

करिअर, लाइफस्टाइल आणि वैयक्तिक प्राधान्यांमुळे अनेक महिला सध्या विवाह आणि गर्भधारणेचे (Pregnancy) नियोजन उशिरा करतात. परंतु, अनेकदा ३० वर्षांची सीमा ओलांडल्यानंतर महिलांना गर्भधारणेसंबंधी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. वय वाढल्यामुळे शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि प्रजनन आरोग्यावर (Reproductive Health) होणारा परिणाम यावर वेळेत माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टरांच्या मते, महिलांनी कुटुंब नियोजन करण्यापूर्वी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.
प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologist) सुलभा कुलकर्णी यांच्या मते, 30 वर्षांनंतर महिलांच्या प्रजनन क्षमतेत खालीलप्रमाणे बदल दिसून येतात:
अनियमित ओव्हुलेशन: ३० नंतर महिलांच्या मासिक पाळीच्या चक्रात (Period Cycle) बदल होऊ लागतात. यामुळे ओव्हुलेशन (अंड्याचे तयार होणे आणि बाहेर पडणे) व्यवस्थित होत नाही. ओव्हुलेशन अनियमित झाल्यास गर्भधारणा होण्यास (Conceive) अडचण येते.
AMH पातळीत घट: या वयात AMH (Anti-Müllerian Hormone) ची पातळी कमी होऊ लागते. हे हार्मोन अंडाशयातील अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता (Ovary Reserve) दर्शवते. AMH पातळी खालावल्यास प्रजनन क्षमता (Fertility) कमी होते आणि गर्भधारणेस विलंब होऊ शकतो.
हार्मोनल असंतुलन: ३० नंतर हार्मोनल असंतुलन ही एक सामान्य समस्या बनते. यामुळे मासिक पाळी कधी लवकर, तर कधी उशिरा येते. अनियमित मासिक पाळीमुळे योग्य वेळी गर्भधारणा प्लॅन करणे कठीण होते.
PCOS चा धोका: हार्मोनल असंतुलनामुळे अनेकदा PCOS (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) सारख्या समस्या उद्भवतात, ज्यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणे अधिक कठीण होते.
३० वर्षांनंतर गर्भधारणा प्लॅन केल्यास काही उच्च जोखीम (High Risk) निर्माण होऊ शकतात:
अंड्यांची गुणवत्ता घटणे: वाढत्या वयानुसार अंड्यांची गुणवत्ता कमी होते.
गर्भपाताचा (Miscarriage) धोका: संशोधनानुसार, ३० नंतर गर्भपात होण्याचा धोका वाढतो.
उच्च जोखीम असलेली गर्भधारणा: या वयात मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (Blood Pressure) आणि थायरॉईड (Thyroid) यांसारख्या समस्या देखील गर्भधारणेत अडचणी निर्माण करू शकतात.
उपचारांची गरज: अनेकदा नैसर्गिकरित्या गर्भधारणा न झाल्यास IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) किंवा इतर कृत्रिम प्रजनन तंत्राची (Artificial Reproductive Technique) मदत घ्यावी लागते.
डॉक्टरांच्या मते, महिलांसाठी २५ ते ३० वर्षांचे वय गर्भधारणेसाठी सर्वाधिक उपयुक्त मानले जाते. या काळात शरीरातील हार्मोनल संतुलन योग्य असते, अंड्यांची गुणवत्ता उत्तम असते आणि शरीर प्रसूतीसाठी सक्षम असते. तथापि, प्रत्येक महिलेची शारीरिक स्थिती आणि आरोग्य वेगळे असते. त्यामुळे कुटुंब नियोजन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
आजकाल उशिरा गर्भधारणा हा ट्रेंड झाला असला तरी, योग्य काळजी घेतल्यास ३० नंतरही निरोगी आणि सुरक्षित गर्भधारणा शक्य आहे:
नियमित तपासणी: वेळोवेळी प्रजनन क्षमता (Fertility) चाचण्या करून घ्या.
समतोल आहार: सकस आणि संतुलित आहार घ्या, ज्यामध्ये सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे असतील.
जीवनशैली: निरोगी जीवनशैली (Healthy Lifestyle) आणि नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे.
तणाव कमी करा: योग आणि ध्यान (Meditation) यांच्या मदतीने तणाव कमी ठेवा.
व्यसनांपासून दूर: धूम्रपान (Smoking) आणि मद्यपान (Alcohol) पूर्णपणे टाळा.
डॉक्टरी सल्ला: योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घ्या आणि गरजेनुसार उपचार करा.