

डॉ. भारत लुणावत
जगभरातील आरोग्यविषयक चर्चेत लोहाच्या कमतरतेचा विषय नवीन नाही; पण अलीकडच्या काळात तो अधिकच गंभीर होत चालला आहे. पोषणतज्ज्ञ सांगतात की, लोहाची कमतरता ही केवळ एक वैयक्तिक आरोग्य समस्या नाही, तर ती समाज, अर्थव्यवस्था आणि पिढ्यान् पिढ्यांच्या आरोग्याच्या गुणवत्तेवर दीर्घकालीन परिणाम करणारी सार्वजनिक आरोग्याची समस्या आहे. शाकाहारी अथवा पूर्णपणे वनस्पतीआधारित आहार पद्धतीचा स्वीकार करणार्या लोकांमध्ये लोह कमतरतेची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते.
लोह हे मानवी शरीरातील हिमोग्लोबिनचे मुख्य घटक आहे. हे रक्तातील लाल पेशींमार्फत शरीराच्या सर्व भागांना प्राणवायू पोहोचवण्याचे काम करते. लोहाची कमतरता झाल्यास रक्तक्षय (अॅनिमिया) होतो. यामुळे थकवा, अशक्तपणा, एकाग्रतेत घट, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आणि गंभीर अवस्थेत गर्भवती महिलांमध्ये मातामृत्यू अथवा बालमृत्यूचा धोका वाढतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालांनुसार, जगातील जवळपास 30 टक्के लोकसंख्या लोहअल्पतेच्या समस्येला सामोरे जाते. विशेषत: विकसनशील देशांमध्ये, जिथे लोकसंख्या मोठी आणि पोषणविषयक संसाधने मर्यादित असतात, तिथे ही समस्या गंभीर रूप धारण करते.
अलीकडील अभ्यासांनुसार, 2040 पर्यंत जागतिक अन्न उत्पादन आणि पुरवठा पद्धतीत मोठे बदल झाले नाहीत, तर लोहटंचाईचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, हवामान बदल, जमिनीची सुपीकता घटणे, पिकांच्या पोषणमूल्यातील घट आणि लोकांच्या आहार पद्धतीतील बदल.
वनस्पती-आधारित अन्नामध्ये लोह असते; पण ते ‘नॉन-हीम आयर्न’ स्वरूपात असल्यामुळे ते मानवी शरीरात सहज शोषले जात नाही. याशिवाय अशा अन्नपदार्थांमध्ये फायबर, फायटिक अॅसिडसारखे घटक जास्त प्रमाणात असतात, जे लोहाच्या शोषणाला अडथळा निर्माण करतात. उदाहरणार्थ, कडधान्ये, धान्ये, पालेभाज्या यामध्ये लोह असते; पण त्यातील मोठा भाग शरीरात उपयोगी पडत नाही.
याउलट, मांस, मासे, अंडी यांसारख्या प्राणिजन्य अन्नामध्ये ‘हीम आयर्न’ असते, जे सहज शोषले जाते आणि त्यामुळे शरीरात लोहाची पातळी टिकवून ठेवणे सोपे होते. म्हणूनच आहारतज्ज्ञ सांगतात की, पूर्ण शाकाहारी आहार घेताना लोहाच्या स्रोतांची काळजीपूर्वक निवड करणे आवश्यक आहे.
लोहाच्या कमतरतेचे परिणाम केवळ आरोग्यावरच नव्हे, तर देशाच्या आर्थिक उत्पादकतेवरही दिसून येतात. काम करण्याची क्षमता कमी होणे, शैक्षणिक कामगिरी घसरणे, लहान मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासात अडथळे निर्माण होणे ही याची काही गंभीर उदाहरणे आहेत. गर्भवती महिलांमध्ये लोहअल्पता असली, तर प्रसूतीदरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो.
भारतामध्ये लोहअल्पता ही अतिशय मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार देशातील सुमारे 57 टक्के महिला आणि 67 टक्के लहान मुले लोहअल्पतेने त्रस्त आहेत. ग्रामीण भागात ही समस्या अधिक तीव्र आहे, कारण, तिथे आहारात लोहयुक्त अन्नाचे प्रमाण कमी असते आणि एकाच वेळी परवडणारे, पोषणयुक्त अन्न सहज उपलब्ध नसते.
फक्त एकाच प्रकारच्या अन्नावर अवलंबून न राहता धान्ये, कडधान्ये, पालेभाज्या, सुका मेवा, बिया, तसेच शक्य असल्यास मासे, अंडी, मांस यांचा संतुलित वापर करणे.
बाजारात उपलब्ध लोहाने समृद्ध केलेली पीठे, तांदूळ किंवा धान्यांचा वापर वाढवणे.
व्हिटॅमिन ‘सी’ लोहाच्या शोषणास मदत करते. म्हणून लोहयुक्त अन्नाबरोबर लिंबू, संत्री, पेरू, टोमॅटो यांचा समावेश करणे.
विशेषतः महिलांमध्ये आणि किशोरवयीन मुलींमध्ये लोहअल्पतेबाबत माहिती पोहोचवणे.
अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयांमधील माध्यान्ह भोजनात लोहयुक्त व पोषणमूल्यांनी भरपूर अन्न देणे.