मासिक पाळी येत नाही? आयुर्वेदिक उपचार…

Published on
Updated on

डॉ. आनंद ओक

मासिक पाळी नियमित, वेळच्यावेळी येणे या गोष्टीला महिलेच्या आरोग्य रक्षणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही मासिक पाळी नियमित आली नाही तर त्यांच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. मासिक पाळी न येण्याची कारणे कोणती? यावर आयुर्वेदिक उपचार कसे केले जातात? याची माहिती घेऊया…

मासिक पाळी न येण्याची कारणे-

सर्वसाधारण/प्राकृतिक कारणे-

वयाच्या साधारण बारा वर्षांपर्यंत पाळी निर्माण करणारे हार्मोन्स पुरेसे येत नसल्यामुळे पाळी येत नसते. तर गर्भिणी अवस्थेत देखील पाळी उत्पन्‍न करणारी हार्मोन्सची क्रिया थांबली असल्याने पाळी येत नसते. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला अंगावर पाजत असताना काही काळ मासिक पाळी येत नसते. तसेच 'मॅनोपॉज' म्हणजे वयाच्या साधारण 45 ते 50 या काळात नैसर्गिकपणे पाळी येण्याची बंद होते.

पाळी न येण्याची इतर कारणे-

प्रायमरी अमेनोर्‍हिया-मासिक पाळी सुरूच होत नाही

वयाच्या साधारणपणे 15  व्या वर्षांपर्यंत मासिक पाळी नैसर्गिकपणे सुरू व्हायला हवी, जर वयाच्या 16 व्या वर्षांपर्यंत ही पाळी सुरूच झाली नाही तर त्यास त्यावेळी प्रायमरी अमेनोर्‍हिया असे म्हटले जाते.

असे का होते?

मासिक पाळी होण्यासाठी आवश्यक होर्मोन्स तयार करणार्‍या ग्रंथीमधील रचनात्मक किंवा क्रियात्मक दोष हे एक कारण असू शकते. याचबरोबर योनीच्या आतील पडद्याचे भेदन झालेले नसणे, योनीदोष, गर्भाशय नसणे, हार्मोन्समधील असंतुलन, थायरॉईडचे विकार, लहान वयाचा मधुमेह, शरीराचे पोषण व्यवस्थित नसणे, कुपोषण, रक्‍ताची कमतरता (ऑनिमिया) टी.बी.सारख्या विकाराने वजन एकदम कमी झालेले असणे इ. कारणांमुळे मासिक पाळी सुरू होत नाही. (साधारणपणे पोटाची सोनोग्राफी, थायरॉईड, एफएसएच, एलएच,  प्रोलॅक्टिन या हार्मोन्सची रक्‍ताची तपासणी यावरून योग्य निदान होऊ शकते.) 

सेकंडरी अमेनोर्‍हिया-

सुरू असलेली मासिक पाळी ज्यावेळी 6 महिन्यांपेक्षा जास्तकाळ येत नाही, त्यावेळी या अवस्थेला सेकंडरी अमेनोर्‍हिया असे म्हटले जाते. 

असे का होते?

साधारणपणे शरीराचे कुपोषण, तीव्र अशक्‍तपणा, रक्‍ताची टक्केवारी कमी असणे कोणत्याही प्रकारे वाढलेला ताणतणाव, अतिस्थूलपणा, हायपोथायरॉइडिझम किंवा हायपर थायरॉइडिझम हे थॉयराईडचे विकार, गर्भाशयातील रचनात्मक दोष, पीसीओडी हा स्त्रीबीज ग्रंथीचा विकार या कारणांमुळे पाळी येण्याची थांबू शकते. कुटुंब नियोजनाच्या गोळ्या, काही मानसिक तणावावरील, रक्‍तदाबावरील, औषधांच्या दुष्परिणामामुळे पाळी येत नसते. काही वेळा डायबेटिस, किडनीची सूज, अंतस्त्रावी ग्रंथीमधील विकार, हार्मोन्सचे असंतुलन, टी.बी.च्या विकारामुळे गर्भाशयाला सूज येणे, या कारणांमुळे देखील पाळी येण्याची बंद झालेली असते. 

मासिक पाळी न येण्याचे दुष्परिणाम 

मासिक पाळी बंद झाल्यामुळे साधारणपणे स्थूलपणा वाढतो, वजन वाढते, अंग जड वाटणे, निरुत्साह, उष्णता वाढणे, अस्वस्थता, चिडचिडेपणा वाढणे या तक्रारी वाढतात. काही महिलांमध्ये पोट दुखणे, कंबरदुखी अशा तक्रारीही आढळतात. दीर्घकाळ पाळी न आल्यास रक्‍तदाब वाढणे, हृदयविकर, डायबेटिस, गर्भाशयाचा कॅन्सर हे विकार उद्भवू शकतात.

दुष्परिणाम टाळण्यासाठी काय करावे? 

मासिक येत नसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. स्त्री रोग तज्ज्ञाला दाखवून रक्‍त-लघवीची सामान्य तपासणी, रक्‍ताची टक्केवारी, रक्‍तातील साखर, हार्मोन्सच्या प्रमाणांची तपासणी, थायरॉईडची रक्‍तचाचणी करून घ्यावी, तसेच पोटाची सोनोग्राफी या तपासण्या करून स्त्रीरोग तज्ज्ञाकडून कोणत्या कारणांनी पाळी येत नाही, याचे निदान करून नियमित उपचार सुरू करावेत. 

आयुर्वेदीय उपचारांचा उपयोग?

अतिस्थूलपणा, थायरॉईडचे विकार, अ‍ॅनिमिया, ताणतणाव, पीसीओडी, मानसिक तणाव, कुपोषण यामुळे पाळी येत नसल्यास आयुर्वेदीय उपचारांचा उत्तम उपयोग होतो. काही महिलांमध्ये पाळी येण्यासाठी घ्यावयाच्या रासायनिक गोळ्यांमुळे त्रास होत असतो. या महिलांनाही आयुर्वेदिक उपचारांनी आपण प्रयत्न नक्‍की करू शकतो. 

मासिक पाळी येण्यासाठी उपचार करताना महिलेची प्रकृती, वय, आहार इतर सुरू असणारी औषधे यांची माहिती घेऊन तसेच रक्‍त, लघवी, सोनोग्राफी इ.चा अभ्यास करून पाळी येत नसल्याचे कारण निश्‍चिती केल्यावरच आयुर्वेदीय उपचार सुरू केले जातात. मासिक पाळी येण्यासाठी त्रिकुट, कुमारीघन, गुग्गुळ, गाजरबीज, चित्रक, हिंग, कार्पासमूळ, गोरखमुंडी, टंकणभस्म, यशदभस्म, हिराकासिस इ.पासून केलेली संयुक्‍त औषधे रुग्णप्रकृती नुसार वापरावी लागतात. 

याचबरोबर वाढलेले वजन कमी करण्यासाठी, हार्मोन्समधील संतुलन नियमित करण्यासाठी मानसिक ताणतणावांचे नियंत्रण करून चिडचिडेपणा, अस्वस्थता, निरुत्साह कमी होण्यासाठी विविध वनस्पती, खनिज, संयुक्‍त औषधे उत्तम उपयोगी पडतात, असा माझा 25 वर्षांचा अनुभव आहे.

पंचकर्माचा उपयोग उत्तम

शरीरातील वातप्रकोप कमी करण्यासाठी तणाव नियंत्रणासाठी आणि वाढलेले वजन कमी होण्यासाठी पंचकर्म उपचारांचा उत्तम फायदा होतो. औषधी सिद्ध तेलानी सर्वांगाला शास्त्रीय मसाज, काढ्यांच्या वाफेने वाफार्‍यांनी शरीराला शेक देणे, तेलबस्ती, निरुहबस्ती, शिरोधारा इ. उपचार आयुर्वेद तज्ज्ञाच्या सल्ल्याने नियमित काही काम घेतल्यास दुष्परिणाम कमी करण्यासाठी, हार्मोन्सचे संतुलन निर्माण होण्यासाठी, काही काळाने नैसर्गिकपणे पाळी येण्यासाठी आश्‍चर्यकारक फायदा झाल्याचे अनेक रुग्णांमध्ये अनुभवास येते. 

योगासन व्यायमही महत्त्वाचे

मासिक पाळी न येण्याची तक्रार असणार्‍या महिलांनी पवनमुक्‍तासन, कंधरासन, द्विचक्रीकासन, अर्धहलासन, चक्रासन, धनुरासन ही योगासने तसेच सूर्यनमस्कार, उठाबशा काढणे, पिंगा घालणे, पोटाचे व्यायाम नियमित केल्यास अधिक फायदा होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news