Low Blood Sugar : शरीरातील साखर अचानक कमी झाल्यास काय करावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

केवळ मधुमेहाचे रुग्णच नव्हे तर निरोगी व्यक्तींमध्येही उद्भवू शकते 'लो शुगर'ची समस्या
Low Blood Sugar
Low Blood Sugar
Published on
Updated on

लो ब्लड शुगर, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘हायपोग्लायसेमिया’ म्हटले जाते, ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्य प्रमाणापेक्षा खूपच कमी होते. ग्लुकोज हे आपल्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत असते, त्यामुळे रक्तातील त्याची कमतरता आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

सामान्यतः जेव्हा रक्तातील साखरेची पातळी ७० मिलिग्रॅम प्रति डेसिलिटरपेक्षा कमी होते, तेव्हा हायपोग्लायसेमियाची लक्षणे दिसू लागतात. ही समस्या केवळ मधुमेहाच्या रुग्णांमध्येच नाही, तर काही वेळेस निरोगी व्यक्तींमध्येही उद्‌भवू शकते.

या आजाराची मुख्य लक्षणे सुरुवातीला सौम्य असतात; परंतु वेळेवर उपचार न मिळाल्यास ती गंभीर रूप धारण करतात. अचानक चक्कर येणे, प्रचंड घाम सुटणे, हात-पाय कापणे, हृदयाचे ठोके वेगाने वाढणे आणि तीव्र भूक लागणे ही याची प्राथमिक लक्षणे आहेत. याशिवाय चिडचिड होणे, अंधारी येणे, डोकेदुखी आणि मानसिक गोंधळ निर्माण होणे असाही त्रास होतो. साखरेची पातळी कमालीची खालावल्यास व्यक्ती बेशुद्ध पडू शकते किंवा तिला फिट येण्याचा धोका असतो.

कारणे कोणती?

मधुमेहाच्या रुग्णांनी इन्सुलिन किंवा इतर औषधांचे डोस जास्त प्रमाणात घेणे, वेळेवर जेवण न करणे किंवा दीर्घकाळ उपाशी राहणे हे याचे मुख्य कारण आहे. याव्यतिरिक्त क्षमतेपेक्षा जास्त शारीरिक श्रम किंवा व्यायाम करणे, रिकाम्या पोटी मद्यपान करणे आणि यकृत किंवा किडनीशी संबंधित आजार असणे यामुळेही शरीरातील साखरेची पातळी अचानक कमी होते. काही दुर्मीळ केसेसमध्ये स्वादुपिंडातील गाठींमुळे इन्सुलिनचे प्रमाण वाढून हा त्रास होतो.

१५-१५ चा नियम

या समस्येवर मात करण्यासाठी ‘१५-१५ चा नियम’ अत्यंत प्रभावी मानला जातो. रक्तातील साखर कमी होते, तेव्हा त्वरित अर्धा कप फळांचा रस, तीन ते चार चमचे साखर किंवा ग्लुकोजचे पाणी यांसारखे १५ ग्रॅम कार्बोहायड्रेटस्‌ असलेले पदार्थ घ्यावेत. १५ मिनिटे विश्रांती घ्यावी आणि पुन्हा रक्तातील साखर तपासावी. पातळी अजूनही ७० मिलिग्रॅमपेक्षा कमी असेल, तर ही प्रक्रिया पुन्हा करावी. साखर सामान्य झाल्यावर शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी थोडे जेवण किंवा सकस आहार घेणे आवश्यक आहे. नियमित आरोग्य तपासणी आणि संतुलित आहार या आजाराला दूर ठेवण्यासाठी सर्वोत्तम उपाय ठरतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news