डॉ. प्रवीण हेंद्रे
कंबरदुखीचा व गर्भाशयाच्या विकाराचा दुरान्वयेसुद्धा संबंध नाही. अगदी गर्भाशयाला जास्त जंतुसंसर्ग झाल्यास थोडाफार कंबरदुखीचा त्रास होतो. एमआरआय करून काटेकोरपणे अचूक निदान व उपचार करणे सुलभ झाले आहे…
1980-81 पासून आजतागायत जवळजवळ 40 वर्षे विविध प्रकारचे रुग्ण पाहिल्यानंतर माझ्या लक्षात काही गोष्टी आल्या आहेत. बहुतेक स्त्रिया खालील बाबींसाठी गर्भाशय काढा असे म्हणतात…
1) पोटदुखी/कंबरदुखी
2) अंगावरून पांढरे पाणी जाणे
3) वारंवार जनन मार्गाचे जंतुसंसर्ग
4) अंग बाहेर येणे
5) मासिक पाळीदरम्यान अथवा पाळीव्यतिरिक्त अतिरिक्त रक्तस्राव
आता पोटदुखी ही अगदी छोटासा मुतखडा होण्यापासून ते पित्ताशयाचे इन्फेक्शन अथवा खडा, अपेंडिक्सला आलेली सूज, गर्भाशयाच्या नलिकेवर असलेला जंतुसंसर्गापासून ते स्वादुपिंड विकारापर्यंत अनेक व्याधींमुळे पोटदुखी होऊ शकते. त्यासाठी आज अत्याधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये सोनोग्राफी, सीटीस्कॅन, एमआरआयसारख्या तपासण्या उपलब्ध आहेत. या तपासण्यांद्वारे आपण काटेकोरपणे अचूक निदान करू शकतो व निदान झालेल्या आजारावर उपचार करता येतात.
अनेक दिवसांपासून गर्भाशयाची सूज किंवा विकारामुळे कंबर दुखते असा एक गैरसमज आहे. परंतु, कंबरदुखीचा व गर्भाशयाच्या विकाराचा दुरान्वयेसुद्धा संबंध नाही. गर्भाशयाला जास्त जंतुसंसर्ग झाल्यास थोडाफार कंबरदुखीचा त्रास होतो. कंबरदुखीसाठी एमआरआय करून काटेकोरपणे अचूक निदान करता येते व उपचार करणे सुलभ झालेले दिसते. तेव्हा कंबरदुखी व पोटदुखीचे कारण शोधून त्यावर योग्य ते उपाय करणे हे त्याचे उत्तर आहे. इतर काही विकारामध्ये म्हणजे गर्भाशयाच्या बाजूला असलेल्या स्त्री बिजांडामध्ये पाण्याची अथवा विविध प्रकारच्या गाठी झाल्यास व त्याला पीळ पडल्यास पोट दुखू शकते. तसेच गर्भाशय व गर्भनलिकेचा जंतुसंसर्ग झाल्यास पोट दुखते. तसेच स्त्री बिजांडामध्ये जेव्हा स्त्री बीजनिर्मिती होते तेव्हा काही वेळेस रक्तस्राव होतो. Haemorrhagic cyst of ovary त्यावेळेस सुद्धा या वेदना होतात. स्त्री बिजांड कोशामध्ये Endometrioma, Dermoidcyst अशा विविध प्रकारच्या गाठी होतात. अशावेळेस केवळ त्या गाठीचे आतील आवरण दुर्बीण शस्त्रक्रियेद्वारे काढून स्त्री बीज वाचविणे शक्य आहे. असे जे छोटे-मोठे स्त्री जनन संस्थेचे विकार आहेत त्याची गर्भाशय शाबूत ठेवून दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे शक्य आहे. त्यासाठी समूळ गर्भाशय काढणे हा उपाय होऊ शकत नाही. Fibroid च्या गाठीसुद्धा काढून गर्भाशय टिकविणे शक्य आहे व ही शस्त्रक्रियासुद्धा गर्भाशय वाचवून करता येते.
2) अंगावर पांढरा स्राव होणे किंवा पांढरे पाणी जाणे किंवा श्वेतप्रदर पांढरा स्राव अगदी स्त्री बीजनिर्मितीवेळेस नॉर्मल असण्यापासून गर्भाशयाच्या तोंडाचा Cervix च्या कॅन्सरपर्यंत विविध कारणांमुळे अंगावर जननमार्गावाटे पांढरा स्राव होत असतो. त्याची काही प्रमुख कारणे आहेत.
A) Physicilogy जेव्हा स्त्री बीजनिर्मिती होते तेव्हा आपोआप जनन मार्गाचा रक्तपुरवठा वाढलेला असतो. त्यामुळे Cervix गर्भाशयाचे तोंडातील ग्रंथी सचेतन होतात व पांढरा बुळबुळीत चिकट स्राव बाहेर येतो हा थोड्याच कालावधीपुरता असतो. त्यासाठी काही करावे लागत नाही.
B) जंतुसंसर्ग जननमार्गाचा जंतुसंसर्ग हे फार मोठे कारण आहे. हा जंतुसंसर्ग Virus विविध प्रकारच्या Herbes विषाणूपासून होतो व सर्वसाधारण हे जंतुसंसर्ग लैंगिक संबंधातून पसरत असतात. तसेच जनन मार्गाची स्वच्छता न राखल्यास होत असतात. गुद्द्वार हे जननमार्गाच्या बाह्य मुखाच्या अगदी जवळ असल्याने Ecoli या जंतूचा संसर्ग होणे संभव असतो तेव्हा मल विसर्जनानंतर विपट म्हणजेच बाह्य जननेंद्रिय व गुद्द्वारजवळील सर्व भागाची स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे असते. तसेच बाकी जंतुसंसर्गामध्ये गोनोरिया संसर्ग तसेच आता फार विरळ दिसणारा सिफीलीस व Tricomoniasis नावाचा परोपजीवी जीवाणूच्या संसर्गानेसुद्धा पांढरा स्राव होतो तसेच गरोदरपण व मधुमेही स्त्रियामध्ये बुरशी म्हणजेच Fungal Infection होऊन पांढरा स्राव होतो. अशा विविध प्रकारच्या विकारांवर आज रामबाण उपाय आलेले आहेत; परंतु अशा विषाणू, जंतू किंवा परोपकारी जीवाणूंच्या संसर्गाचे उपचार करीत असताना लैंगिक संबंध असलेल्या सहचाराला सुद्धा एकाचवेळी उपचार केल्यास पुन्हा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी होते.
तसेच गर्भाशयाच्या मुखावर निरुपद्रवी जखम असल्यास सुद्धा पांढरा स्राव होतो. त्यासाठी Pap Smear ची तपासणी अथवा गर्भाशयाच्या मुखावरील जखमेचा छोटा तुकडा घेऊन त्याची Biopsy पृथक्करण करून त्यावर अती थंड (Cryo)) किंवा Thermal औष्णीक किंवा Electric शेक देता येतो. गर्भाशयाच्या मुखाला झालेल्या जखमेवर शेक द्यायचा म्हटले की, स्त्रियांच्या मनात भीती निर्माण होते; परंतु हा शेक व कर्करोग झाल्यावर द्यावयाचा शेक या अगदी भिन्न गोष्टी आहेत हे लक्षात घ्यायला हवे आहे.
तसेच गर्भाशय जर शरीराबाहेर सरकले तरी ते कपड्यांना घासून पांढरा स्राव होतो.
आता गर्भाशयाच्या कर्करोगासंबंधी गर्भाशयाच्या मुखाचा (Cervix) व गर्भाशयाच्या आतील त्वचा (Endrometrium) व गर्भाशयाचा स्नायू Myometrium हे तीन भिन्न उतीचे प्रकार आहेत. तेव्हा त्याचा कर्करोग वेगवेगळ्या प्रकारात मोडतो त्याची कारणे व उपचार ही वेगळे आहेत.
गर्भाशयाच्या मुखाचा (Cervix) चा कर्करोग हा खूप Comman म्हणजे जास्ती प्रमाणात आढळणार आहे व त्यामुळे जननमार्गावाटे पांढरे जाण्याचे प्रमाण जास्ती आढळते. हा कर्करोग HPV नावाच्या विषाणूपासून होतो. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे तो केवळ लैंगिक संबंधामधून पसरतो तेव्हा त्याच्या विरुद्ध तयार झालेल्या Cancer Immunisation लस आहे ती स्त्री (मुलगी)च्या पहिला समागम होण्यापूर्वी देणे गरजेचे आहे.
एकदा समागमाद्वारे HPV चा संसर्ग झाला तर अशा लसीचा काहीही उपयोग होत नाही म्हणून ही लस मुलगी वयात येण्यापूर्वी देणे हे जास्ती संयुक्तिक आहे. तसेच नंतर द्यावयाची असल्यास HPV चा संसर्ग झाला नाही, याची रक्त तपासणी करूनच ती द्यावी लागते.
यानंतर आपण अंग बाहेर येणे व गर्भाशयाच्या Fibroid च्या गाठीसंबंधीची कारणे व गर्भाशय न काढता करता येणारे उपाय जाणून घेऊ.