सुमारे 11 किलो प्लास्टिकचा वापर होतो. बाटलीबंद पाण्यात दर ग्रॅममागे सरासरी 0.09 मायक्रोप्लास्टिक कण आढळतात. हे कण हळूहळू शरीरात साठत जातात.
‘एन्व्हायर्नमेंट अँड हेल्थ’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे की, मायक्रोप्लास्टिक्स विशेषतः पॉलिस्टीरीन आणि बीपीए (बिस्फेनॉल-ए) हे रसायनयुक्त प्लास्टिक यकृतात (लिव्हरमध्ये) सूज निर्माण करतात आणि कार्यक्षमता कमी करतात. हे कण लिव्हरच्या पेशींमध्ये ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण करतात. त्यामुळे फॅटी लिव्हर, हेपेटायटीस आणि यकृतविकारांचा धोका वाढतो.
भारतामध्ये आधीच सुमारे 10% लोकसंख्या फॅटी लिव्हर समस्येने ग्रस्त आहे. अशा वेळी मायक्रोप्लास्टिक्समुळे हा धोका अधिक तीव्र होऊ शकतो.
‘अॅन इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकॉलॉजी’ (2024) या नियतकालिकातील अभ्यासानुसार, मायक्रोप्लास्टिकचे कण प्लेसेंटा, स्तनांमधून येणारे दूध आणि वीर्य यामध्येही आढळले आहेत.
त्यामुळे वंध्यत्व, गर्भविकासातील अडथळे आणि हार्मोनल असंतुलन यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
भारतामध्ये प्लास्टिक कचर्याचे व्यवस्थापन ही मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई यांसारख्या महानगरांमध्ये प्लास्टिक प्रदूषणामुळे नद्या आणि भूगर्भातील पाण्याचा स्रोत प्रदूषित होत आहे.
भारतीय आहारात समुद्री अन्नास (मासे, झिंगे) महत्त्वाचे स्थान आहे. पण, त्यामध्ये आढळणारे मायक्रोप्लास्टिक यकृताला हानी पोहोचवतात. तसेच, वाढत्या प्रमाणात बाटलीबंद पाणी व प्लास्टिकच्या वेष्टनातील अन्नपदार्थांचा वापर यामुळेही मायक्रोप्लास्टिकचा धोका वाढत चालला आहे.
प्लास्टिकच्या बाटल्यांपासून दूर राहा. त्याऐवजी स्टील किंवा काचेच्या बाटल्या वापरा.
ताजे अन्न निवडा : प्लास्टिक पॅकिंगमध्ये मिळणार्या खाद्यपदार्थांपेक्षा ताजे, स्थानिक अन्न अधिक सुरक्षित असते.
— प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी रीसायकलिंग आणि जनजागृती अत्यावश्यक आहे. मायक्रोप्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी कुटुंबीय, मित्र, शेजारी यांना माहिती द्या. आज ज्या सहजतेने आपण प्लास्टिकचा वापर करत आहोत, त्याचे आपल्या शरीरावर आणि पर्यावरणावर दूरगामी गंभीर परिणाम होत आहेत. यातून भविष्यात एक मोठं आरोग्यसंकट निर्माण करू शकते.