नियमित फायबरयुक्त आहार का गरजेचा?

फायबर नैसर्गिक पद्धतीने शरीराची स्वच्छता करण्यासाठी मदत करतात
fiber-rich diet
फायबरयुक्त आहार
Published on
Updated on
डॉ. संजय गायकवाड

फायबर म्हणजे तंतुमय खाद्यपदार्थ हे आपल्या भोजनाचा महत्त्वाचा भाग असणे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी गरजेचे आहे. स्पंजप्रमाणे काम करणारे हे फायबर नैसर्गिक पद्धतीने शरीराची स्वच्छता करण्यासाठी मदत करत असतात.

कडधान्ये, पालेभाज्या, फळे, डाळी, राजमा वगैरेंसारख्या बिया यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायबरयुक्त आहार लाभदायी ठरतो. आळशी, पालेभाज्या आणि कडधान्ये यांसारखे अन्नपदार्थ आतड्यांना मजबुती देतात.

फायबरचे प्रमुख दोन प्रकार आहेत. एक सोल्युबल आणि दुसरे इनसोल्युबल फायबर. इनसोल्युबल फायबर हे कडधान्ये आणि त्यांपासून बनवलेले पदार्थ, बीजयुक्त अन्न, ताजी फळे, भाज्या यांमध्ये अधिक प्रमाणात असतात. या फायबरमुळे आतड्यांवर कमी दाब पडतो आणि बद्धकोष्ठता होत नाही. या अन्नघटकांमध्ये कमी प्रमाणात चरबी असल्यामुळे वेटलॉससाठी किंवा वजन वाढू न देण्यासाठी ते लाभदायक ठरतात. अधिक फायबरयुक्त खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे वाताशी निगडित रोगही उद्भवत नाहीत.

फायबरचा दुसरा प्रकार म्हणजे सोल्युबल फायबर. हे फायबर पाण्यात विरघळणारे असतात आणि शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखण्यामध्ये विशेष उपयोगी असतात. चवळी, राजमा यांमध्ये सोल्युबल फायबर अधिक प्रमाणात असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राखण्यासाठी मदत मिळते. फायबरयुक्त अन्नात असणारे तंतू शरीरातील टाकाऊ पदार्थांना मुलायम बनवतात. यामुळे हे पदार्थ आतड्यांमध्ये अधिक काळ राहत नाहीत आणि त्यांना बाहेर पडणे सोपे जाते. मलाशयावर अधिक जोर पडत नाही. याउलट आहारात फायबरच्या कमतरतेमुळे मळ शुष्क आणि कडक होतो. यामुळे अनेक हानिकारक रसायने, विषारी पदार्थ इत्यादींच्या संक्रमणाची भीती निर्माण होते. फायबरमुळे टाकाऊ पदार्थ मलाशयातून बाहेर टाकण्यासाठी कमी वेळ लागतो. यामुळे नैसर्गिक पद्धतीने आतड्यांची स्वच्छता होते आणि कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी झाल्यामुळे त्याची पातळी स्थिर राहते. अशा प्रकारे फायबरमुळे पचनक्रिया नियमित होते.

रिफाईंड खाद्यपदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण कमी होत जाते. उदा. मैद्यापासून बनवलेले ब्रेड व इतर पदार्थ. आईस्क्रिमसारख्या डेझर्टमध्ये चरबी आणि शर्करा कमी करण्यासाठी फायबर मिसळले जाते. याचप्रकारे दही, योगर्ट, पुडिंग इत्यादी पदार्थ घट्ट करण्यासाठी आणि पिझ्झा क्रिस्पी बनण्यासाठीदेखील फायबर मिसळतात. वेगवेगळ्या कंपन्या खाद्यपदार्थांमध्ये एक किंवा दोन प्रकारचेच फायबर मिसळतात. मात्र नैसर्गिक अन्नघटकांमध्ये अनेक प्रकारचे लाभदायक फायबर एकाच वेळी मिळते. म्हणूनच आहारातूनच नैसर्गिकरीत्या फायबर घेणे फायद्याचे ठरते.

फळांच्या वरच्या भागात आणि गरामध्ये फायबर सर्वाधिक असते. म्हणून सालासह फळे खावीत. कोंड्यासह पोळी, सॅलड, पोहे, उपमा, ज्वारी इत्यादींचे नियमित सेवन करावे. खाण्यात बदाम आणि अंकुरीत धान्याचे प्रमाण वाढवावे. तसेच पाणीदेखील भरपूर प्यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news