मानसिक तणाव ठेवा दूरच | पुढारी

Published on
Updated on

डॉ. आनंद ओक

मानसिक तणाव वाढल्यानंतर अंग खाजणे, पित्त उसळणे, गांधी उठणे, अंगावर सूज येणे, अंग खाजून लाल होणे अशी लक्षणे उत्पन्‍न होतात…

निरोगी आयुष्यासाठी शरीराइतकेच मानसिक स्वास्थ्यालाही महत्त्व आहे. वाढलेले मानसिक ताणतणाव अनेक आजारांना निमंत्रण देणारे ठरू शकतात. वाढलेल्या मानसिक ताणतणावातून कोणते त्रास होऊ शकतात, याची माहिती प्रत्येकाला असायला हवी. 

वाढत्या ताणतणावामुळे होणारे त्रास ः मानसिक  तणाव उत्पन्‍न झाल्यानंतर त्या तणावाचा परिणाम शरीरातील दुर्बल संस्थेवर होऊन विविध लक्षणे उत्पन्‍न होतात. म्हणजेच, सर्वांमध्ये मानसिक तणावांमुळे एकच प्रकारचा विकार उत्पन्‍न होईल, असे नाही. मानसिक तणावाचा  परिणाम व्यक्‍तीवरील ज्या संस्थेवर होतो, त्याप्रमाणे वेगवेगळी लक्षणे उत्पन्‍न होताना आढळतात. प्रत्येक व्यक्‍तीत सर्व लक्षणे असतातच, असे नाही. 

छातीत जळजळणे, मळमळणे, उलटी आल्यासारखे वाटणे, उलटी होणे, पोटात दुखणे, पोट गच्च होणे अशी लक्षणे दिसतात, तर काही जणांत पोट बिघडणे, कळ करून संडासला होणे, रक्‍ताचे थेंब पडणे, जुलाब होणे अशी लक्षणे दिसतात. मानसिक तणाव वाढल्यावर अजिबात भूक न लागणे, अन्‍न नकोसे वाटणे हा प्रकारदेखील आढळतो. 

छातीत धडधडणे, आवळल्यासारखे वाटणे, छातीत दुखणे, पाठीत कळ येणे, रक्‍तदाब वाढणे या तक्रारी मानसिक तणावाचा परिणाम हृदयावर झाल्यामुळे उत्पन्‍न होतात. काही वेळा तणावाचे अधिक्य अती झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. 

दम लागणे, श्‍वास घेताना त्रास होणे, छातीत सू सू वाजणे अशी दम्याची लक्षणे काही लोकांमध्ये निर्माण होतात. 

लैंगिक विकार ः इंद्रियाला शिथिलता येणे, संभोग इच्छा कमी होणे, समाधानकारक समागम न करता येणे, शीघ्रपतन हा त्रास पुरुषांमध्ये उत्पन्‍न झालेला आढळतो. स्त्रियांमध्ये संभोग इच्छा नसणे, मासिक पाळीच्या वेळी त्रास होणे, अती रक्‍तस्राव होणे, वारंवार पाळी येणे किंवा अजिबातच पाळी न येणे अशा तक्रारी उत्पन्‍न होतात. 

मानसिक तणाव वाढल्यानंतर अंग खाजणे, पित्त उसळणे, गांधी उठणे, अंगावर सूज येणे, अंग खाजून लाल होणे अशी लक्षणे उत्पन्‍न होतात. सोरायसिस या त्वचा विकारात मानसिक तणावाचा अधिक परिणाम झालेला आढळतो. 

स्थूलपणा वातविकार ः मानसिक तणावातून जास्त खाण्याची प्रवृत्ती होते. त्यामुळे वजन वाढणे, चरबी वाढणे, जडत्व, दम लागणे, सर्वांगावर सूज येणे, तर काही जणांत रक्‍तातील साखरेचे प्रमाण वाढून मधुमेह होतो. सांधे दुखणे, सांधे सुजणे, मान दुखणे, डोके दुखणे, मळमळ, उलटी होते. मानसिक तणावातून निर्माण होणार्‍या अथवा वाढणार्‍या रुग्णांमध्ये उपचार करताना मूळ विकाराच्या उपचाराच्या जोडीलाच मानसिक तणाव दूर करण्यासाठी मनाची सहनशक्‍ती अथवा मनाचे बल वाढविणे गरजेचे असते. यावर काही जण टेन्शन कमी करणार्‍या रासायनिक गोळ्या घेत असतात. यातून तात्पुरता आराम मिळत असला तरी काही जणांत या औषधांचे दुष्परिणाम जाणवत असतात. यामुळे अशा रासायनिक औषधापेक्षा मनाचा सत्त्वगुण वाढविणारी मनःशक्‍ती वाढविणारे आयुर्वेदिक उपचार घेणे उपयोगी आणि सुरक्षित आढळून येत आहेत. 

औषधी उपचार ः आयुर्वेदातील  ब्राह्मी, शंखपुष्पी, अश्‍वगंधा, चंदन जटांमासी, मंडूकपर्णी, मालकागोणी, वचा, तगर इत्यादी वनस्पतीजन्य औषधांची आणि माक्षिक भस्म, रौप्य भस्म, अभ्रक भस्म, सुवर्ण भस्म, मौक्‍तिक भस्म इत्यादी भस्माच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या औषधांचा वापर रुग्णाच्या प्रकृती, वय इत्यादींचा विचार करून केला जातो. 

पंचकर्म उपचार वरदान ः मानसिक तणावासाठी आयुर्वेदातील औषधी तेलाने संपूर्ण शरीराला शास्त्रीय मसाज, डोक्याला मसाज, औषधी तेल नाकामध्ये टाकणे म्हणजेच नस्य कर्म, बस्ती, विरेचन, शिरोबस्ती हे  पंचकर्मातील उपचार अतिशय उपयोगी पडतात.

रामबाण उपचार 'शिरोधारा' ः औषधी तेल अभिषेकाप्रमाणे डोक्यावर सोडणे म्हणजेच शिरोधारा हा उपचार मानसिक तणाव नियंत्रणासाठी अतिशय रामबाण उपचार आहे. साधारणपणे 20 ते 40 मिनिटे प्रकृतीनुसार योग्य तेल अथवा काढा वापरून हा उपचार केला जातो. सलग 7 ते 14 दिवस केल्यास यामुळे आश्‍चर्यकारक फायदा होतो. या गुणधर्मामुळेच शिरोधारा हा उपचार संपूर्ण भारतात तसेच परदेशात  ख्यातनाम झाला आहे. 

विविध प्रकारची योगासने, प्राणायाम, संकीर्तन, ध्यान या गोष्टींची वरील उपचारांना जोड दिल्यास मनःशक्‍ती वाढविण्याचे काम जास्त लवकर होेते, असेही अनुभवास येते. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news