गुडघेदुखी सतावतेय? | पुढारी

Published on
Updated on

डॉ. मितेन शेठ

गुडघा हा मांडीचे हाड आणि नडगीचे हाड यांच्यातील सांधा असतो आणि त्याच्या पुढील बाजूस वाटी असते. गुडघ्यामुळे शरीराच्या खालच्या भागाला स्थैर्य मिळते आणि लवचिकता येते. शरीरातील हाडे आणि सांधा महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, 'आर्थरायटिस' संधिवात झाला तर हाडे कमजोर होऊन सांधेदुखीची समस्या निर्माण होते. सांधा म्हणजे गुडघा हासुद्धा तीन हाडे, गुडघ्यांची वाटी आणि संधीबंधांनी तयार होतो.

प्रामुख्याने गुडघ्याचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. मांडी घालून बसणे, पाय दुमडून बसणे आदी अनेक क्रियांमुळे गुडघ्यांच्या हालचाली अधिक होऊन तेथील हाडे झिजणे, तेथील वंगण कमी होणे किंवा अतिउष्णतेमुळे गुडघ्याला सूज येते. त्यामुळे गुडघ्याची समस्या सुरू होते. संधिवातामुळे सांध्यातील वेदना सुरू होतात. हाडांची झीज झाल्यामुळे गुडघेदुखीही निर्माण होते.

भारतात, रुग्णालयात दाखल होणार्‍या दहापैकी चार रुग्णांना गुडघेदुखीचा त्रास असतो. 60 वर्षांवरील ज्येष्ठांमध्ये जवळपास 90 टक्के लोकांमध्ये काही प्रमाणात ऑस्टिओआर्थरायटीस आहे. 45 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांपैकी एक तृतीयांश लोक गुडघेदुखीवर उपचार घेत असल्याचे दिसून येते. जगभरात ऑस्टिओ आर्थरायटिसने पीडित रुग्णांची संख्या वाढत असून, गुडघे प्रत्यारोपणाकडे रुग्णांना अधिक कल असल्याचे दिसून येते. 

नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार तीस कोटी लोकसंख्या असलेल्या यूएसएमध्ये 10 लाख रुग्णांनी गुडघे प्रत्यारोपण केल्याचे दिसून येते. 

भारतातही वाढत्या लोकसंख्येचा विचार केल्यास यापुढे गुडघे प्रत्यारोपणाला अधिक मागणी असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.

अलीकडच्या काळात अगदी तरुण वयामध्ये गुडघ्याच्या ऑस्टिओऑर्थरायटिस आजाराचे निदान झालेल्या पेशंटचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे. बैठी जीवनशैली व गुडघ्यांना होणार्‍या दुखापतींमुळे नवतरुणांमध्ये गुडघ्याचा आजार बळावत चालल्याचे दिसून येत आहे. आता अगदी पंचवीस वयापर्यंतचे पेशंट उपचारांसाठी डॉक्टरकडे येतात. ऑस्टिओआर्थरायटिसच्या पेशंटच्या संख्येत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

प्रतिबंध आणि उपचार प्राथमिक स्वरूपाचे आहेत. गुडघ्याचा अतिवापर किंवा थेट 

दुखापती टाळणे. योग्य पादत्राणे वापरा. सर्व स्नायूंच्या तंदुरुस्तीकडे लक्ष द्या आणि जिममधील व्यायामांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करा. गुडघ्याच्या पुढील भागात सतत वेदना होत असतील, तर ऑर्थोपेडिक किंवा गुडघेविकार तज्ज्ञांना भेटा. थोडक्यात, तुम्ही शारीरिक हालचाली करत असाल तर दुखापतीचा धोका असतोच.

लठ्ठपणा आणि गुडघेदुखी

आपलं वजन नियमितपणे तपासत राहा. ते अधिक असेल तर तातडीने दखल घेऊन कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करा. ऑस्टिओ आर्थरायटिससाठी अतिरिक्‍त वजन हा अत्यंत घातक घटक आहेच. कारण वजनाचा अतिरिक्‍त ताण हाडांवरच येतो आणि त्यातूनच सांध्यांचे कार्टिलेज फाटू लागते. म्हणूनच अतिरिक्‍त वजन असलेल्या आणि लठ्ठ व्यक्‍तींना तरुणपणीच संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

भारतीयांमध्ये गुडघेदुखीचे प्रमाण अधिक

तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यानुसार जपान आणि स्वित्झर्लंडच्या तुलनेत झीज होऊन सांधे दुखणे-सुजणे याचे भारतात प्रमाण अधिक आढळते. गुडघ्यावर याचा आघात होतो. कारण गुडघा हा सर्वाधिक मार व भार सोसत असतो. गुडघ्याची हालचाल सर्वाधिक होत असते. धावणे, पळणे, उड्या मारणे, वजन उचलणे यामध्ये गुडघ्याची झीज होते. त्यामुळेच भारतात गुडघ्यांचा संधीवात अधिक आढळतो. तासन्तास कॉम्प्युटरवर काम करणे, टी.व्ही.समोर ठाण मांडून बसणे, चालण्याची दुरावलेली सवय, वाढलेले वजन, कमी होत चाललेल्या शारीरिक हालचाली यामुळे भारतात संधिवाताचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी अतिश्रमाची कामे करणार्‍यांमध्ये हा आजार आढळून येत होता; पण बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्येही आता याचे प्रमाण वाढले आहे.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news