

डॉ. प्राजक्ता पाटील
नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, जंक फूडचे अधिक सेवन मुलांच्या डोळ्यांच्या प्रकाशावर परिणाम करू शकते आणि ही सवय दीर्घकाळ सुरू राहिली, तर ती अंधत्वाचे कारणसुद्धा बनू शकते.
आजकाल लहान मुले असोत किंवा मोठी माणसे, घरचे पौष्टिक अन्न सोडून बर्गर, पिझ्झा, चिप्स, कोल्डड्रिंक्स, केक, वेपर्स यांसारख्या जंक फूडकडे जास्त आकर्षित होत आहेत. जंक फूडचे जास्त सेवन पचनाशी संबंधित अनेक समस्यांना कारणीभूत ठरते, ही गोष्ट बहुतेक लोकांना माहीत असते; पण जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्याने मुलांच्या डोळ्यांना हानी पोहोचू शकते आणि त्यांच्या डोळ्यांची द़ृष्टीसुद्धा कमी होऊ शकते. मुळातच बौद्धिक, शारीरिक विकासासाठीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असणार्या मुलांना जंक फूड देणे पूर्णतः चुकीचे आणि अनारोग्यदायी आहे.
डोळ्यांचा विचार करता, जंक फूडमध्ये डोळ्यांसाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि झिंक यांसारखे पोषक घटक जवळजवळ नसतात. असे अन्न वारंवार खाल्ल्याने मुलांच्या डोळ्यांच्या पेशींना आवश्यक पोषण मिळत नाही. त्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येणे, धूसर दिसणे, जळजळ होणे, कमी प्रकाशात दिसण्याची क्षमता घटणे अशा समस्या सुरू होतात.
ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन एची कमतरता झाल्यास रेटिनाच्या पेशी कमकुवत होऊ लागतात. ही पोषणतूट दीर्घकाळ कायम राहिली, तर डोळ्यांच्या नसांमध्ये नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे अंधत्वाचा धोका निर्माण होतो.
मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी त्यांच्या आहारात गाजर, पालक, दूध, अंडी, अक्रोड आणि मासे यांसारख्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली स्वीकारल्यास डोळ्यांची द़ृष्टी कमी होण्यापासून मोठ्या प्रमाणात बचाव करता येतो. याशिवाय डोळ्यांची नियमित तपासणी डोळ्यांच्या डॉक्टरांकडून करून घेणे आणि तज्ज्ञ नेत्ररोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने डोळ्यांचे व्यायाम करणे उपयुक्त ठरते.