Children's Health | मुलांच्या अंगावर भिजलेले कपडे तसेच ठेवताय?

Children's Health |
Children's Health | मुलांच्या अंगावर भिजलेले कपडे तसेच ठेवताय?
Published on
Updated on

डॉ. तुषार पारिख

पावसाळा हा मुलांसाठी आनंदाचा ऋतू असला, तरी या दिवसांत काही संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढतो. त्यापैकीच एक म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) अर्थात मूत्रमार्गाचा संसर्ग होय. पावसात भिजल्यानंतर दीर्घकाळ ओले कपडे घालून राहणे, पुरेसे पाणी न पिणे, लघवी जास्त वेळ रोखून धरणे आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे यामुळे विशेषतः ३ ते १३ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये युटीआयचा धोका वाढू शकतो.

मूत्रमार्गात जिवाणूंचा प्रवेश होऊन त्यांची वाढ झाल्यास युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतो. याचा परिणाम मुत्राशय, मूत्रमार्ग आणि काही वेळा किडनीवरही होऊ शकतो. पावसाळ्यात मुले बराच वेळ ओले कपडे किंवा ओल्या अंतर्वस्त्रांमध्ये राहतात. तसेच पाणी कमी पिणे आणि लघवी रोखून धरण्याच्या सवयींमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो.

युटीआयची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत...

लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे

वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणे

ताप येणे

पोटदुखी किंवा कंबरेत दुखणे

अंथरुण ओले करणे

उलट्या होणे

थकवा जाणवणे

मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढणे

वेळीच उपचार न झाल्यास हा संसर्ग किडनीपर्यंत पसरून पायलोनेफ्रायटिससारखा गंभीर संसर्ग होण्याची

शक्यता असते. त्यामुळे काही वेळा किडनीला

दीर्घकालीन नुकसानही होऊ शकते. म्हणूनच युटीआयची लक्षणे दिसून आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात पालकांनी

पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी

पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे त्वरित बदलावेत. अंग स्वच्छ पुसावे.

दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय लावावी.

लघवी जास्त वेळ रोखून ठेवू नये.

शौचालयाचा वापर केल्यानंतर हात धुण्याची आणि योग्य स्वच्छता राखण्याची सवय लावावी.

जननेंद्रियांचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवावा.

मुलांना स्वच्छ, सुती आणि सैल कपडे परिधान करावेत.

शाळेत पाण्याची बाटली नियमितपणे रिकामी करण्यास मुलांना प्रोत्साहन द्यावे.

पावसाळ्यात मुलांच्या आरोग्याची काळजी घेताना केवळ सर्दी-खोकल्यापुरतेच लक्ष मर्यादित ठेवू नये. ओले कपडे, अपुरी स्वच्छता आणि पाणी कमी पिण्याच्या सवयी युटीआयसारख्या वेदनादायक आणि काही वेळा गंभीर संसर्गाला कारणीभूत ठरू शकतात. योग्य स्वच्छता, पुरेसे पाणी आणि वेळीच उपचार यांच्या मदतीने मुलांना या संसर्गापासून सुरक्षित ठेवणे सहज शक्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news