दूर ठेवा घामोळ्यांना | पुढारी

Published on
Updated on

डॉ. संजय गायकवाड

 

उन्हाळ्यामध्ये अनेकांच्या त्वचेवर घामोळ्या येतात. त्यामुळे त्वचेवर खाज आणि जळजळ होते. याकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी निसर्गाने आपल्या शरीरात घर्मग्रंथी ठेवल्या आहेत. या ग्रंथीद्वारे शरीरातील उष्णता वाफ बनून घामाच्या रूपाने बाहेर पडते आणि शरीर थंड राहते. या ग्रंथी त्वचेच्या अंतरस्तरात असतात. त्याच्या नलिकामार्गातून घाम त्वचेवर येतो. ज्यावेळी ही रंध्रे बंद होतात तेव्हा घामोेळ्या येण्यास सुरुवात होते. 

शास्त्रीय भाषेत घामोळ्यांना प्रिक्ली हीट, मिलियारिया किंवा स्वेट रॅश असेही म्हणतात. ज्या व्यक्‍तींना सामान्यांपेक्षा अधिक घाम येतो आणि त्यांच्या घर्मग्रंथी बंद होतात, तेव्हा घामोळ्या येतात. उन्हाळ्यात खूप जास्त घाम येत असल्यामुळे त्वचेवरील मृतपेशी आणि जीवणूंसाठी घर्मग्रंथी बंद करणे सोपे ठरते. हे दोन्ही मिळून त्वचेवर अडथळा बनवतात, त्यामुळे त्वचेच्या आतल्या स्तरांतून येणारा घाम बाहेर येण्याचा थांबतो. त्यामुळे त्वचेच्या खालच्या स्तरामध्ये घाम साचतो. तिथे छोटे-छोटे उंचवटे बनतात. हे उंचवटे बारीक पुरळांच्या रूपात दिसतात. ते फुटतात आणि त्यातून घाम बाहेर पडतो तेव्हा टोचल्यासारखी किंवा डंख मारल्यासारखी जाणीव होते. कापडाने सतत झाकलेल्या शरीराच्या भागावर घामोळ्या अधिक प्रमाणात येतात. कंबर, पोट, पाट, गळा, मान इत्यादी भागात त्या येतात; पण या व्यतिरिक्‍त त्या कोणत्याही भागात येऊ शकतात.

घामोळ्या आल्यानंतर शरीरावर छोटे-छोटे लाल पुरळ होतात, तेथे खाज सुटते. प्रमाण वाढल्यास जळजळ आणि टोचल्यासारखे होते. हा त्रास काही दिवसांत आपोआप दूर होतो. मात्र, तसे झाले नाही तर डॉक्टरांकडे जावे; अन्यथा घामोळ्यांमध्ये संसर्ग होऊ शकतो. याचे प्रमाण कमी असले तरीसुद्धा असा त्रास झाल्यास रुग्णाला ताप येणे, घामोळ्यामधून पू बाहेर येणे, तेथे वेदना आणि सूज येणे, मान आणि त्याजवळचा भाग सुजणे इत्यादी लक्षणे दिसतात. घामोळ्या येऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घ्यावी. गरम आणि आर्द्र वातावरणात जाणे टाळावे. कारण अशा ठिकाणी उष्णता आणि दमटपणामुळे खूप जास्त घाम निघतो. त्यामुळे घामोळ्या येऊ शकतात. उन्हापासून बचाव करण्यासाठी पंखे, कुलर किंवा ए.सी.चा उपयोग करावा. गार पाण्याने अंघोळ करावी. त्वचा कोरडी आणि थंड ठेवावी. घराबाहेर पडताना छत्री वापरावी, भरपूर द्रवपदार्थ घ्यावेत, सैल आणि सुती कपडे घालावीत. या दिवसात पॉलिस्टर, नायलॉन यासारखे सिंथेटिक कपडे घालणे टाळावे. यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही. 

घामोळ्या झाल्यानंतर त्या पसरू नयेत आणि संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी अँटिबॅक्टेरियल साबणाचा वापर करावा. यामुळे त्वचेवर अधिक जीवाणू तयार होणार नाहीत. घामोळ्या खाजवू नये; अन्यथा संसर्ग पसरू शकतो. त्वचा कोरडी करण्यासाठी टॉवेलऐवजी हवेमध्ये उभे राहून त्वच्या कोरडी करावी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही क्रिमचा किंवा लोशनचा वापर करू नये. तणाव, नैराश्य यासारख्या गोष्टीपासून दूर राहावे. 'क' जीनवसत्त्वयुक्‍त फळे, भाज्या यांचा आहारात भरपूर प्रमाणात समावेश करावा. त्यासाठी टोमॅटो, लिंबू, संत्र, मोसंबी इत्यादींचे अधिक प्रमाणात सेवन करावे. घामोळ्यांवर मॉश्‍चराइजर लावणे. दिवसातून किमान दोनदा गार पाण्याने अंघोळ करावी.

लवकर आराम मिळावा, यासाठी सुगंध नसलेली टाल्कम पावडर लावावी. त्यातही खास घामोळ्यांसाठी असणारी पावडर 2 ते 3 वेळा दिवसातून लावावी. यामुळे आराम मिळतो. घामोळ्या झाल्यानंतर जळजळ होत असल्यास त्यावर बर्फ फिरवावा. त्यावर बराच आराम मिळतो. घामोळ्यांसाठी शरीर आतून थंड ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी दिवसातून रोज तीन ग्लास लिंबू पाणी प्यावे. मुलतानी माती, गुलाब पाण्यात भिजवून त्याचा लेप लावावा. कोरडे झाल्यानंतर गार पाण्याने धुवून टाकावा. घामोळ्यांवर टरबूजाचा गर लावल्यास आराम मिळतो. काकडी खिसून घामोळ्यांवर लावल्यास आराम मिळतो. तसेच काकडी सॅलेड म्हणूनही भरपूर खावी. 

लहान मुलांना घामोळ्यांचा अधिक त्रास होतो. कारण, लहान मुलांच्या घर्मग्रंथी पूर्णपणे विकसित झालेल्या नसतात. त्यामुळे त्यांच्या शरीरातून पूर्णपणे घाम बाहेर येऊ शकत नाही आणि उष्णता आतच राहते. अनेकदा अधिक घामोळ्यांमुळे मुलांना तापही येतो. अशावेळी मुलांना त्वरित डॉक्टरांकडे घेऊ जावे. 

वास्तविक पाहता घाम आल्यामुळे शरीरातील घाम निघून जातो तसेच विषारी घटक ही बाहेर टाकले जातात. घाम येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे त्वचेमधील आर्द्रता कायम राहते. शरीरातील तापमाण कायम राहते. सतत ए.सी.मध्ये बसून राहिल्यास त्यामुळे त्रास होऊ शकतो. कारण, शरीरासाठी जसे पाणी आवश्यक आहे, तसे घाम येणे ही आवश्यक आहे. उन्हाळ्यात घामामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि चक्‍कर येण्यापासूनही बचाव होतो. त्यामुळे शरिरात घाम आला नाही तर अनेक प्रकारचे रोग उत्पन्‍न होऊ शकतात. तसेच गरजेपेक्षा जास्त घाम शरीराबाहेर टाकला जात  असेल तर त्याला हायपर हायड्रोसिस असे म्हणतात. या आजाराचे निदान करताना घामाचा प्रकार, कपड्यावर अधिक डाग पडणे, घामाला दुर्गंधी येणे इत्यादी निरीक्षण केले जाते. उन्हाळ्यात जास्त काम केल्याने घाम अधिक येतो; पण शरीरात आधीपासून काही आजार असेल तर अधिक घाम येऊ लागतो; पण घामाला दुर्गंधी येणे ही देखील एक गंभीर समस्या आहे. आपल्या शरीरात जवळपास 26 लाख स्वेदग्रंथी असतात. त्वचेवर असणारे जीवाणू घामाच्या संपर्कात आल्यास दुर्गंधी येऊ लागलते.

ज्या व्यक्‍ती शरीराची स्वच्छता योग्यप्रकारे ठेवत नाहीत, त्यांच्या शरीरावर अधिक जीवाणू तयार होतात आणि घामाची दुर्गंधी ही वाढते. ही दुर्गंधी त्वरित दूर केली नाही तर तेथे घामोळ्या येतात. पोट साफ नसेल किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, थायरॉईड ग्रंथीच्या अधिक स्त्रावामुळे, चरबीयुक्‍त भोजन किंवा मसालेदार पदार्थ अधिक खाल्याने जास्त घाम येतो. अधिक घाम येत असल्यास डेअरी उत्पादने, हिरव्या भाज्या, पुदिना इत्यादी खावे. त्यामुळे शरीरात गरजेपेक्षा जास्त घाम तयार होणार नाही. सातूचे पीठ खावे. त्यामुळे शरीर गार राहते. ताजी फळे, सॅलडस्, लस्सी, सरबते भरपूर प्रमाणात प्यावीत. आहारात रोज दही खावे, तसेच दुधी भोपळा, कांदा, काकडी इत्यादी खावेत. अंघोळीच्या पाण्यात डेटॉल, खस किंवा गुलाब पाण्याचे काही थेंंब टाकावेत, त्यामुळे शरीर ताजेतवाणे राहते. उन्हाळ्यामध्ये 2-3 तास घातलेले कपडे पुन्हा कपाटात ठेऊ नये. कारण यामध्ये घामाच्या दुर्गंधीसोबतच जीवाणूही असतात. कपडे धुवूनच कपटात ठेवावेत. दिवसातून 10-14 ग्लास पाणी प्यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news