

काही व्यक्तींकडे पाहिले की, त्यांच्या वयापेक्षा त्या अधिक मोठ्या वाटतात. काही अपवाद वगळता चुकीच्या जीवनशैलीमुळे लोक अकाली वृद्ध दिसतात. आपल्या राहणीमानाचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर पडत असतो. चुकीची जीवनशैली आपल्याला अकाली वृद्धत्व येण्यास कारणीभूत ठरते. वृद्धत्व येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती थांबवता येणार नाही; पण जेव्हा तरुणपणातच व्यक्ती म्हातारी दिसू लागते तेव्हा खरी अडचण होते. अनेकदा तीस वर्षे वयाचे लोक चाळीशीचे दिसू लागतात.
अनियमित जीवनशैली, चुकीच्या आहार पद्धत, अनिद्रा, फास्टफूडचे अतिसेवन आणि बैठ्या कामाचे वाढते स्वरूप यामुळे अकाली वृद्धत्व येण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणत्या कारणामुळे अकाली वृद्धत्वाची समस्या जाणवते, ते पाहूया!
चुकीच्या आहारपद्धती ः अकाली वृद्धत्व येण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा चुकीच्या आहार पद्धतीचा आहे. चौरस आहाराची जागा आता फास्टफूडने घेतली आहे. घरातील जेवणाऐवजी बाहेरील मसालेदार जेवणाला लोकांची अधिक पसंती मिळू लागली आहे. थोडक्यात, चव आणि आरोग्य यांच्यामध्ये चवीला अधिक महत्त्व दिले जात आहे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.
व्यायामाचा अभाव ः व्यायामामुळे स्नायू पिळदार होतात आणि रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते. नियमित व्यायाम केल्याने आपली त्वचा चांगली उजळते आणि टवटवीत दिसते. त्यामुळे वाढत्या वयाचा परिणाम दूर राखण्यास मदत होते.
अपुरी झोप ः पुरेशी झोप न झाल्यानेही अकाली वृद्धत्वाची समस्या येऊ शकते. सध्याची जीवनशैली धावपळीची आहे. त्यामुळे झोपायलासुद्धा वेळ नाही. पुरेशी झोप न मिळाल्याने अनेक आजारांचा विळखा पडतो.
अतिमद्यपान ः दारूमुळे त्वचेतील लहान रक्तवाहिन्या आणि त्वचेच्या जवळील भागातील रक्ताचा प्रवाह वाढवते. त्यामुळे वयोवृद्धीच्या खुणा दिसू लागतात.
धूम्रपान ः धूम्रपान किंवा सिगारेट पिणे फॅशनची गोष्ट झाली आहे. आपण स्वतः सिगारेट पित असू किंवा सिगारेट पिणार्यांबरोबर वेळ घालवत असू, तर सिगारेटच्या धुरामुळेही वयवाढीचा धोका संभवतो. कारण, सिगारटेच्या धुरामुळे शरीराचे अधिक प्रमाणात नुकसान होते. त्याचा प्रभाव आपल्या त्वचेवर होताना दिसतो. त्याचबरोबर सिगारेटच्या धुरामुळे त्वचा कोरडी होते आणि सुरकुत्याही वाढतात.
तणाव ः महानगरांमध्ये राहणार्या लोकांना विविध प्रकारच्या तणावांना सामोरे जावे लागते. थोडक्यात, धावपळीच्या जीवनशैलीची मिळालेली ही भेट आहे. तणावग्रस्त असल्यास चेहर्यावरील स्नायूंवर सुरकुत्या येतात. त्या आपल्या चेहर्यावर अकाली वृद्धत्वाच्या खुणा म्हणून दिसू लागतात. चिंता आणि चिता यात फार फरक नाही असे म्हणतात, ते खरेच आहे.
पाण्याची कमतरता ः अकाली वृद्धत्वाची समस्या रोखण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करायला हवे. पाण्यामुळे अकाली वृद्धत्वाची समस्या दूर होते असे नाही, तर त्वचेचे स्वास्थ्य चांगले राहते आणि ती चमकदारही होते. हल्ली मात्र लोकांचा पाणी पिण्याऐवजी थंड पेय पिण्याकडे कल दिसून येतो. त्यामुळे त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होते.