

डॉ. संतोष काळे
डोळे हे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचे आणि संवेदनशील अवयव आहेत. सध्याच्या धावपळीच्या जीवनात तासन्तास मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही स्क्रीनसमोर वेळ घालवणे, बदलणारे हवामान, धूळ आणि वाढते प्रदूषण यांचा डोळ्यांवर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. यामुळे डोळ्यांत खाज सुटणे, जळजळ होणे, डोळे लाल होणे आणि कोरडेपणा जाणवणे अशा समस्या उद्भवतात.
अनेकदा लोक डोळ्यांच्या लक्षणांना किरकोळ समजून त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा घरगुती उपाय करून पाहतात; परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वेळीच लक्ष न दिल्यास या समस्या भविष्यात द़ृष्टीशी संबंधित गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतात.
डोळ्यांतील खाज आणि जळजळ होण्याची विविध कारणे असू शकतात. यामध्ये अॅलर्जी आणि संसर्ग ही सर्वात सामान्य कारणे आहेत. धूळ, माती, धूर आणि प्रदूषणामुळे डोळ्यांच्या नाजूक थरावर परिणाम होतो, ज्यामुळे डोळे लाल होतात आणि पाणी येते. तसेच, प्रदीर्घ काळ स्क्रीन पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. संसर्गामुळे डोळ्यांत वेदना, जळजळ आणि सूज येण्याची शक्यता असते. सुरुवातीला ही लक्षणे सौम्य वाटू शकतात; परंतु काही दिवसांत आराम न मिळाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे अनिवार्य ठरते.
दिवसभरात पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आहारात ‘व्हिटॅमिन ए’ आणि ‘ओमेगा-3 फॅटी अॅसिड’ युक्त पदार्थांचा समावेश केल्यास डोळ्यांची द़ृष्टी चांगली राहते. स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. हात आणि चेहरा नेहमी स्वच्छ ठेवावा आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे टाळावे. प्रदूषण किंवा धुळीच्या ठिकाणी जाताना संरक्षक चष्मा वापरावा. डोळ्यांत खाज येत असल्यास ते जोरात चोळू नका, कारण यामुळे कॉर्नियाला इजा होऊन संसर्ग वाढू शकतो.
दोन ते तीन दिवसांत साध्या उपायांनी आराम मिळाला नाही, तर त्वरित नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे ‘स्टिरॉइड’ युक्त आय ड्रॉप्स वापरणे डोळ्यांसाठी अत्यंत घातक ठरू शकते. घरगुती उपचार म्हणून गुलाब जल किंवा इतर कोणतेही द्रव पदार्थ थेट डोळ्यांत टाकण्यापूर्वी डॉक्टरांचे मत घेणे सुरक्षित ठरते. वेळेवर केलेली तपासणी आणि योग्य निगा राखल्यास डोळ्यांच्या गंभीर समस्या टाळता येतात.
डोळ्यांत सतत कोरडेपणा जाणवत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्स’चा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.