Knee ACL Injury | गुडघ्यातील एसीएल दुखापत

Knee ACL Injury |
Knee ACL Injury | गुडघ्यातील एसीएल दुखापतFile photo
Published on
Updated on

डॉ. मनोज कुंभार

हालचालींदरम्यान गुडघ्याचे स्थैर्य राखण्यासाठी एसीएल हा बंध अत्यंत आवश्यक असतो. जेव्हा हा अस्थिबंध अतिप्रमाणात ताणला जातो किंवा फाटतो, तेव्हा त्याला एसीएलची इजा असे संबोधले जाते. ही इजा केवळ खेळाडूंनाच होते असे नाही, तर दैनंदिन जीवनात पायर्‍या चढताना किंवा चढ-उताराच्या रस्त्यावरून चालताना पाय लचकल्यामुळे कोणालाही होऊ शकते.

धावताना अचानक दिशा बदलणे, वेगात असताना एकदम थांबणे, उंचावरून उडी मारल्यानंतर जमिनीवर चुकीच्या पद्धतीने पाय टेकणे किंवा गुडघ्यावर थेट आघात होणे यामुळे हा अस्थिबंध फाटू शकतो. ज्यांच्या मांड्यांचे किंवा खुब्याचे स्नायू कमकुवत आहेत, अशा व्यक्तींमध्ये ही इजा होण्याची शक्यता अधिक असते. इजा झाल्यावर अनेकदा गुडघ्यातून कडाडल्यासारखा आवाज येतो, ज्याला ‘पॉपिंग साऊंड’ असे म्हणतात. यानंतर गुडघ्याला त्वरित सूज येणे, तीव्र वेदना होणे, पायावर वजन पेलता न येणे आणि गुडघा लचकल्यासारखा वाटणे, ही या दुखापतीची प्रमुख लक्षणे आहेत. काही वेळा वेदना कमी झाल्या तरी गुडघ्यातील अस्थिरता कायम राहते, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात सांधेदुखीचे गंभीर विकार जडू शकतात.

या समस्येचे निदान करण्यासाठी ‘लॅकमन टेस्ट’सारख्या विशेष चाचण्यांद्वारे गुडघ्यातील अस्थिरतेचा अंदाज घेतला जातो. दुखापतीची अचूक व्याप्ती समजून घेण्यासाठी ‘एमआरआय’ चाचणी केली जाते, ज्यामध्ये अस्थिबंध किती प्रमाणात फाटला आहे आणि गादीला काही इजा झाली आहे का, याची स्पष्टता मिळते. हाडांच्या फ्रॅक्चरची शक्यता तपासण्यासाठी ‘एक्स-रे’चा वापर केला जातो.

इजेचे स्वरूप सौम्य असल्यास शस्त्रक्रियेशिवाय उपचार केले जातात. यात विश्रांती, बर्फाने शेकणे, गुडघ्याला आधार देण्यासाठी पट्टा लावणे आणि विशेष फिजिओथेरपीचा समावेश होतो. वृद्ध किंवा कमी सक्रिय जीवनशैली असलेल्या लोकांसाठी हा पर्याय उत्तम ठरतो; मात्र जर अस्थिबंध पूर्णपणे फाटला असेल आणि रुग्ण तरुण किंवा क्रीडापटू असेल, तर ‘एसीएल रिकन्स्ट्रक्शन’ ही शस्त्रक्रिया करावी लागते. आजच्या काळात ‘आर्थ्रोस्कोपिक’ तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत सुलभ झाली असून, यात शरीरातील दुसर्‍या भागातील ऊतींचा वापर करून नवा अस्थिबंध तयार केला जातो. व्यायाम करताना योग्य वॉर्मअप करणे, पायांच्या स्नायूंची ताकद वाढवणे आणि समतोल सुधारण्यावर भर दिल्यास पुन्हा ही इजा होण्याचा धोका टाळता येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news