Weightloss Formula | ‘इंटरमिटंट फास्टिंग’ वेटलॉस फॉर्म्युला

Weightloss Formula
Weightloss Formula | ‘इंटरमिटंट फास्टिंग’ वेटलॉस फॉर्म्युलाPuhdari File Photo
Published on
Updated on

मंजिरी फडके

भारती सिंहने 15 किलो वजन कमी करून एक नवा आरोग्यदायी अवतार सादर केला. तिचा हा प्रवास केवळ सौंदर्य किंवा बाह्य रूप बदलण्यापुरता मर्यादित नसून तिच्या एकंदर आरोग्यातील सुधारणा आयुष्यभरासाठी सकारात्मक वळण घेऊन आल्या.

भारतीने तिच्या वजन घटवण्याच्या प्रवासाची सुरुवात 91 किलोवरून केली आणि 10 महिन्यांतच ती 76 किलोपर्यंत पोहोचली. हा प्रवास तिने केवळ व्यायामावर आधारित ठेवला नाही, तर तिने आहारशास्त्र आणि जीवनशैली यामध्ये महत्त्वपूर्ण बदल केले. विशेष म्हणजे, ती अस्थमा (श्वसनविकार) आणि मधुमेह यांसारख्या दीर्घकालीन आजारांशी लढत होती. वजन कमी केल्यानंतर तिच्या या समस्या नियंत्रणात आल्या आणि तिला अधिक ऊर्जा, चपळता आणि ताजेपणा वाटू लागला.

तिने तिच्या यशाचे सर्वात मोठे श्रेय ‘इंटरमिटंट फास्टिंग’ या आहार पद्धतीला दिले. भारती सांगते की, ती रोज संध्याकाळी 7 नंतर ते दुसर्‍या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत काहीही खात नाही. तिचे जेवण फक्त या वेळेत असते. ती म्हणते, मी 30-32 वर्षे खूप खाल्लं; पण आता मी माझ्या शरीराला एक वर्ष दिलं. त्या वेळेत मी माझ्या शरीराच्या गरजांना समजून घेतलं आणि माझ्या सवयींमध्ये बदल केला.

इंटरमिटंट फास्टिंग किंवा मध्यम उपवास ही एक अशी पद्धत आहे, ज्यात शरीराला विश्रांती देत पचनसंस्थेला पुनर्जागरणाची संधी दिली जाते. 2022 मध्ये ‘न्युट्रिएंटस्’ या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, अशा प्रकारचा उपवास मेटाबोलिझम वाढवतो आणि त्यामुळे शरीर अधिक कॅलरी जाळते. भारतीचा अनुभवही याला पुष्टी देतो. भारतीने वजन कमी करताना कधीही तिच्या आवडत्या पदार्थांना पूर्णपणे नकार दिला नाही. तिने ‘मॉडरेशन’ म्हणजेच प्रमाणात खाणे या तत्त्वाचे पालन केले. ती म्हणाली, मी माझ्या आवडीचे पदार्थ खाल्ले; पण त्यांचे प्रमाण ठरवलेलं असायचं. मी जेवण वगळलं नाही; पण मी प्रमाण राखलं. अनेक वेळा लोक वजन कमी करण्यासाठी जेवणच वगळतात; पण यामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

‘पोर्टियन कंट्रोल’ : भारतीने ‘पोर्टियन कंट्रोल’ म्हणजेच एकाच वेळी खाल्ल्या जाणार्‍या अन्नाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याची पद्धत अंगीकारली. अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीज’नुसार, पोर्टियन कंट्रोल हा एक प्रभावी उपाय आहे, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवता येते.

वेळेवर खाणे : आहाराव्यतिरिक्त तिने एक अत्यंत महत्त्वाचा नियम पाळला तो म्हणजे वेळेवर खाणे. ती कितीही व्यस्त असली, तरी तिने तिचे जेवण ठरावीक वेळेतच केले. बर्‍याच लोकांना वाटतं की, वेळेवर जेवण हा फारसा महत्त्वाचा मुद्दा नाही. प्रत्यक्षात हेच वजन नियंत्रणासाठी निर्णायक ठरते. अनियमित जेवण शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम करते आणि त्यातून चरबी संचयाची प्रक्रिया वाढत जाते.

भारती सिंह आज केवळ एका यशस्वी कॉमेडियनची ओळख ठेवत नाही, तर ती एक फिटनेस प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वही बनली आहे. तिचं म्हणणं आहे, मी आता खूप खूश आहे. आता मला माझ्या साईजमध्ये क्रॉप टॉप्स मिळतात. चांगले कपडे घालता येतात. हे खूप मजेदार आहे. तिचा अनुभव सांगतो की, वजन घटवणे म्हणजे फक्त सौंदर्यप्रसाधन नव्हे, तर ते आत्मविश्वास आणि आरोग्य यांचं प्रतीक आहे. तथापि, भारतीसारखेच पथ्य अनुसरणे प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. वजन घटवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या प्रत्येक पद्धतीची वैद्यकीय पडताळणी आवश्यक असते. कोणतीही नवी आहारशैली, व्यायाम पद्धती किंवा उपवास सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news