Lung Inflammation | दाह फुफ्फुसांचा

Lung Inflammation |
Lung Inflammation | दाह फुफ्फुसांचा
Published on
Updated on

डॉ. संतोष काळे

क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डीसीज (सीओपीडी) हा फुफ्फुसाचा एक असा दीर्घकालीन दाहक आजार आहे, जो फुफ्फुसांमधील हवेचा प्रवाह रोखतो आणि त्यामुळे श्वास घेण्यास प्रचंड त्रास होतो. प्रामुख्याने यामध्ये एम्फिसीमा आणि क्रॉनिक ब्राँकायटिस या दोन आजारांचा समावेश होतो.

एम्फिसीमामध्ये फुफ्फुसातील हवेच्या छोट्या पिशव्या म्हणजेच अल्वेओली खराब होतात, ज्यामुळे ऑक्सिजन आदान-प्रदानाचे क्षेत्र कमी होते. क्रॉनिक ब्राँकायटिसमध्ये श्वसननलिकांची दीर्घकाळ जळजळ होते, ज्यामुळे सतत खोकला आणि कफ साचण्याची समस्या निर्माण होते. फुफ्फुसातील हवेचा हा मार्ग अपरिवर्तनीय पद्धतीने अवरोधित होतो, जो इतर श्वसन विकारांपेक्षा या आजाराला वेगळा ठरवतो.

हा आजार होण्यासाठी विविध घटक कारणीभूत ठरतात. सिगारेट किंवा तंबाखूचे सेवन करणारे लोक या गटात सर्वात आघाडीवर आहेत. कारण, धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्या ऊतींचे मोठे नुकसान होते आणि सतत जळजळ होऊन हा आजार जडतो. याशिवाय दीर्घकाळ घरातील धूर किंवा बाहेरील घातक हवा प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्यास धोका वाढतो. ज्या कारखान्यांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी धूळ, रासायनिक धूर आणि जळजळीत घटक असतात, तेथे काम करणार्‍या कामगारांना फुफ्फुसाचे नुकसान होण्याचा धोका अधिक असतो. आल्फा-वन अँटिट्रिप्सिनची कमतरता नावाचा दुर्मीळ अनुवांशिक विकार असलेल्या व्यक्तींना धूम्रपान न करताही हा आजार होऊ शकतो. साधारणपणे चाळीशी ओलांडलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार प्रकर्षाने दिसून येतो. कारण, वयानुसार फुफ्फुसांची क्षमता कमी होत जाते आणि लहानपणी वारंवार झालेली तीव्र श्वसन संसर्गजन्य लक्षणेदेखील फुफ्फुसांच्या विकासात अडथळा आणू शकतात.

सीओपीडीच्या लक्षणांची वेळीच ओळख पटवणे अत्यंत आवश्यक असते. सुरुवातीला ही लक्षणे सौम्य असतात; पण कालांतराने कफयुक्त सततचा खोकला विशेषतः शारीरिक श्रम किंवा चालताना धाप लागणे, छातीत घरघर आणि दाब जाणवणे, वारंवार श्वसनाचा संसर्ग होणे आणि सततचा थकवा जाणवणे यांसारखी लक्षणे गंभीर रूप धारण करतात. हवामानातील बदल किंवा संसर्गामुळे या लक्षणांमध्ये अचानक तीव्र वाढ होऊ शकते, ज्याला तीव्र वेदनादायक स्थिती म्हणतात.

या आजाराचे निदान करण्यासाठी स्पायरोमेट्री ही फुफ्फुसांची कार्यक्षमता मोजणारी मुख्य तपासणी केली जाते. याशिवाय छातीचा एक्स-रे, सीटी स्कॅन आणि रक्त तपासणीचा वापर केला जातो. या आजारावर पूर्ण औषधोपचाराने खात्रीशीर इलाज नसला, तरी जीवनशैलीत बदल करून तो नियंत्रणात ठेवता येतो. तसेच इन्फ्लुएंजा आणि न्यूमोकोकल या दोन लसी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. इन्फ्लुएंजा लस ही दरवर्षी दिली जाते, जी फ्लू किंवा हंगामी संसर्गापासून संरक्षण करते. तसेच न्यूमोकोकल लस ही न्यूमोनिया आणि इतर जीवाणूजन्य संसर्गापासून बचाव करण्यासाठी महत्त्वाची ठरते, ज्यामुळे श्वसनाचा त्रास वाढण्याची शक्यता कमी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news