फुफ्फुसाचा कर्करोग : निदान व उपचार
डॉ. सुहास आगरे
फुफ्फुसाचा कॅन्सर हा एक गंभीर कर्करोग आहे. कर्करोगाच्या रुग्णांच्या सर्वाधिक मृत्यूंच्या मुख्य कारणांपैकी फुफ्फुसाचा कर्करोग हे प्रमुख कारण आहे. परंतु; या आजाराचे वेळीच निदान व लवकर उपचार झाल्यास रुग्ण पटकन बरा होऊ शकतो. वेळोवेळी आरोग्याची तपासणी करणे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे रुग्णाला निरोगी आयुष्य जगायला मदत मिळू शकते.
फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान होणार्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सन 2018 मध्ये ग्लोबोकॉनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे 63,475 इतका मृत्यूदर असून भारत मृत्यूदरात चौथ्या क्रमांकावर आहे. 2018 मध्ये जगभरात अंदाजे 2.1 दशलक्ष नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, मानवी शरीरात फुफ्फुस हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. शरीराचे कार्य सुरळीत चालावे, यासाठी फुफ्फुसाची कार्यक्षमता योग्य असणे गरजेचे आहे. फुफ्फुस रक्ताच्या प्रवाहातून शरीरातील उर्वरित भागात ऑक्सिजन पुरवण्याचे काम करत असतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील पेशी नियंत्रणाबाहेर वाढतात तेव्हा कर्करोग होतो. कर्करोग फुफ्फुसांमध्ये सुरू होतो तेव्हा त्याला फुफ्फुसाचा कर्करोग असे म्हणतात. हा कर्करोग शरीरातील लिम्फ नोडस् किंवा इतर अवयवांमध्ये पसरतो. एवढेच नाही तर, कधीकधी दुसर्या अवयवात सुरू झालेला कर्करोग फुफ्फुसात पसरतो.
कर्करोगाचे प्रकार : फुफ्फुसाचा कर्करोगाचे दोन प्रकार आहेत. यात स्मॉल (SCLC) आणि नॉन स्माल (NSCLC). स्माल(SCLC) म्हणजे अतिरिक्त प्रमाणात धूम्रपान करणार्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. तर नॉन स्माल (NSCLC) म्हणजे धूम्रपान करणार्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन धूर फुफ्फुसात गेल्यासही कर्करोग होऊ शकतो.
कर्करोगाची लक्षणे : खोकला, श्वास घेण्यास अडचणी, भूक न लागणे, वजन कमी होणे, बोलताना आवाज स्पष्ट न येणे, तीव्र डोकेदुखी, मानेला सूज येणे.
कर्करोगाची कारणे : फुफ्फुसांच्या कर्करोगाचे कारण म्हणजे सिगारेटचं सेवन. फुफ्फुसाचा कर्करोग होण्यामागे धूम्रपानाचे अतिरिक्त सेवन हे 90 टक्के जबाबदार आहे. त्यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगापासून दूर राहण्यासाठी धूम्रपान करणे सोडणे गरजेचे आहे. प्रदूषित वातावरण आणि फुफ्फुसातील फायब्रोसिसदेखील या प्रकारच्या कर्करोगाला कारणीभूत ठरत आहे.
कर्करोगाचे टप्पे : फुफ्फुसांच्या कर्करोगाचे चार टप्पे आहेत. प्रत्येक रुग्णाच्या कर्करोगाच्या टप्प्यावरून त्याला नेमके काय उपचार द्यायचे हे डॉक्टर ठरवतात.
निदान : फुफ्फुसाचा कर्करोग शोधण्यासाठी छातीचा एक्स-रे, थुंकीची तपासणी, बायोप्सी, सीटीस्कॅन आणि पेट-सीटीस्कॅन अतिशय फायदेशीर ठरते. याशिवाय एन्डोब्रोन्कियल अल्ट्रासाऊंड (ईबीयूएस) या चाचणीमुळेही फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान पटकन करता येते. कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास अन्य अवयवांना होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
उपचार : रुग्णाचा कर्करोग कोणत्या टप्प्यात आहे हे तपासून डॉक्टर उपचाराची पुढील दिशा ठरवतात. कर्करुग्णाला केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि शस्त्रक्रिया अशा पद्धतीने उपचार दिले जातात. याशिवाय औषधोपचार आणि इम्युनोथेरपीद्वारेही रुग्णांवर उपचार केले जातात.
प्रतिबंधात्मक उपाय : फुफ्फुसाचा कर्करोग होऊ नये यासाठी धूम्रपानाची सवय सोडावी आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे, धूम्रपान करणार्यांच्या आसपास राहू नका. सिगारेटच्या धुराच्या संपर्कात येऊ नका. नियमित शारीरिक व्यायाम करा यामुळे आरोग्य सुद़ृढ राहण्यास मदत होते.
