

डॉ. संतोष काळे
भर उन्हातून घराबाहेरून आल्यानंतर लगेच थंड पाण्याने स्नान करणे ही अनेकांसाठी अत्यंत सुखावह गोष्ट असते; मात्र ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
बाहेरच्या प्रखर उष्णतेतून आल्यावर शरीराचे तापमान खूप वाढलेले असते. अशा स्थितीत लगेच थंड पाणी अंगावर घेतल्यास शरीराला एक प्रकारचा ‘टेंपरेचर शॉक’ म्हणजेच तापमानाचा तीव्र धक्का बसतो. उन्हाळ्यात उष्माघातापासून वाचण्यासाठी जशी खबरदारी घ्यावी लागते, तशीच खबरदारी घरी आल्यानंतरच्या पहिल्या अर्ध्या तासात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
आपण प्रखर उन्हात असतो, तेव्हा आपले शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी रक्तवाहिन्यांचे रुंदीकरण करते. या प्रक्रियेमुळे शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाते आणि हृदयाचे ठोके वाढतात. तसेच, घामावाटे शरीर तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असते. अशावेळी अचानक थंड पाण्याचा संपर्क आल्यास शरीरातील पृष्ठभागावरील रक्तवाहिन्यांचे वेगाने आकुंचन होते. याला वैद्यकीय भाषेत ‘व्हासोकॉन्स्ट्रिक्शन’ असे म्हणतात. यामुळे रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होऊन रक्तदाब अचानक वाढू शकतो. ही परिस्थिती हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण करते.यामुळे चक्कर येणे किंवा शुद्ध हरपण्यासारखे प्रकार घडू शकतात.
विशेषतः वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि ज्यांना हृदयाचे विकार किंवा रक्तदाबाचा त्रास आहे, अशा लोकांसाठी ही सवय जीवघेणी ठरू शकते. अचानक होणार्या या बदलामुळे मज्जासंस्थेवर ताण येतो आणि शरीराची नैसर्गिक तापमान नियंत्रण प्रणाली कोलमडू शकते. तज्ज्ञांच्या मते, बाहेरून आल्यावर किमान पंधरा ते तीस मिनिटे विश्रांती घेणे आवश्यक आहे. या काळात नैसर्गिक पद्धतीने शरीराचे तापमान सामान्य होऊ द्यावे. पंख्याखाली बसणे, घाम सुकू देणे आणि साध्या तापमानाचे पाणी पिणे यामुळे शरीराचे अंतर्गत तापमान स्थिर होण्यास मदत होते.
स्नानासाठी पाण्याचे तापमान कसे असावे, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. उष्णतेतून आल्यानंतर एकदम थंड पाण्यापेक्षा कोमट किंवा शरीराच्या तापमानाशी जुळणार्या पाण्याचा वापर करणे अधिक सुरक्षित मानले जाते. कोमट पाण्यामुळे शरीराला हळूहळू थंडावा मिळतो आणि रक्ताभिसरण सुरळीत राहते. तुम्ही खूप वेळ उन्हात काम केले असेल किंवा प्रवासातून आला असाल, तर प्रथम ओल्या रुमालाने शरीर पुसून घेणे हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीरातील उष्णता सावकाश बाहेर पडते.
अनेकांना असे वाटते की, थंड पाण्याने स्नान केल्यास उन्हाचा चटका कमी होईल. प्रत्यक्षात अंतर्गत उष्णता कोंडली जाण्याची शक्यता असते. उष्माघात, स्नायूंचे पेटके आणि अशक्तपणा टाळण्यासाठी घाईघाईने स्नान करण्याऐवजी थोडा संयम राखणे हिताचे ठरते. सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग आणि विज्ञान यांचा समन्वय साधत शरीराचा नैसर्गिक वेग ओळखणे हीच उन्हाळ्यातील आरोग्याची गुरुकिल्ली आहे.