

डॉ. उत्कर्ष आजगावकर
नोव्हेंबर हा महिना पोटाचा कर्करोग जागरूकता महिना म्हणून पाळला जातो. दरवर्षी हजारो व्यक्तींना पोटाचा कर्करोग होतो. विविध अभ्यासांनुसार, पुरुषांना महिलांपेक्षा याचा धोका अधिक असतो.
पोटाचा कर्करोग, ज्याला गॅस्ट्रिक कॅन्सर असे देखील म्हणतात. पोटाच्या अस्तरात असामान्य पेशींची अनियंत्रितपणे वाढ झाल्यास हा कर्करोग होतो. हा अनेकदा हळूहळू विकसित होतो आणि शेवटच्या टप्प्यात अपचन, पोट फुगणे, मळमळणे आणि अचानक वजन कमी होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. सर्व वयोगटातील व्यक्तींना या कर्करोगाचा त्रास होतो.
पुरुषांमध्ये धूम्रपान, मद्यपान करणे आणि प्रक्रिया केलेले किंवा हवाबंद डब्यातील पदार्थ खाण्याची सवय अधिक असते, ज्यामुळे पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. म्हणूनच, पुरुषांनी त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक असले पाहिजे. मोठ्या संख्येने पुरुषमंडळी रसायने, धूळ किंवा काही विशिष्ट धातूंशी संबंधित कामे करत असते आणि त्यामुळे त्यांच्यावर या कर्करोगाचा जास्त परिणाम होऊ शकतो. महिलांनाही या कर्करोगाचा त्रास होतो. म्हणूनच निरोगी आहार, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे आणि नियमित तपासणी करणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे.
* आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. फळे, भाज्या आणि तृणधान्यांनी समृद्ध आहाराचे सेवन करावे.
* धूम्रपानाचे सेवन टाळावे आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित करावे.
* प्रक्रिया केलेले पदार्थ, लोणचे आणि स्मोक्ड फुडस्चे सेवन मर्यादित करावे. हेलिकोबॅक्टर पायलोरी संसर्गाचे व्यवस्थापन करावे, ज्यामुळे पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
* नियमित तपासणी करावी आणि असामान्य लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बर्याच व्यक्ती किरकोळ समस्या समजून पोटाच्या कर्करोगाकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच या कर्करोगाबद्दल नागरिकांना जागरूक करणे गरजेचे आहे. पुरुषांना पोटाच्या कर्करोगाचा धोका जास्त असला तरी, निरोगी जीवनशैलीचे पालन करून, वेळीच निदान आणि जागरूकता पसरवणे गरजेचे आहे.