डॉ. प्राजक्ता पाटील
जागतिक आरोग्य संघटनेने २८ मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून जाहीर केला आहे. त्याऔचित्याने महिलांनी पाळी असताना काय काळजी घ्यावी, शरिराची स्वच्छता कशी ठेवावी, आहार कोणता घ्यावा, याविषयीचा खास लेख तुमच्यासाठी. ही माहिती शेवटपर्यंत वाचा.
मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेची काळजी न घेतल्यास अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे भविष्यात गंभीर आजारही होऊ शकतात. त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैली आणि आहार याच्या व्यतिरिक्त इतर काही गोष्टींची काळजी घेणे जरूरीचे असते. मासिक पाळीच्या दरम्यान आपल्याला कोणतीही समस्या येऊ नये यासाठी काही उपयुक्त सल्ले.
मासिक पाळी किंवा पिरिअडची सुरुवात सर्वसाधारणपणे 12-13 व्या वर्षी होते. हल्लीच्या काळात हे वय अलीकडे आले आहे. दर महिन्याला पाच दिवस रक्तस्राव होत असतो. स्त्रीच्या रजोनिवृत्तीपर्यंत किंवा मेनापॉजपर्यंत वयाच्या 45-46 वर्षांपर्यंत हे चक्र सातत्याने सुरू असते. अपवाद गर्भावस्था. 21 व्या वर्षानंतरचा काळ हा गर्भधारणेसाठी उपयुक्त असतो. 35 व्या वर्षानंतर शरीरातील हार्मोन्स अर्थात संप्रेरकांमध्ये बदल होऊ लागतो. शरीरातील अॅस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रोन ही संप्रेरके यांचा संबंध मासिक पाळीशी असतो. अशावेळी जेव्हा मासिक पाळीशी निगडीत काही समस्या आल्यास निष्काळजीपणा न करता स्त्रीरोग तज्ज्ञांशी संपर्क करावा. त्याचबरोबर मासिक पाळीच्या दरम्यान मुलींनी आणि स्त्रियांनी सॅनिटरी नॅपकिनचा वापर करावा. त्यामुळे स्त्री आरोग्याशी निगडीत काही समस्यांपासून बचाव होण्यास मदत होते.
संसर्गापासून बचाव – मासिक पाळीसाठी सॅनिटरी नॅपकिन वापरल्यास अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव होतो. आजही देशात सुमारे तीस टक्के शहरी महिला सॅनिटरी नॅपकिन वापरतात. दूर खेडेगावात आणि ग्रामीण भागात गोणटे, कापड, प्लास्टिक, भुसा किंवा चक्क राखेचा वापर करतात. यामुळे महिलांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. योनीमार्गाचे संक्रमण, मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे भविष्यात गर्भाशयालाही संसर्ग होऊ शकतो. त्यामुळ ओटीपोटाचा दाह रोग आणि गर्भाशय नलिका यांच्या अंतर्भागात नुकसान होऊ शकते. मासिक पाळीच्या दरम्यान अस्वच्छ कपडे आणि इतर कोणत्याही कारणाने झालेला संसर्गामुळे गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात.
सावधगिरी बाळगा – पाळीसाठी वापरले जाणारे सॅनिटरी पॅडस ही महागडी असतात. त्यामुळे परवडत नसल्याने स्त्रिया सुती कापड, कापूस यांचा वापर करतात; पण या गोष्टी वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यामुळे संसर्गाचा धोका टळतो. कपडे साफ, स्वच्छ आणि कोरडे तसेच अवशोषक असावेत. म्हणजे पाळीचा रस्त्रस्राव शोषून घेण्यास समर्थ असावेत. कापडाचा वापर केल्यास एकदा वापरलेले कापड पुन्हा वापरू नये. पाळीच्या काळात स्वच्छतेकडे लक्ष असावे. अन्यथा अस्वच्छतेमुळे गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. हेपेटायटिस 'बी' आणी 'सी' तसेच क्षयरोग यांच्यासारख्या घातक रोगांना सामोरे जावे लागते.
जीवनशैली आणि आहार – वास्तविक मासिकपाळी ही स्त्रियांच्या शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया शारीरिक बदल आणि संप्रेरकाचा प्रभाव यांच्यामुळे मासिक पाळी येते. त्यात अनैसर्गिक किंवा अवघड असे काही नाही. त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान दिनचर्या सर्वसामान्य असली पाहिजे. अर्थात या काळात आहारावर अधिक लक्ष दिले पाहिजे. आरोग्यदायी, पोषक आहार घेतला पाहिजे. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात अशस्त्रपणा जाणवण्यासारख्या गोष्टींना आळा बसतो.
* लोह आणि कॅल्शियम युस्त्र आहाराचे सेवन या काळात अधिक प्रमाणात केले पाहिजे. रस्त्रस्राव होत असल्याने शरीराला लोहाची आवश्यकता असते.
* तंतुमय पदार्थ असलेल्या भाज्या फळे तसेच सुकामेवा यांचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे जरूरी पोषक घटक मिळतात.
* या दिवसांत अति तेलकट, प्रक्रिया केलेले, मसालेदार पदार्थ तसेच बेकरीचे पदार्थ, वेफर्स यांचे सेवन अजिबात करू नये.
* मासिक पाळीच्या काळात हलका व्यायाम करावा. त्यामुळे पाळीच्या काळात भेडसावणार्या समस्या दूर होऊ शकतील.
* या काळात भरपूर पाणी प्यावे. जेणेकरून डीहायड्रेशनची समस्या जाणवणार नाही.
लक्षात ठेवा
मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे. स्वच्छता आणि नॅपकिनच्या वापराने संसर्गजन्य आजारापासून वाचता येते. अन्यथा या समस्या उग्र स्वरूप घेऊन वंधत्व येण्याची शक्यता असते. यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नये. कोणत्याही प्रकारची समस्या झाल्यास जसे अतिरक्तस्राव किंवा अति कमी रक्तस्राव किंवा अनियमित मासिक पाळी यापैकी कोणत्याही त्रासासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.